देशाची आर्थिक राजधानी व राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी पदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणे म्हणजे जणू तारेवरची कसरतच आहे. मात्र, 2008 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या संपदा मेहता यांनी ही जबाबदारी लीलया पेलली आहे. मे महिन्यामध्ये त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. ही जबाबदारी सांभाळताना समतोल भूमिका घेणे नेहमी आवश्यक असते व त्याप्रमाणे आपण कामकाज करत असल्याचे मत मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी पदावरुन काम करताना हाताखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण सहकार्य मिळवून त्यांच्याशी सुसंवाद साधून काम केल्यास यशस्वी होता येते यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. 2008 मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाराष्ट्र केडर मिळालेल्या मेहता यांनी यापूर्वी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यासहित जळगाव, हिंगोली, नाशिक, चंद्रपूर व पुणे या जिल्ह्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी अशा पदांवर काम केले आहे. मेहता यांचे पती रणजीत कुमार हे राजभवन मध्ये राज्यपालांचे उप सचिव म्हणून कार्यरत आहेत. नवरा व बायको दोन्ही जण प्रशासकीय सेवेत (आयएएस) असल्याने हे दांपत्य आपल्या एकुलत्या एक असलेल्या मुलाकडे दुर्लक्ष होऊ नये याकडे डोळ्यात तेल ओतून लक्ष देत असते. महत्त्वाच्या पदावर असलेल्या असलेल्या कामाच्या जबाबदारीच्या धबडग्यात मुलाकडे व कुटुंबियांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी ते नेहमी दक्ष असतात. वेळ जास्त मिळत नसला तरी सुटीचा व रजेचा मिळणारा पूर्ण वेळ कुटुंबियासाठी देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो.
दहावी व बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर अनेकांनी डॉक्टर, इंजीनियर बनण्याचा सल्ला दिला होता. मात्र व्यवसायाने चार्टड अकाऊंटट असलेल्या वडिलांनी व उच्चशिक्षित असलेल्या आईने संपदा यांच्या निर्णयाचा नेहमी आदर केला. वडिलांनी त्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा सल्ला खूप पूर्वीच दिलेला होता त्यावर चालून स्वतःच्या क्षमतांना सिध्द करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले व त्यामध्ये त्या यशस्वी देखील झाल्या. सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणाऱ्या व सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्या जिल्हाधिकारी पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. मेहता कुटुंबिय अस्सल पुणेकर असून संपदा यांचे शालेय शिक्षण मराठी माध्यमात झाले आहे. मराठी माध्यमात सातवीपर्यंत शिकल्यानंतर आठवीपासून त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमात सुरु झाले. त्यांच्या आयुष्यावर आई व वडिलांप्रमाणे आपल्या शाळेचा मोठा पगडा आहे. आयुष्यात पुढे काय करायचे आहे त्याचा नेमका विचार संपदा यांनी केला होता. शाळेच्या अभ्यासक्रमासोबत स्काऊट गाईडमध्ये त्या सक्रिय होत्या. महाविद्यालयाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्या नेहमी सहभागी होत असत.
आपल्याला शाळेने नेहमी योग्य दिशेने नेल्याचा उल्लेख त्या कृतज्ञतापूर्वक करतात. केवळ आपल्यापुरते आयुष्य जगण्याऐवजी व्यापक विचार करुन समाजासाठी उपयोगी पडण्याची शिकवण व विचार त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच होते. बारावी ला असताना त्यांनी युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या क्षमता सिध्द करण्यासाठी युपीएससी क्लियर करणे हे धेय्य त्यांनी स्वतःसमोर ठेवले व त्यामध्ये यश मिळवले.
मुंबई शहरामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करणे व राज्यात इतर ठिकाणी काम करणे यामध्ये बराच फरक आहे. मुंबईत जिल्हाधिकारी म्हणून काम करताना मुख्य काम शासकीय जमीनीचे संरक्षण व वाटप झालेल्या जमीनीचे व्यवस्थापन करणे हे आहे. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना कार्यालयामध्ये टीम लिडर म्हणून काम करताना आपण देखील टीमचा भाग आहोत या पध्दतीने काम करण्याची पध्दत कर्मचाऱ्यांचा विश्वास मिळवणे देखील आवश्यक असते, यावर त्यांचा विश्वास आहे व त्याप्रमाणे त्यांनी आजपर्यंतच्या जबाबदाऱ्या निभावल्या आहेत.
मुंबईत जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांच्यासमोरील आव्हाने मोठी आहेत व काम झाल्यावर मिळणारे समाधान देखील मोठे आहे. सर्वांना सोबत घेऊन एखादे काम पूर्णत्वाला जाते तेव्हा मोठे समाधान मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे.
महिला म्हणून घर व ऑफिस सांभाळताना निश्चितच धावपळ होते. त्यामुळे वर्किंग वुमनने आपले प्राधान्यक्रम योग्य प्रकारे ठरवलेले असतील तर दोन्ही बाबींना चांगला न्याय देणे शक्य होते, असे मेहता म्हणाल्या. नवरा व बायको एकाच फिल्डमध्ये असल्याने त्याचा खूप उपयोग होतो. प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या बाबीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. एखादी बाब मला खूप त्रासाची वाटते त्याबाबत ते मला दृष्टीकोन बदलून पाहण्याचा सल्ला देतात, आम्ही अनेकदा चर्चाकरतो व मार्ग काढतो, असे त्या आपल्या पतीबाबत म्हणाल्या.
महिलेने नोकरी केली म्हणजे महिलांचे सशक्तीकरण होते , मात्र दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना या महिलांची प्रचंड दमछाक होते,याकडे त्यांनी लक्ष वेधले. महिलेने सुपरवुमन असावे अशी अपेक्षा बाळगली जाते. त्यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. या अपेक्षेचा परिणाम महिलेच्या आरोग्यावर होतो व कुटुंबावर देखील होतो. स्त्री घराबाहेर पडली व आर्थिक सक्षम झाली, हे खरे आहे मात्र केवळ खुप पैसा कमावल्याने घर सुखी होऊ शकत नाही तर कुटुंबासाठी वेळ काढणे देखील महत्त्वाचे असते असे मत त्यांनी मांडले. कामाचे आठ तास झाल्यावर घरचा वेळ घरच्यांसाठीच देण्याचा दंडक या दांपत्याने पाळला आहे. सुटीचा वेळ जास्तीत जास्त मुलासाठी देण्यात त्यांना नेहमी आनंद वाटतो. सुटीच्या दिवशी काही कारणांमुळे आई-बाबांपैकी एकजण घरात नसेल तर दुसरा जण आवर्जून वेळ काढतो व मुलासोबत वेळ घालवतो. मुलाच्या वाढत्या वयात त्याला आई-वडिलांची गरज असते व ती पूर्ण करण्याला त्यांचे प्राधान्य असते.
कोणत्याही माध्यमात शिक्षण घेतले तरी कोणताही न्यूनगंड न बाळगता अभ्यास करुन स्वतःला सिध्द करावे. महिला असल्याने काम करताना आपल्यावर दुहेरी जबाबदारी असते याचे भान ठेवून चांगले काम करावे व आपल्यासोबत कुटुंबियांना व समाजाला देखील आपली शक्ती दाखवून द्यावी असा संदेश संपदा मेहता यांनी दिला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.