HW News Marathi
देश / विदेश

गंगा बचावासाठी उपोषणाला बसलेल्या जेष्ठ पर्यावरणवादी स्वामी सानंद यांचे निधन

हरिद्वार | ज्येष्ठ पर्यावरणवादी प्रोफेसर जी.डी अग्रवाल उर्फ स्वामी सानंद यांचं उपोषणादरम्यान निधन झालं आहे. गंगा स्वच्छतेच्या मागणीसाठी गेल्या १११ दिवसांपासून ते उपोषण करत होते. पोलिसांनी उपोषणस्थळावरुन उचलल्यानंतर त्यांनी जलत्याग केला होता. हरिद्वारमधील ऋषीकेशच्या एम्स रुग्णालयात प्रा. अग्रवाल यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वामी सानंद कानपूर आयआयटीमध्ये प्राध्यापक होते. त्यानंतर केंद्रिय पर्यावरण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. बुधवारी रात्री त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना बुधवारी रात्री हरिद्वार येथून एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली. स्वामी सानंद यांनी १११ दिवस उपोषण केले. यादरम्यान पाण्यात मध मिसळून केवळ त्याचे सेवत ते करत होते. गेले दोन दिवस त्यांनी पाणीही त्यागले होते.

काय होत्या नेमक्या मागण्या

अवैध रेती उपसा, बंधारे, बेसुमार प्रदूषण या जोखाडातून गंगेला मुक्त करावे, या मागणीसाठी स्वामी सानंद उपोषणाला बसले होते. ‘गंगा बचाव’साठी विविध मुद्द्यांवर स्वामी सानंद यांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी गंगा नदीसाठी स्वतंत्र कायदा बनवण्याची मागणी केली होती. त्या पत्रावर कोणतंही उत्तर न मिळाल्याने स्वामी सानंद २२ जूनपासून उपोषणाला बसले होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उमा भारती यांनी स्वामी सानंद यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती मात्र त्यांनी ती विनंती धुडकावली होती. स्वामी सानंद यांनी २०१२ मध्येही गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी उपोषण केले होते. नंतर सरकारने मागण्या मान्य केल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले होते.

Related posts

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचं ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ नामकरण

News Desk

OBC आरक्षणासाठी भाजप आक्रमक ! राज्यभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात

News Desk

जुलै महिन्यात दीड लाख शाखांची पोस्टल बँक होणार सुरू

News Desk