नवी दिल्ली | देशात कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लस घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय इतर सर्व मुख्यमंत्र्यांनाही लस टोचली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ५० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत माहिती दिली आहे. कोरोना लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात ५० पेक्षा जास्त वय असलेल्या खासदार, मंत्र्यांना लस टोचली जाईल, मात्र, लसीकरणाचा दुसरा टप्प कधी सुरु होईल याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही आहे.
तसेच, काल (२० जानेवारी) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कोरोनाची लस टोचून घेणार असल्याचे सांगितले. तसेच, लसीमुळे दुष्परिणाम होतात अशा अफवा न पसरवण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केले आहे. दरम्यान, पहिल्याच टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांसमोर लस घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती.