HW News Marathi
देश / विदेश

का झाले कारगिल युद्ध ?

मुंबई | कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात देखील युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.

हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, ऑक्टोबर, १९९९ मध्ये पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली.

  • कारगिल युद्धाची कारणे…

१९७१ च्या युद्धानंतर भारत व पाकिस्तानमध्ये थेट मोठे युद्ध झाले नाही. तरी सातत्याने छोट्या छोट्या चकमकी होत आहेत. सियाचीन हिमनदी वर भारतीयांचे नियंत्रण तसेच सभोवतालचा परिसरावर नियंत्रण मिळवण्यात दोन्ही बाजू सातत्याने प्रयत्‍नशील असतात. १९८० च्या सुमारास पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पंजाबात खलिस्तानच्या नावावर दंगा घातला तसेच १९९० च्या सुमारास काश्मीरमध्ये दहशतवादाने मूळ धरले परिणामी भारताने काश्मीरमध्ये कायमस्वरूपी सैन्य तैनात केले. हे दहशतवादी सुरुवातीच्या काळात काश्मीरमधील असत व त्यांना प्रशिक्षित करून पाठवले जात असे. काही काळानंतर पाकिस्तानी सैनिक, अधिकारी व तालिबानी अफगाणिस्तानातील भाडोत्री अतिरेक्यांनाही काश्मीरमध्ये पाठवले जाऊ लागले. पाकिस्तानने नेहमीच या बाबतीत आपला सहभाग असल्याचा इन्कार केला. कारगिलच्या युद्धातदेखील पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयत्‍न केला. १९९८ मध्ये भारत पाकिस्तानने अणु चाचण्या केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध चांगलेच ताणले गेले. परंतु वाजपेयी यांनी मैत्रीचा हात पुढे करून संबंध निवळण्याचा प्रयत्‍न केला व त्यासाठी ते स्वत: लाहोरला जाऊन आले होते.

१९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ यायचे. असे केले की, महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले की. लडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होता. तसेच घुसखोरीदरम्यान कारगील/काश्मीर परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होता. भारतीयांनी सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवण्यात जी क्‍ऌप्ती वापरली तसाच काहीसा प्रकार पाकिस्तानने केला असा काही लेखकांचा सूर होता.

 

  • कारगिल विषयी थोडक्यात…

कारगिल हे असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगिलमध्ये काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान आहे. उन्हाळा हा सौम्य कडक तर हिवाळा अतिशय कडक असतो व तापमान उणे ४० अंश सेल्सियस पर्यंतही उतरू शकते.

राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगिल नव्हे तर आग्नेयेकडील द्रास व नैऋत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.

वर नमूद केल्याप्रमाणे कारगिल, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तानमध्ये, कारगिल युद्धाच्या आधीपर्यंत होता. या वेळेस मात्र, भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे, कारगिलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. या चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ अ हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यांत आला. तसेच, उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यांप्रमाणे होत्या. त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर फौजेची गरज लागते. त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडी हे काम अजूनच अवघड करते.

  • भारतीय सैन्यांची कामगिरी

भारतीय सैन्यात सामिल झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली. कारगिलचे पहिले शिखर जिंकल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना पुढे काय असे विचारले असता, ‘जेवढा प्रदेश जिंकला तेवढा पुरेसा नाही, ‘ये दिल माँगे मोअर‘ अशी प्रतिक्रीया कॅप्टन बत्रा यांनी दिली. त्यांच्यामुळेच ‘ये दिल माँगे मोअर हे वाक्य प्रसिद्ध झाले.

पाकिस्तानी सैन्यावर चालून जाण्याची कामगिरी कॅप्टन बत्रा यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी पॉइंट ५१४० जिंकला, मात्र त्यात ते शहिद झाले. युध्दाआधी, मी ‘भारताच्या ध्वजामध्ये लपेटूनच परत येईल असे कॅप्टन बत्रा म्हणाले होते. ते खरे ठरले. या युद्धातले सगळ्यात पहिले ‘परमवीर चक्र कॅप्टन बत्रा यांना प्रदान करण्यात आले.

या युद्धात ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव यांनी आपल्या प्लाटूनबरोबर ‘टायगर हिलवर हल्ला केला होता. त्यांनी ‘टायगर हिलवरती भारताचा तिरंगा फडकवला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना ‘परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

या युद्धात शहिद झालेले जवान आणि अधिकारी २० ते २६ या वयोगटातील होते. आपले ३६ अधिकारी, ५७६ सैनिक आणि हवाई दलाचे पाच जवान शहिद झाले. या युद्धात चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९ वीर चक्र आणि ५२ सेना मेड्ल प्रदान करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास

Gauri Tilekar

मुंबईत पेट्रोल ९ पैशांनी महागले, सामान्यांचे हाल

Gauri Tilekar

शेतकरी आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी २६ जणांवर गुन्हे दाखल

News Desk