HW News Marathi
राजकारण

नरसिंहा राव यांच्यानंतर मनमोहन सिंह हे देशाला लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान !

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहा राव यांच्यानंतर मनमोहन सिंह हे देशाला लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान होते, या शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या राजकीय जीवनावर आधारित असलेल्या ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु होती. आता या वादात शिवसेनेनेही उडी घेतल्याने पुन्हा यावर वाद होण्याची शक्यता आहे. मनमोहन सिंह हे अ‍ॅक्सिडेंटल नव्हे तर एक यशस्वी पंतप्रधान होते, असेही यावेळी संजय राऊत यांनी म्हटले आहे. “एखादे पंतप्रधान जर तब्बल १० वर्षे देश चालवत असतील आणि लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असेल, तर ते अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहेत असे मला वाटत नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसकडून सडकून टीका

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काँग्रेसकडून अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया आल्या होत्या. “ज्या पंतप्रधानांनी अत्यंत अवघड परिस्थितीतून देशाला वाचविले त्या मनमोहन सिंग यांना ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ असे म्हटले जात आहे. परंतु, विद्यमान पंतप्रधानांनी तर देशाचाच अ‍ॅक्सिडेंट केला आहे”, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला होता. त्याचप्रमाणे आगामी निवडणुका डोळ्यांपुढे ठेऊन सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून हा राजकीय डाव खेळला जात असल्याचा आरोप देखील काँग्रेसचे खासदार पीएल पुनिया यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दूध भेसळीच्या मुद्यावर अजित पवार विधानसभेत आक्रमक

Aprna

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ची पहिली यादी जाहीर

News Desk

EVMHacking : मी खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो !

News Desk