HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

आजचा रंग गुलाबी, ‘सिद्धीदात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

नवरात्र उत्सव पर्वणीतील आज अश्विन शुद्ध नवमी. या शुभदिनी दुर्गा परमेशवरी जगतजननी सिद्धीदात्री या रूपात भक्तांना दर्शन देते आहे. या रूपात देवीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. तिने धारण केलेले वस्त्र सर्व शुभकारक होऊ दे, या आशयाचे आहे. कुटुंबियांसाठी, समाजासाठी, देशासाठी त्याग करण्याची निस्वार्थी होण्याची ऊर्जा प्राप्त होते. सिद्धीदात्री देवी चतुर्भुज असून शंख, चक्र, गदा, पद्म हाती धारण केले आहे.

हातातील ‘शंख’ हे जागृततेचे व एकाग्रतेचे तर ‘चक्र’ हे जीवनातील अंधःकारमय दुःख नष्ट करून प्रकाशमय जीवन प्राप्तीचे आणि पद्म म्हणजे मृदू कोमलता, वात्सल्याचे, प्रेमाचे प्रतीक आहे. गदा हे अविचार, अत्याचार, उदांत अहंकारावर दंडात्मक आहे.

सिद्धीदात्री या देवीची मनोभावे, एकनिष्ठेने भक्ती केल्यास ती भक्तांना सर्व सिद्धी प्राप्त करते. देवांचे देव महादेव यांनी देखील सिद्धीदात्री देवीच्या कृपेने पूर्ण सिद्धी प्राप्त केली होती, असे म्हटले जाते. याच देवीच्या कृपेमुळे महादेवाचे अर्धे शारीर देवीचे झाले होते. म्हणून महादेवांना अर्धनारीश्वर या नावाने ओळखले जाते. मानवच नाही तर सर्व सिद्धी, गंधर्व, यक्ष, देवता आणि दानव हे देखील सिद्धीदात्री देवीची आराधना करतात. सिद्धीदात्री ही देवी कमळावर विराजमान आहे. तसेच युद्धप्रसंगी हीच देवी सिंहावर आरूढ होते.

नवमीच्या दिवशी घटाची पूजा हळदकुंकू अक्षता वाहून कुलाचाराप्रमाणे नागवेलीच्या पानांची किंवा गोंड्याची माल चढवून कर्पूरारती, पंचारती करून पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. मनोभावे प्रार्थना करून तळी भरतात. एका ताम्हणात भंडारा, सुक्या खोबऱ्याची वाटी, पाच पानांचा विडा ठेऊन ताम्हणामध्ये कापूर जाळून तळी उचलून, जयजयकार केला जातो. घटी देवावर भंडारा उधळून पाच पानांचा विडा ठेऊन सर्वांनी घटाला हात लावून घटातील कलश हलवून वर उचलून अंबिकेचा उदो उदो केला जातो. घटातील कलश हलवून वर उचलून अंबिकेचा उदो उदो करून घटातील नारळ फोडून ते पाणी सर्व घरात शिंपडले जाते. त्यानंतर कडकण्याचा व खोबऱ्याचा प्रसाद सर्वांना देतात.

घटातील उगवलेले रुजवणाचे रोपटे देवावर वाहून कानाच्या पाळीत ठेऊन नवरात्रोत्सवाची सांगता करून घट समुद्रात किंवा निर्माल्य कलशात विसर्जन केले जाते. नवमी ही नवरात्र उत्सवाची सांगता करणारी महानवमी आहे. या दिवशी नवरात्रीच्या उपासनेचे पारणे केले जाते. नवसुहासिनी पूजन करून त्यांची यथाशक्ती यथामती साडीचोळी देऊन सौभाग्य अलंकाराची ओटी भरली जाते. पंचपक्वान्नाचे भोजन देऊन श्री मातेच्या रूपात मनोभावे पूजन केले जाते. नंतर नवरात्र महाउपोषणाची सांगता करून उपोषण सोडले जाते. वर्षानुवर्षे आई जगदंबे माते आमच्या हातून तुझी पूजा घडू दे, अशी प्रार्थना केली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ

Gauri Tilekar

आव्हानांचा सामना करत ‘ती’ने केले स्वप्न साकार

News Desk

संध्या चौगुले यांचा अनोखा प्रवास, १८ वर्षात ६० हजाराहून अधिक वृक्षारोपण

swarit