नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३१ डिसेंबर) गुजरातच्या राजकोटमध्ये उभारल्या जाणाऱ्या एम्स रुग्णालयाचं भूमिपूजन केलं. मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी संबोधित करताना देशवासीयांना विश्वास देत लवकरच भारतातही कोरोनावरील लसीला मंजुरी देण्यात येणार असल्याचं म्हटलं. तसंच जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी तयारीही केली जात असल्याचे ते म्हणाले. तसंच आरोग्याच्या बाबतीत २०२० हे एक महत्त्वाचं वर्ष ठरलं. २०२० मध्ये महासाथीच्या प्रादुर्भाव वाढण्याची चिंता होती. चहुबाजूंनी प्रश्न उपस्थित होत होते. परंतु २०२१ हे नवं वर्ष उपचाराची आशा घेऊन येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकसित केल्या जात असलेल्या लसीबाबत आवश्यक ती तयारी सुरू असल्याचंही पंतप्रधान म्हणाले आहेत.कोरोनाच्या लसीबाबत देशात आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतात विकसित होणारी लस ही जलदगतीनं सर्वांपर्यंत पोहोचेल यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम राबवण्यासाठीही तयारी केली जात आहे. ज्या प्रकारे संक्रमण थांबवण्यासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न केले तसं लसीकरणाची मोहिमही यशस्वी करण्यासाठी भारत एकत्र होऊन पुढे येईल,” असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
“भारतानं एकजुट राहून वेळोवेळी आवश्यक ती पावलं उचलली. त्याचाच परिणाम म्हणून आज आपली परिस्थिती इतरांच्या तुलनेत चांगली आहे. ज्या देशात १३० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या आहे त्या देशात १ कोटीपेक्षा अधिक लोकांनी या आजारावर मात केली आहे. भारत जेव्हा एकजुटीनं पुढे येतो तेव्हा संकट कितीही मोठं असेल त्याचा प्रभावीपणे सामना करू शकतो हे या वर्षानं दाखवून दिलं आहे,” असंही मोदी यावेळी म्हणाले. “वर्षाचा हा अखेरचा दिवस लाखो डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, औषधांच्या दुकानांमध्ये काम करणारे आणि फ्रन्टलाईन वॉरिअर्सची आठवण करण्याचा आहे. कर्तव्य बजावत असताना ज्यांनी आपलं जीवनही याला समर्पित केलं त्यांना मी नमन करतो,” असंही पंतप्रधान म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.