मुंबई | मस्जिद बंदर ते सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन दरम्यान २२ ऑगस्ट रोजी डाऊन मेल गाडीतून प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेची पर्स खेचून चोराने चालत्या गाडीतून पळ काढला. सदर महिला ह्या घटनेत जखमी झाली होती. या घटनेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जीआरपी पोलिसांनी छडा लावला. आणि आरोपीची कोणतीही माहिती नसतांना आरोपीला शोधून अटक करण्यात आली.
या कारवाईसाठी निकेत कौशिक, पोलीस आयुक्त लोहमार्ग, पुरुषोत्तम कराड, पोलीस उप आयुक्त, यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसटी जीआरपी टीमच्या अथक परिश्रम घेवून चार दिवसात आरोपीस अटक केली.
काय आहे नेमकी घटना
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २२ ऑगस्ट रोजी फलाट क्रमांक १७ वरून डाऊन उद्यान एक्स्प्रेस बोगी क्र. एस/३, या मेल गाडीतून प्रवास करणाऱ्या पीडित महिला प्रतिभा त्रिपाठी ह्या त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी सीएसटीएम स्थानाकवरून बेंगळुरू या ठिकाणी जाण्यासाठी उद्यान एक्स्प्रेस मधील सिट क्र. ८ वरून प्रवास करत होत्या. गाडीने फलाट सोडताच एक इसम गाडीत शिरला असता त्याने पीडित प्रतिभा त्रिपाठी यांची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला.
या वेळी ५८ वर्षीय प्रतिभा त्रिपाठी यांनी स्वतःची पर्स हातात धरून आरोपीस प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना खेचत ट्रेनच्या दरवाज्याजवळ आणले. या झटापटीत प्रतिभा यांना आरोपीने ट्रेनच्या बाहेर ओढल्याने प्रतिभा त्रिपाठी ट्रेनच्या बाहेर फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून उजव्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले यानंतर आरोपीने जागेवरून पळ काढला असता या संबंधी तक्रार सीएसटी जीआरपी पोलिसांकडे करण्यात आली.
दरम्यान, या घटनेची गंभीर नोंद घेत असताना जीआरपी पोलिसांच्या खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून २६ ऑगस्ट रोजी मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या बाहेर गेट नंबर ६ समोरील फुटपाथवर झोपलेल्या मुक्कदर मुमताजअली इद्रीसी २४ वर्षे यास ताब्यात घेऊन चौकशी केली.आरोपी मुक्कदर इद्रीसी हा मूळचा उत्तर प्रदेशातील अगवना तालुक्यातील दार्जिपूर्वा गावाचा रहिवाशी आहे. तसेच त्यास अमली पदार्थांचे व्यसन होते. चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेला मोबाईल व इतर मुद्देमाल हस्तगत केला असून या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.