HW News Marathi
राजकारण

Bhima Koregaon : २०१ व्या भीमा-कोरेगाव विजय दिवसाचा संपूर्ण आढावा

पुणे | भीमा-कोरेगाव विजय दिवसाला आज २०१ वर्ष पूर्ण झाली आहेत. भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज (१ जानेवारी) राज्यभरातील लाखो लोकांनी भीमा कोरेगाव येथे गर्दी केली होती. या ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील लोक सोमवारी रात्रीपासूनच पोहोचले होते. गेल्या वर्षी भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या वर्षी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती.

विजय स्तंभाला फुलांची आकर्षक सजावट

ऐतिहासिक विजय स्तंभाला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावेळी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले होते. या विजयस्तंभाच्या परिसरात पुस्तकांचे स्टॉल तसेच मानवंदनेसाठी येणाऱ्या लोकांकरिता अन्नछत्र उघडण्यात आले होते. विजय स्तंभापासून विशिष्ट अंतरावर विविध पक्षांच्या अभिवादन सभांसाठी मंडप तयार करण्यात आले होते.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

गेल्या वर्षी भीमा-कोरेगाव येथे उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेतली जात असल्याचे दिसत आहे. भीमा-कोरेगाव विजय दिवशी एसआरपीएफच्या १२ तुकड्या, १२०० होमगार्ड आणि घातपात विरोधी पथकासह २००० समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांसह कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तासह ४० व्हिडीओ कॅमेरे, १२ ड्रोन आणि तब्बल ३०६ सीसीटीव्हींच्या साहाय्याने या संपूर्ण परिसरावर बारीक नजर ठेवण्यात आली होती. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे

मुंबई उच्च न्यायालायच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून विजय स्तंभाच्या जागेचा ताबा घेण्यात आला आहे. हा ताबा १२ जानेवारीपर्यंत राज्य सरकारकडेच असणार आहे. येथील कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी विजय स्तंभ परिसराच्या जागेचा ताबा मिळण्याबाबत अर्ज पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेली जागा पुन्हा होती तशी करुन देण्यात येणार असल्याची हमी राज्य सरकारने दिली होती. यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य सरकारने यंदाचा हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या नियोजनात पार पाडण्याचे ठरविले.

कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्या !

काही लोक भावना भडकविण्याचा प्रयत्न करतील. मात्र, यंदा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला फेसबुकच्या माध्यमातून केले होते. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी विजयस्तंभाला अभिवादन केले.

विश्वास नांगरे पाटील यांची पत्रकार परिषद

“भीमा-कोरेगाव विजय दिवसासाठी प्रशासन सज्ज असून यावेळी जातीय मुद्दे उकरून काढून असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात येईल”, असे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आधीच स्पष्ट केले होते.

समाजातील जातीभेद नष्ट व्हावा !

१८१८ साली केलेल्या भीमा-कोरेगावच्या लढाईनंतर महार बटालियनने गाजवलेल्या शौर्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटिशांकडून हा विजयस्तंभ उभारण्यात आला होता. या भीमा-कोरेगावच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी या लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या विजयस्तभांला महार रेजिमेंटच्या जवानांनी अभिवादन केले. “समाजातील जातीभेद नष्ट व्हावा”, अशी भावना महार रेजिमेंटच्या जवानांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक जानकरांचा सूर बदलला !

News Desk

राष्ट्रवादीचा जाहीरनामा, सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत चर्चा करणार !

News Desk

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण २३ जानेवारीला! – ॲड. राहुल नार्वेकर

Aprna