बंगळुरु | माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी चेन्नम्मा यांनाही संसर्ग झाला असून दोघं त्यांच्या राहत्या घरीच सेल्फ आयसोलेट झाले आहेत. देवेगौडा यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. देवेगौडा दाम्पत्याची तब्येत सुधारावी, यासाठी प्रार्थना करत असल्याचं मोदींनी ट्विटरवर सांगितलं आहे.
“माझी पत्नी चेन्नम्मा आणि मी कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आहोत. आम्ही कुटुंबातील इतर सदस्यांपासून स्वत:ला विलग करत आहोत. गेल्या काही दिवसांपासून आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी, अशी मी विनंती करतो. पक्षातील कार्यकर्ते आणि शुभचिंतकांनी कृपया घाबरुन जाऊ नये” असे ट्वीट देवेगौडा यांनी केले आहे.
एचडी देवेगौडा यांची राजकीय कारकीर्द
१९५३ मध्ये काँग्रेसमधून देवेगौडांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. मात्र नऊ वर्षांनी त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. १९६२ ते १९८९ या काळात त्यांनी अपक्ष म्हणून होलेनारसीपुरा विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडणूक जिंकली. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. १९९४ मध्ये जनता दलाच्या अध्यक्षपदाची सूत्र त्यांनी स्वीकारली. पुढे दोन वर्ष त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. तर त्यानंतर पंतप्रधानपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
पंतप्रधानपदानंतरही १९९८, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग चार वेळा ते जनता दल सेक्युलरतर्फे कर्नाटकातील हसन मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देवेगौडा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. देवेगौडा यांनी तुमकूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी एका दिवसात राज्यात २७ हजार ९०० पेक्षा जास्त पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, चाचणीचेही प्रमाण वाढविण्यात आले आहे, त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एकीकडे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून दुसरीकडे रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. त्यातच, आज माजी पंतप्रधान देवगौडा यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले.
My wife Chennamma and I have tested positive for COVID-19. We are self-isolating along with other family members.
I request all those who came in contact with us over the last few days to get themselves tested. I request party workers and well-wishers not to panic.— H D Devegowda (@H_D_Devegowda) March 31, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.