मुंबई | आम्ही आज पंढरपूरला निघालो आहोत. अयोध्या वारी नंतर ही पंढरपूरची वारी आहे. पत्रकारांनी आम्हाला तेव्हा प्रश्न विचारले, ‘अयोध्येवर ‘स्वारी’ करायला निघाला आहात त्यातून काय साध्य होणार?’ आताही तेच प्रश्न विचारले जात आहेत. ‘पंढरपूरवर स्वारीचे प्रयोजन काय?’ हे सवाल – जवाब निरर्थक आहेत. ही ‘स्वारी’ नसून फक्त वारी आहे. स्वारी जिंकण्यासाठी केली जाते. वारी एका श्रद्धेने, आशीर्वादासाठी होते. अयोध्येची वारी राममंदिर प्रश्नी चार वर्षे झोपलेल्या कुंभकर्णास जागे करण्यासाठी होती. पंढरपूरची वारी मरगळ आलेल्या महाराष्ट्रास जागे करण्यासाठी आहे. सरकारला जागे करण्यापेक्षा ते घालवलेलेच बरे. त्यासाठी जनतेने उसळून उठायला हवे. म्हणूनच पंढरीच्या पावन भूमीवर ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ हा लक्ष जनांच्या मुखातून उठणारा गगनभेदी जयघोष ऐकण्यासाठी आकाशामध्ये तेहतीस कोटी देवांच्या विमानांची दाटी होईल व ते आमच्या कार्यास आशीर्वाद देतील. तुकोबा म्हणतात, ‘उधार नाही पंढरीसी। पायापाशी विठोबाच्या ।। ’ पंढरीच्या विठोबाच्या पायांपाशी उधार काही नसते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या चार वर्षात महाराष्ट्राची परिस्थिती पाहता जनतेला जागे करण्यासाठी पंढरपरीची वारी काढण्यात आल्याचे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.
सामनाचे आजचे संपादकीय
आता ठिणगी पडेल
विठोबा हा आमचा आत्मा आहे. हाच तो आमचा देव, ज्याने महाराष्ट्र एकसंध ठेवला. जातीपातीचे भेद गाडले. मात्र ते राजकारण्यांनी उकरून काढले. गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजुरांचा हाच देव आहे आणि त्याच्याच चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी आम्ही टाकू इच्छितो. याच ठिणगीने आज कोरडी झालेली चंद्रभागा खळखळता प्रवाह घेऊन महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् केल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही आज पंढरपूरला निघालो आहोत. अयोध्या वारी नंतर ही पंढरपूरची वारी आहे. पत्रकारांनी आम्हाला तेव्हा प्रश्न विचारले, ‘अयोध्येवर ‘स्वारी’ करायला निघाला आहात त्यातून काय साध्य होणार?’ आताही तेच प्रश्न विचारले जात आहेत. ‘पंढरपूरवर स्वारीचे प्रयोजन काय?’ हे सवाल – जवाब निरर्थक आहेत. ही ‘स्वारी’ नसून फक्त वारी आहे. स्वारी जिंकण्यासाठी केली जाते. वारी एका श्रद्धेने, आशीर्वादासाठी होते. अयोध्येची वारी राममंदिर प्रश्नी चार वर्षे झोपलेल्या कुंभकर्णास जागे करण्यासाठी होती. पंढरपूरची वारी मरगळ आलेल्या महाराष्ट्रास जागे करण्यासाठी आहे. सरकारला जागे करण्यापेक्षा ते घालवलेलेच बरे. त्यासाठी जनतेने उसळून उठायला हवे. म्हणूनच पंढरीच्या पावन भूमीवर ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ हा लक्ष जनांच्या मुखातून उठणारा गगनभेदी जयघोष ऐकण्यासाठी आकाशामध्ये तेहतीस कोटी देवांच्या विमानांची दाटी होईल व ते आमच्या कार्यास आशीर्वाद देतील. तुकोबा म्हणतात, ‘उधार नाही पंढरीसी। पायापाशी विठोबाच्या ।। ’ पंढरीच्या विठोबाच्या पायांपाशी उधार काही नसते. विठोबा हा सकल सिद्धीचा दाता आहे. तो कोणाचीही उपेक्षा करीत नाही. महाराष्ट्रातील जनता अनेक देवदेवतांची पूजा करते आणि दरवर्षी अनेक सण साजरे करते, पण महाराष्ट्राचे अंतःकरण जर खरे कशामध्ये गुंतले असेल तर ते फक्त युगे अठ्ठावीस विटेवरी उभा राहिलेल्या पांडुरंगाच्या समचरणांवर!’ आज आम्ही त्याच पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन महाराष्ट्राच्या जनतेस निर्मळ, चांगले दिवस यावेत यासाठी साकडे घालणार आहोत. महाराष्ट्रावर दुष्काळाचे भयंकर सावट आहे आणि देशाचे राज्यकर्ते सत्तेच्या मस्तवाल राजकारणात मशगूल आहेत. उद्याच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येनकेनप्रकारेण जिंकायच्याच यासाठी जी अक्कल पणाला लावली जात आहे ती राज्याच्या प्रगतीसाठी, दुष्काळ निवारणासाठी लावली तर राज्यात भूकबळी आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल. पंढरपूरच्या सभेत आम्ही महाराष्ट्राच्या स्थितीवर बोलूच, पण प्रत्यक्ष पंढरपूर, सोलापूर व आसपासचा भाग दुष्काळाने होरपळून निघाला आहे. जनावरांच्या चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरचे नीट नियोजन नसल्याने ही होरपळ दिवसागणिक वाढतच आहे. कोणत्याही गोष्टीला शेवट असतोच असे सांगतात, पण या भागातील जनतेच्या होरपळीस शेवट नाही. मग तो प्रश्न दुष्काळाचा असेल नाहीतर पुनर्वसनाचा. तसे नसते तर बाजूच्या टेंभुर्णी धरणग्रस्तांना पंचवीस-तीस वर्षांनंतरही त्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावे लागले नसते. महाराष्ट्रातही कुंभकर्णी वंश वाढला आहे व ते प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समजून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे टेंभुर्णीचे धरणग्रस्त येत्या 26 जानेवारीस जलबुडी करण्याच्या निर्धाराने एकवटले आहेत. नवे राज्य येऊनही टेंभुर्णी धरणग्रस्तांसारख्या अनेकांचे प्रश्न लटकलेलेच आहेत. मुख्यमंत्री सालाबादाप्रमाणे आषाढीस येतात आणि महापूजा करून जातात. पण पंढरपूर, मंगळवेढा, टेंभुर्णीकरांच्या दुष्काळी प्रकल्पांचे प्रश्न तसेच आहेत. ही कुंभकर्णी झोप उडवण्यासाठीच माऊलीचा आशीर्वाद आम्ही घेत आहोत. पांडुरंग चंद्रभागेच्या काठी अवघ्या एका विटेवर अठ्ठावीस युगे उभा राहून महाराष्ट्रात व देशात घडत असलेल्या बर्यावाईट घटना कमरेवर हात ठेवून पाहत आहे. या काळात महाराष्ट्राच्या उन्नतीच्या व अवनतीच्या अनेक अवस्था त्याने पाहिल्या. मोगली सत्तेच्या वरवंट्याखाली ठेचलेला आणि अगतिक, हतबल झालेला महाराष्ट्र त्याने पाहिला असेल. ‘दार उघड बये दार उघड’ ही नाथांनी मारलेली आरोळी त्यानेही ऐकली असेलच. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा तोरणागडावर फडकवला, त्याला आशीर्वाद दिला असेल. माऊलीने
महाराष्ट्र घडताना आणि बिघडताना
पाहिला. माऊलीने शिवसेनाप्रमुखांची हिंदुत्वाची गर्जना आणि त्यांनी हिंदुत्वाला आणलेली जागही पाहिली. अयोध्येतील ‘बाबरी’चा कलंक शिवसैनिकांनी उद्ध्वस्त केला ते पाहिले आणि देश, धर्म, देवासाठी शिवसेनेने केलेले रणसंग्रामही पाहिला. त्याच शिवसेनेचा मोगलांनी नव्हे तर हिंदुत्वाचे व्यापारी झालेल्या स्वकीयांनी केलेला विश्वासघातही पाहिला. आम्ही त्या विश्वासघाताचीही पर्वा करीत नाही. सत्कार्याच्या पाठीत खंजीर खुपसले जाणे ही कार्याची पावतीच ठरते, पण जनतेला काय मिळाले? सोहराबुद्दीन खून खटल्यातील आरोपी पुरावे नाहीत म्हणून निर्दोष सुटले. त्याचा आनंद आहे, पण ‘आम्ही अयोध्येतच जन्मलो हो’ याचे पुरावे देऊनही रामप्रभू आजही एक वनवासी, अपराधी म्हणून अयोध्येतच बंदिवान आहेत, हे नक्की काय म्हणावे? हा देश त्या अर्थाने विचित्रच म्हणावा लागेल. येथे बोफोर्स आणि राफेलला भाव मिळतो तोदेखील इतका की, अंबानीस एकाच विमान सौद्यात 30 हजार कोटींचा नगदी फायदा होतो, पण शेतकर्याच्या मालास भाव मिळत नाही. कांदा, टोमॅटोचे भाव तळात गेले. पाच-दहा