अश्विनी सुतार | वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पाटेल समाजामध्ये ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरात येथे झाला. वल्लभभाई पटेल हे एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. सरदार वल्लभभाई पटेल या खंबीर व्यक्तिमत्त्वाच्या कणखर नेतृत्वाची नोंद इतिहासानेही घेतलेली आहे. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३ वी जयंती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले आहे. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ह्या पदवीने संबोधित केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘पोलादी पुरुष’ म्हणून अत्यंत आदराने गौरविले जाते.
महात्मा गांधी यांच्या जवळचे सहकारी म्हणून सरदार पटेल स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्टयपूर्ण होते. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते मानले जात. १९३४ आणि १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही केले. छोडो भारत आंदोलनात ते आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान आहेत. या पदावर कार्यरत असताना वल्लभभाई पटेल यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब-दिल्ली येथे राहणार्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले होते. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतता स्थापन करण्याकरिता त्यांनी मोठे कार्य केले आहे. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य मानले जाते. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने भारतात विलीन केली होती.
भारताचा राज्यकारभार पाहण्याकरिता काँग्रेस, मुस्लीम लीग या अन्य पक्षांशी चर्चा करून इंग्रज सरकारने हंगामी सरकार सप्टेंबर १९४६ साली नियुक्त केले होते. या सरकारमध्ये सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत–पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली होती. त्यानंतर हिंदू–मुस्लीम यांच्यात उसळलेल्या प्रचंड जातीय दंगलीमध्ये कणखर भूमिका घेऊन त्यांनी जातीय दंगली आटोक्यात आणण्याचे अथक प्रयत्न केले. पाकिस्तानच्या आगळिकीविरुद्ध जोरदार इशारा दिला. हिंदू आणि मुस्लीम यांच्याशी व्यवहारवादी भूमिकेतून संवाद साधून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पटेल यांच्या बोलण्यात आणि कृतीत धर्मनिरपेक्षता होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.