HW News Marathi
राजकारण

सावरकरांवरून शिवसेनेच्या अडचणी वाढवणाऱ्या भाजपला सर्वसामान्यांचा विसर ?

गेल्या अनेक दिवसांपासून वीर सावरकरांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. दिल्लीतील रामलीला मैदानात भाजपविरोधात काँग्रेसने छेडलेल्या भारत बचाव रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि राज्यासह देशभरातून त्यांच्यावर टीकेचे झोड उठली. आणि आज याचेच तीव्र पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. विरोधकांकडून (भाजपच्या आमदारांकडून) या हिवाळी अधिवेशनात सावरकरांच्या मुद्द्यावरून अक्षरशः गदारोळ घातला. ‘मी पण सावरकर’ असे लिहिलेल्या भगव्या टोप्या घालून सभागृहाबाहेर भाजपने मोठे आंदोलन केले, नारेबाजी केली. पण हे सभागृहाबाहेरपर्यंत मर्यादित राहिले नाही. सभागृहात देखील याचे तीव्र पडसाद उमटले. महाविकास आघाडीचे आमदार भाषण निवेदन करत असताना विरोधक त्यांच्यासमोर सावरकरांचे पोस्टर घेऊन उभे राहिले. यामुळे कामकाजात निश्चितच व्यत्यय आला.

यंदाच्या विधानसभेनंतर जवळपास महिन्याभराच्या सत्ता संघर्षानंतर राज्यात महाविकासाआघाडी सरकार स्थापन झाले. राज्याने कधीही न पाहिलेले एक राजकीय समीकरण अस्तित्त्वास आले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या मोठी मतभिन्नता असलेल्या ३ पक्षांनी सरकार स्थापन केले. इतकी वर्षे असलेली मतभिन्नता अचानक संपेल असे होऊ शकत नाही. हे विचारधारांचे अडथळे या सरकारला वेळोवेळी पार करावेच लागणार आहे. याचाच फायदा उचलत आज भाजपचे हिवाळी अधिवेशनात सरकारला आणि विशेषतः शिवसेनेला धारेवर धरले. पण ह्या सगळ्यात राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र मागे पडले, त्याचे काय ?

भाजप या एकाच पक्षात विचारधारांमध्ये किती तफावत ?

शिवसेना, काँग्रेस हे तर दोन वेगवेगळे पक्ष आहेत. विचारधारांमध्ये फरक आहे म्हणूनच तर हे २ स्वतंत्र वेगळे प्रश्न आहेत. पण भाजप या एकाच पक्षात विचारधारांमध्ये किती तफावत आहे ? एकीकडे पंतप्रधानांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते महात्मा गांधींना आपले आदर्श मानतात, दैवत मानतात. मात्र, दुसरीकडे भाजपच्याच एक खासदार महात्मा गांधींवर गोळी झाडणाऱ्या नथुराम गोडसेंवर स्तुतीसुमने उधळतात आणि तरीही त्यांचे पद मात्र कायम राहते, त्याचे काय ? महाराष्ट्रातील या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्याबाबत जेव्हा भाजप बोलते तेव्हा त्यांनी देखील अनेक राज्यांमध्ये भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांशी युती केली आहे, याच त्यांना विसर पडतोय का ?

राज्याच्या विधानसभेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याची गरज आहे का ?

वीर सावरकांबाबत काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका हि नक्कीच भिन्न आहे. त्या दोन्ही पक्षांना ती मेनी आहे. राहुल गांधींनी ते वक्तव्य केल्यानंतर तातडीने शिवसेनेकडून त्याबाबत काँग्रेस इशारा देखील देण्यात आलाय आणि टीका देखील करण्यात आलीये. शिवसेनेने सावरकरांबाबतची भूमिका कायम ठेवली आहे. तरीही जर भाजपला असे वाटत असेल कि शिवसेनेची हि भूमिका नरमाईची, सौदेबाजीची किंवा लाचारीची आहे तर त्यांच्याकडे अन्यत्र आंदोलने करून त्याबाबत निषेध व्यक्त करण्याचा अधिकारही आहे. त्यासाठी राज्याच्या विधानसभेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याची गरज आहे का ?

सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र मागे पडले, त्याचे काय ?

शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सुरक्षा, शहरी विकास, ग्रामीण विकास, राखडलेले प्रकल्प अशा राज्यात अनेक मोठ्या समस्या आहेत, सामान्य माणसांशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यावर बोलणे, चर्चा करणे मार्ग काढणे हे राज्यातील सरकारसाठी प्राध्यान्य क्रमवार असायला हवे. विरोधी पक्षाने सामान्यांचे प्रश्न, त्यांची बाजू, त्यांच्या समस्या मांडण्याची नितांत आवश्यकता असताना भाजप मात्र विचारधारांमधील असलेल्या तफावतीचा फायदा घेऊन कुठेतरी शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताना सामान्यांच्या प्रश्नाशी तडजोड करतेय का ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक ‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक सामनातून पवारांवर टीका

News Desk

तब्बल ४ वर्षांनंतरही परळी-धायगुडा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था कायम

News Desk

केवळ नरेंद्र मोदीच एक मजबूत सरकार देऊ शकतात !

News Desk