HW News Marathi
देश / विदेश

१० जनपथचा चाणक्य म्हणून ओळख असणाऱ्या अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास…

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज (२५ नोव्हेंबर) पहाटे निधन झाले. अनेक दिवसांपासून ते आजारी होते तसेच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या अहमद पटेल यांच्या राजकीय प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.

राजकीय कारकिर्दीची सुरुवात

अहमद पटेल यांचा जन्म गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरमध्ये झाला. १९७७ मध्ये त्यांनी आपली पहिली लोकसभा निवडणूक लढली आणि जवळपास ६२ हजार मतांनी ते विजयी झाले. १९८० मध्ये त्यांनी ८२ हजार मतांनी विजय मिळवला. तर १९८४ च्या निवडणुकीत त्यांचा तब्बल १ लाख २३ हजार मतांनी विजय झाला. पुढे १९९३ पासून अहमद पटेल राज्यसभेचे खासदार राहिले होते.

गुजरात युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड

१९७७ ते १९८२ दरम्यान पटेल यांनी गुजरात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तर १९८३ ते १९८४ असं एक वर्ष त्यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं जॉईंट सेक्रेटरी पद सांभाळलं. पुढे १९८५ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान पटेल माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव राहिले. जानेवारी १९८६ मध्ये त्यांच्यावर गुजरात काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. १९९१ मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर पटेल यांना काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य बनवण्यात आलं.

१९९६ मध्ये त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं कोषाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. पण काही कारणांमुळे त्यांनी ते पद सोडलं. पुढे २००० साली सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून पटेल यांनी कारकिर्द गाजवली. संघटनेसोबतच पटेल यांनी नागरी उड्डाण मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे बनवण्यात आलेल्या कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

काँग्रेसचा कणा

१९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली होती. त्यावेळी काँग्रेसच्या मुठभर विजयी उमेदवारांमध्ये अहमद पटेल यांचं नाव होतं. पुढे १९८/ मध्ये काँग्रेसनं दमदार पुनरागमन केलं. त्यावेळी इंदिरा गांधी अमहद पटेल यांना मंत्रिमंडळात घेण्यास इच्छुक होत्या. पण पटेल यांनी आपण संघटना मजबूत करण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगत पक्षासाठी काम करणं पसंत केलं.

त्यानंतर राजीव गांधी यांनीही १९८४ च्या निवडणुकीनंतर पटेल यांना मंत्रिपदाची ऑफर दिली. तेव्हाही पटेल यांनी ते विनम्रपणे नाकारत पक्षासाठी काम करण्यालाच पसंती दिली. राजीव गांधी यांच्या काळात अमहद पटेल यांनी काँग्रेसमध्ये युवकांचं संघटन बांधलं. त्याचा मोठा फायदा पुढे सोनिया गांधी यांना झाला होता.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळापासून अहमद पटेल राजकारणात होते. पटेल आतापर्यंत ८ वेळा खासदार राहिले आहेत. त्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत ५ तर लोकसभेत ३ वेळा त्यांनी काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी गुजरातच्या भरुच जिल्ह्यातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.

१० जनपथचा चाणक्य

पटेल यांची ऑगस्ट २०१८ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पटेल यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून काँग्रेसमध्ये संघटनात्मक कमान सांभाळण्याचं मोठं काम केलं आहे. अहमद पटेल यांना १० जनपथचा चाणक्य म्हणून ओळखलं जायचं. ते गांधी परिवाराचे निकटवर्तीय होते. काँग्रेस पक्षावर त्यांची पकड अतिशय मजबूत होती. २०१८ मध्ये अहमद पटेल यांनी राज्यसभेची निवडणूक लढवली. त्यांचा पराजय करण्यासाठी भाजपनं आपली सर्व ताकद पणाला लावली होती. तरीही अमहद पटेल यांनी ४४ मतं घेत विजय मिळवला आणि भाजपचे उमेदवार बलवंत सिंह राजपूत यांना ३८ मतांवर समाधान मानावं लागलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘या’ ४ जिल्ह्यांत गेल्या १४ दिवसांत एकही कोरोनाबाधित नाही

News Desk

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना एनएबीकडून अटक

News Desk

सरकार चालवता येत नसेल तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा !

News Desk