मुंबई | यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याची तक्रार भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी पक्षाकडे केली होती. याच पार्श्वभूमीवर आज (२७ डिसेंबर) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपची राज्यस्तरीय बैठक पार पडली. मात्र, या बैठकीवर विखे-पाटलांनी बोलण्यास नकार दिला आहे. ते सर्व अधिकार राम शिंदेंना दिल्याचे म्हणत विखे-पाटील यांनी या बैठकीवर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे, आता पक्षश्रेष्ठींकडून नेमका काय निर्णय होतो ?, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुजय विखे-पाटील तर लोकसभा निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, या दोन्ही विखे-पाटील पितापुत्रांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप आता त्यांच्यावर होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली ही नगर जिल्ह्याची बैठक पार पडली आहे. साधारणतः एक तासभर ही चर्चा चालली. मात्र, पक्षाच्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अनुपस्थित होते. दरम्यान, या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना राम शिंदे यांनी आपण पक्षाच्या भूमिकेवर समाधानी असल्याचे म्हटले आहे. “विखे-पाटील आणि मी प्रथम समोरासमोर बसलो. यावेळी आम्ही दोघांनीही आमचे अनुभव मांडले. त्यावर, पक्ष निरीक्षकांचा अहवाल आल्यावर चित्र स्पष्ट होईल. कोणाला समज द्यायची ? कोणावर कारवाई करायची याबाबतचा निर्णय पक्ष निरीक्षकांच्या अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. त्याचप्रमाणे, सद्यस्थितीत मात्र राज्यातील महाविकासाघडीला शह देण्यासाठी आम्हाला दोघांनाही एकत्र काम करण्याची गरज असल्याचे देखील राम शिंदे यावेळी म्हणाले.