HW Marathi
मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळला, ५ जणांचा मृत्यू

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल आज (१४ मार्च) सायंकाळी कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून ३६ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जखमींना जीटी, सेंट जॉर्ज आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी २ महिला असून १ पुरुष आहे. अपूर्वा प्रभू (३५), रंजना तांबे (४०), जाहिद सिराज खान (३२), सारिका कुलकर्णी, तपेंद्र सिंह अशी मृतांची नावे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

अपूर्वा प्रभू, रंजना तांबे या जीटी रुग्णालयाच्या कर्मचारी होत्या. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरील गाड्यांवर हा पूल कोसळण्याची माहिती मिळत आहे. सीएसएमटी येथील कोसळलेला पादचारी पूल मुंबई महानगरपालिकेचा होता, असे रेल्वे व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. विनोद तावडे, मिलिंद देवरा, राज पुरोहित, वारिस पठाण, भाई जगताप हे घटनास्थळी उपस्थित आहेत.

गंभीर बाब म्हणजे या पुलाचा तब्बल ६०% भाग कोसळला आहे. हा पादचारी पूल १९८४ सालचा असल्याची माहिती मिळत आहे. वर्षभरापूर्वी या पुलाची किरकोळ दुरुस्ती देखील झाली होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हा पूल कोसळला त्यावेळी या पुलावर किमान १० जण होते. दरम्यान, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून पुलाचा लोखंडी सांगाडा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आता २३ जणांना मलब्यातून बाहेर काढण्यात आले असून यामध्ये कोणीही नसल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता सीएसएमटी स्थानकासमोरील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला असून रेल्वे सेवा मात्र सुरळीत आहे. पिंपरीतून एनडीआरएफची  (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) टीम देखील मुंबईकडे रवाना झाली आहे.

 

Related posts

विमानतळ नामकरणाचा वाद, सेनेने थोपटले दंड

News Desk

गोखले पूल दुर्घटनेच्या १६ तासानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

News Desk

कलाप्रेमींसाठी खुशखबर ! २ फेब्रुवारीपासून सुरु होणार काळा घोडा फेस्टिव्हल

News Desk