HW Marathi
देश / विदेश

पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची मंगळवारी (१९ मार्च) देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घोष लोकपालपदी नियुक्ती केली आहे. भारतात लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी देशाच्या पहिल्या लोकपालाची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (१५ मार्च) लोकपाल निवड समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकपाल अध्यक्षासह अन्य ८ सदस्यांच्या नावांबाबत चर्चा झाली.

लोकपाल निवड समितीच्या बैठकीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. पिनाकी चंद्र घोष यांचे वय आता ६६ वर्ष आहे. वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत म्हणजेच पुढची ४ वर्षे देशाच्या लोकपालपदी कायम राहतील. लोकपाल अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसारखा दर्जा आणि वेतन असते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अनेक आंदोलने करून देशात लोकपाल नियुक्तीची मागणी लावून धरली होती.

पिनाकी चंद्र घोष यांचा अल्प परिचय

पिनाकी चंद्र घोष हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी) सदस्य आहेत. १९९७ साली ते कोलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले तर डिसेंबर २०१२ मध्ये आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून घोष यांची नियुक्ती झाली. २०१७ साली ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते.

लोकपाल निवड समिती

लोकपाल निवड समितीमध्ये लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश रंजन गोगोई, ज्येष्ठ वकिल मुकुल रोहतगी तसेच विशेष आमंत्रित करण्यात आलेले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या बैठकीत मात्र मल्लिकार्जुन खर्गे अनुपस्थित होते.

Related posts

अँगेला मार्कल चौथ्यांदा चॅन्सलर

News Desk

काँग्रेसने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील महाभियोग याचिका मागे

News Desk

खबरदार … शेतक-यांचा संयम सुटतोय

News Desk