HW News Marathi
देश / विदेश

… जेव्हा जिन्ना भगतसिंग यांना मदत करु इच्छितात

पूनम कुलकर्णी | क्रांतिकारी भगतसिंग हे जेव्हा तुरुंगामध्ये उपोषणाला बसले होते तेव्हा मोहम्मद अली जिन्ना यांनी भगतसिंग यांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता. भगतसिंग आणि गांधीजी यांचे राजकीय मतभेद हे सर्वांनाच सर्वश्रुत आहेत. भगतसिंग यांना दिलेली शिक्षा आणि फाशी या दरम्यान गांधीजींना प्रचंड टिकेला सामोरे जावे लागले होते. याचवेळी मोहम्मद अली जिन्ना हे ना गांधीजींच्या विचारांशी सहमत होते ना ते भगतसिंग यांच्या अगदी जवळचे होते. जिन्ना हे तात्कालीन प्रसिद्ध वकिलांपैकी एक होते. ब्रिटिश सरकार क्रांतिकारकांना देत असलेल्या त्रासाची त्यांना संपूर्ण कल्पना होती. तसेच ते क्रांतिकारकांचे देशाप्रती असलेले योगदान जाणून होते. त्यांना माहित होते कि ब्रिटिश क्रांतिकारकांच्याविरोधात गुन्हे दाखल करतात. परंतु त्यांची बाजूदेखील ऐकून घेत नाहीत. १९२९ साली असेच काहीसे भगतसिंग यांच्याबाबत झाले. सर्वांना माहित होते कि ब्रिटिश न्यायाधीश हे केवळ दाखविण्यासाठी न्यायालयात खटला चालवीत आहेत. दरम्यान भगतसिंग यांनी न्यायालयात येणे बंद केले आणि ते उपोषणाला बसले.

भगतसिंग यांनी या उपोषणातून भारतीय क्रांतीकारकांना कारागृहात असताना उत्तम सुविधा द्याव्यात अशी मागणी केली होती. कारागृहात असणाऱ्या भारतीय क्रांतिकारकांचे होणारे हाल ब्रिटिश सरकारकडून थांबविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून सरकारपुढे ठेवली होती. किमान राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कैदयांना वेगळ्या नजरेतून पाहण्यात यावे, अशीही त्यांची मागणी होती.

परंतु, ब्रिटिशांनी भगतसिंग यांच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. ब्रिटिश न्यायाधीश भगतसिंग यांच्या उपस्थितीशिवायच न्यायालयात खटला चालवू लागले. हे सर्व पाहून एक दिवस मोहम्मद अली जिन्ना यांनी केंद्रीय विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि ते भगतसिंग यांना पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या म्हणण्यानुसार भगतसिंग हे एक राजकीय पार्श्वभूमी असलेले कैदी होते आणि भगतसिंग यांना सामान्य गुन्हेगार ठरवून ब्रिटिश प्रशासन एक मोठी चूक करीत होते. जिन्ना यांच्या मते, भगतसिंग यांची शिक्षा ही न्यायालयाने ठरवून केलेली हत्या होती. कारण भगतसिंग यांच्या शिवायच खटला चालविला जात होता आणि उपोषणातील मागण्या देखील दुर्लक्षित केल्या जात होत्या. तेव्हा जिन्ना यांनी ब्रिटिश सरकारपुढे म्हटले कि, “तुम्हा सर्वांना माहिती आहे कि हे लोक आपल्या जीवाची बाजी लावायला तयार आहेत. ही गोष्ट म्हणजे गंमत नव्हे. मी न्यायालयीन सदस्यांना विनंती करतो कि त्यांनी प्रयत्नपूर्वक हे लक्षात घ्यावे कि उपोषणाला बसून आपला जीव धोक्यात घालणे प्रत्येक व्यक्तीला जमतेच असे नाही. जो व्यक्ती अशा उपोषणांना बसतो त्याचा एक आत्मा असतो. तो व्यक्ती त्या आत्म्यापासून प्रेरणा घेत असतो. त्याला न्यायाची अपेक्षा असते. तो त्या अपराध्यांप्रमाणे नसतो कि जे वाईट प्रवृत्तींना खतपाणी घालतात.” इतक्यातच विधानसभेची वेळ संपली आणि त्यांना आपले म्हणणे अर्ध्यावर थांबवावे लागले.

मात्र जिन्ना यांनी दुसऱ्या दिवशी विधानसभेत पुन्हा एकदा क्रांतिकारकांच्या बाजूने आपले म्हणणे मांडायला सुरुवात केली. ते म्हणाले, “मला वाईट वाटते कि चूक किंवा बरोबर पण भारतातील युवक जे संख्येने ३ कोटींपेक्षा अधिक आहेत ते एकोप्याने पुढे येत आहेत. अशा वेळी गुन्हेगारीला थांबविणे कठीण होऊन बसते. ते गांभीर्याने या गोष्टीचा विचार करीत आहेत कारण जनता सरकारच्या व्यवस्थेपासून प्रचंड त्रस्त आहे.”

भगतसिंग यांचे हे उपोषण ११६ दिवस सुरूच राहिले. त्यावेळचे हे जगातील सर्वात प्रदीर्घ काळासाठीचे उपोषण होते. इतिहासकारांच्या मते, जिन्ना हे १९३१ ला एक वेगळे राजकीय नेते म्हणून ओळखले जात होते. परंतु स्वातंत्र्याच्या काळात त्यांची राजकीय धोरणे काही अंशी बदलत गेली. त्यांनी भगतसिंग यांच्या बाजूने उठविलेला आवाज हा इतिहासातील महत्त्वाचा भाग अशासाठी आहे कि, ज्यावेळी भगतसिंग आणि बटुकेश्वरनाथ यांनी विधानसभेत बॉम्ब टाकले त्यावेळी जिन्ना देखील त्याठिकाणी उपस्थित होते. तरीही जिन्ना यांनी भगतसिंग यांची बाजू घेतली हे कुठेतरी असे दर्शविते कि, त्यावेळी जिन्ना हे क्रांतिकारकांसाठी जितके शक्य होईल तितके प्रयत्न करण्यासाठी तयार होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नासाचेही गुरूला अभिवादन

News Desk

राहुल गांधींनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी, आठवलेंनी दिला सल्ला  

News Desk

प्रमोद सावंत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा घेतली शपथ

Aprna