पैसे किलोचाही भाव नाही. मातीमोल भावात कांदा विकला जात आहे. राफेल सौद्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः खास लक्ष घालतात, पण कांद्याचे उत्पादन जास्त झाले म्हणून कांदा जगाच्या बाजारपेठेत पाठवा हे शेतकर्यांचे म्हणणे कुणी ऐकत नाही. साखर कारखाने मोडीत काढून तेथेही बेकारी वाढवण्याचे राजकीय प्रयोग सुरू आहेत. शेतकर्यांचे कर्ज शिवसेनेच्या दबावाने रद्द झाले, पण तरीही नवे प्रश्न उभे आहेत. सरकारने पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाचे टाळ कुटले, पण शेतकरी मात्र कोरडाच राहिला. कर्जमाफीच्या ऑनलाइन प्रकाराचा फटका शेतकर्यांना बसला. आता हे पंढरपूर, सोलापूरचेच प्रकरण घ्या. शेतकर्यांना आता कर्जमाफीचे अर्ज, तूर-हरभरा पीक पेर्याची माहिती, खरीप – रब्बी हंगामातील विम्याची माहिती ‘ऑनलाइन’ भरावी लागत आहे. मात्र ऑनलाइनची पुरेशी जाण नसल्याने, 2017 च्या खरीप हंगामात आधार कार्डची जोडणी नसल्याने अथवा बँक खाते क्रमांक चुकीचा दिल्याने राज्यातील दोन लाख 49 हजार शेतकर्यांचे साधारण वीस कोटी रुपये
सरकारकडे परत
पाठविण्यात आले. दोन वर्षांपूर्वी रब्बी हंगामात पिकांच्या नुकसानीपोटी विमा उतरवलेल्या शेतकर्यांचा शोध न लागल्याने सोलापूर जिल्ह्यातील 1 लाख 32 हजार शेतकर्यांचे 11 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाने सरकारकडे परत पाठवले. तेच आता 2017-18 च्या खरीप हंगामाची रक्कम देताना घडत आहे. हे आकडे फक्त सोलापूर जिल्ह्यातील असतील तर राज्यातील शेतकर्यांच्या तोंडास शेकडो कोटींची पाने नक्कीच पुसली गेली आहेत व शेतकर्यांच्या मुखातून काढलेल्या घासावर सरकारची ‘बाजीरावी’ सुरू आहे. बाजूच्या मध्य प्रदेशात काँग्रेसचे राज्य आले. त्यांचेही दैवत पंढरपूरचा विठोबाच आहे. नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सूत्रे हाती घेताच शेतकर्यांना कर्जमाफी तर केलीच, पण ज्या शेतकर्यांनी वयाची 60 वषें पूर्ण केली अशा दहा लाख शेतकर्यांना महिन्याला 1 हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली. शेतकर्यांना काही कमी पडू द्यायचे नाही व आत्महत्या घडू द्यायची नाही हे त्यांचे धोरण असेल तर आपला महाराष्ट्र नक्की कुठे अडला आहे? आमचा विठोबा मध्य प्रदेशातील शेतकर्यांना पावतो, पण येथील शेतकर्यांवर रुसतो असे मानायला आम्ही तयार नाही. येथील शेतकर्यांनी राजवट उलथवून लावली. नवे राज्य आणले, पण बहुधा तेच राज्य फायद्याचे होते असेच आता ‘माऊली’स वाटत असेल. महाराष्ट्रातील शेतकर्याला संपावर जावे लागले. सरकारने तात्पुरती मलमपट्टी केली, पण पुढे काय, हा प्रश्न कायमच राहिला. पांडुरंग कमरेवर हात ठेवून भक्तांवर आलेली सर्व संकटे फक्त पाहत नाही तर तो भक्तांना लढण्याची प्रेरणा देत असतो. श्रीरामचंद्रांप्रमाणे हाती धनुष्यबाण घेऊन उभा रहा असेच तो सांगत आहे. विठोबा हा आमचा आत्मा आहे. हाच तो आमचा देव, ज्याने महाराष्ट्र एकसंध ठेवला. जातीपातीचे भेद गाडले. मात्र ते राजकारण्यांनी उकरून काढले. गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजुरांचा हाच देव आहे आणि त्याच्याच चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी आम्ही टाकू इच्छितो. याच ठिणगीने आज कोरडी झालेली चंद्रभागा खळखळता प्रवाह घेऊन महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् केल्याशिवाय राहणार नाही.
बोला, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!’
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.