HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी

भारतातल्या पहिली महिला डॉक्टर असलेल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना असे होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणार्‍या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची त्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह २० वर्षांनी मोठे असणार्‍या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे नाव यमुना हे बदलून आनंदीबाई असे ठेवले.

आनंदीबाई जोशींचे पती गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसमध्ये कारकून होते. गोपाळराव स्वतः लोकहितवादीची शतपत्रे वाचत असत. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी त्यावेळी जाणले होते. लोकहितवादीच्या शतपत्रांतून गोपाळराव प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय त्यांनी केला.

आनंदीबाईंचे वैद्यकीय शिक्षण

आनंदीबाईंनी वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १० दिवसच जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्धार केला. गोपाळरावांनी यासंदर्भात अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट घालण्यात आली होती. धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्‍न सोडले नाहीत . पुढे आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित त्यांना मिळाले. या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी “विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया” मध्ये प्रवेश मिळाला.

दरम्यान, नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यांमुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर या जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले. सुरुवातीला तत्कालीन समाजाकडून या कामाला खूप विरोध केला गेला. आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदु धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे. आनंदीबाईचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.

कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. त्यांच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून त्यांची प्रशंसा केली. एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडर्वड हॉस्पिटल मधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.

डॉ. आनंदीबाई जोशी

वयाच्या विशीतच आनंदीबाई जोशी यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला. केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र ‘चूल आणि मूल’ म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी-गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते .

जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही . समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाचे खरे सार्थक आहे, असे आनंदीबाईंच्या आयुष्यावरून समजते. स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी त्यांना मिळालीच नाही. तिकडे अमेरिकेत मात्र कार्पेटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात (Grave-yard) त्यांचे लहानसे थडगे बांधले. त्यावर ‘आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या. परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदिशक्तीच्या आभूषणांना हिऱ्यांची सजावट

Gauri Tilekar

संध्या चौगुले यांचा अनोखा प्रवास, १८ वर्षात ६० हजाराहून अधिक वृक्षारोपण

swarit

महिला उद्योजिका मीनल मोहाडीकर

News Desk