मुंबई | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण भारतात सोमवारी उत्साहात साजरी होत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही दादर स्थित शिवाजी पार्क येथे शिवप्रेमींची सोमवारी सकाळी अलोट गर्दी पहायला मिळाली. यावेळी शिवाजी पार्क मधील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा परिसर शिवप्रेमींनी सुशोभित केला होता. तसेच सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले होते.
सोमवारी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुंबईचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ माहडेश्वर आणि शिवसेनेचे खासदार सुभाष देसाई यांनी शिवाजी पार्कातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पन करुन अभिवादन केले.
शिवाजी पार्क येथे असलेल्या महाराजांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी स्थानिकांसह मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. शिवाजी पार्क हे 1925 मध्ये मुंबई महानगरपालिकेने जनतेसाठी खुले केले. शिवाजी पार्कचे मूळ नाव माहिम पार्क असे होते. त्यानंतर या मैदानावर एका बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा 6 नोव्हेंबर 1966 मध्ये उभारण्यात आला. तेव्हापासून हे पार्क शिवाजी पार्क नावाने ओळखले जाऊ लागले. शिवाजी महाराजांच्या या भव्य अश्वारुढ पुतळ्यामुळे या पार्कची वेगळी ओळख निर्माण झाली. हा पुतळा कासेचा आहे. लालबागच्या राजाचे मुर्तीकार संतोष कांबळी यांनी पुतळ्याला मेटलिक ब्रॉंझची झळाळी दिली आहे. त्यामुळे दरवर्षी शिवजयंतीला या ठिकाणी शिवप्रेमी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आवर्जून उपस्थित रहातात.
- महापौर बंगल्यावरही शिवजयंतीचा उत्साह
दादर स्थित महापौर बंगल्यावर देखील संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती निमित्त करण्यात आले होते. यात शिवाजी महाराजांवर रचलेले पोवाडे आणि मराठी अभिमान गीतांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर या देखील उपस्थित होत्या
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.