चेन्नई – भारताच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेना उभारणारे थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांचा संशयास्पद मृत्यू एका विमान अपघातात स्वातंत्र्यापूर्वीच झाल्याचे आतापर्यंत मानले जात होते. मात्र ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत जिवंतच असल्याचा दावा फ्रेंच गुप्तहेर खात्याने केला आहे.
सुभाषबाबू यांच्या नाहीशा होण्यासंदर्भातील या रहस्याची चौकशी करण्यासाठी भारतामध्ये शाह नवाझ समिती (1956), खोसला आयोग (1970) आणि मुखर्जी आयोग (1999) असे आयोग नेमण्यात आले. यांमधील शाह नवाझ समिती व खोसला आयोगाने सुभाषबाबूचा मृत्यू 18 ऑगस्ट, 1945 रोजी जपानच्या ताब्यातील तैहोकु विमानतळावर झालेल्या अपघातात झाल्याचा निर्वाळा दिला होता; तर मुखर्जी आयोगाने मात्र सुभाषबाबुंचा मृत्यु त्या अपघातामध्ये झाला नसल्याचे ठामपणे सांगितले. तत्कालीन सरकारने मुखर्जी आयोगाचा हा दावा अर्थातच फेटाळून लावला. थोडक्यात, गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळाच्या या प्रयत्नांनंतर सुभाषबाबुंच्या मृत्युसंदर्भातील रहस्याचे समाधानकारक उत्तर मिळू शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर, सुभाषबाबुंचा मृत्यु विमान अपघातामध्ये झाला नसल्याची शक्यता आणखी गडद करणारा पुरावा पॅरिसमधील एक इतिहासकार जे बी पी मोर यांच्या हाती लागला आहे.
“सुभाषबाबु यांना विमान अपघातामध्ये मरण आले नाही; आणि ते 1947 मध्येही जिवंत होते. या अपघातामधून वाचलेल्या सुभाषबाबु यांनी “इंडोचायना‘मध्ये आश्रय घेतला,’ अशा आशयाचा फ्रेंच गुप्तचर खात्याचा अहवाल मोर यांच्या निदर्शनास आला आहे. सुभाषबाबु हे मृत झाल्याच्या वृत्तावर फ्रेंच गुप्तचर खात्याने विश्वास न ठेवल्याचे स्पष्ट आहे, असे प्राध्यपक मोर यांनी या पार्श्वभूमीवर सांगितले.
तत्कालीन इंडोचायना (आताचा व्हिएतनाम) ही १९४० च्या दशकांत फ्रेंच वसाहत असल्याने फ्रान्सच्या यासंदर्भातील भूमिकेविषयी कायमच उत्सुकता व्यक्त करण्यात आली होती. सुभाषबाबु हे विमान अपघातामध्ये मरण पावल्याचे ब्रिटीश व जपानी सरकारतर्फे सांगण्यात आले होते. मात्र तत्कालीन फ्रेंच सरकारने कायमच या विषयासंदर्भात मौन बाळगले. या पार्श्वभूमीवर आढळून आलेल्या या संवेदनशील अहवालास अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.