HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

रोज उठून पक्षविरोधी कारवाया चालणार नाहीत !

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने १२ डिसेंबर रोजी परळीतील गोपीनाथ गडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १ डिसेंबर रोजी पंकजा मुंडे यांनी लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे त्या १२ डिसेंबरला नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. दरम्यान, यावेळी भाजप नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षातील काही नेत्यांप्रती उघडपणे नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे ही नाराजी व्यक्त होत असताना तिथे खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यामुळे, परळीत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात भाष्य केले आहे.

“पक्षविरोधी कारवाया केलेल्यांची गय केली जाणार नाही. केंद्रापासून गल्लीपर्यंत आता खूप कडक वातावरण तयार झालेले आहे. तुम्ही पाहिले कि विधानसभेतही कोणाची गय केली गेली नाही. तशीच यापुढेही केली जाणार नाही. काय बोलायचे असेल ते आमच्याशी बोला. आपण मार्ग काढू. पण रोज उठून पक्षविरोधी कारवाया चालणार नाहीत”, असा स्पष्ट इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरमधील या कार्यक्रमात दिला आहे.

बंड हे आपल्या लोकांविरुद्ध करायचे नसते !

“पंकजाताईंनी परळीतील बोलताना असे म्हटले कि, त्या त्या वेळी कोणीतरी बंड केले म्हणून न्याय मिळाला. यावेळी त्यांनी मोठी यादी सांगितली. पण शिवाजी महाराजांनी केलेले बंड मोगलांविरुद्ध होते, वीर सावरकरांनी केलेले बंड इंग्रजांविरुद्ध होते. त्यामुळे, बंड हे आपल्या लोकांविरुद्ध करायचे नसते, तर चर्चा करायची असते”, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी पंकजा मुंडेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

मी गेलो नसतो तर …!

आपण परळीतील गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला जाण्यामागचे कारण देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. “अनेकांनी मला सुचविले कि परळीत जाऊन काय होईल माहित नाही, बोलू देतील कि नाही माहित नाही, तुमच्यावर अंडी फेकतील. पण मी ठरवले कि, मी जाणार. मी तिथे गेलो आणि संवाद झाला. आज जे चित्र आहे ते जरी थोडेफार मनाला वेदना देणारे असले तरीही जर मी गेलो नसतो, संवाद झाला नसता तर आणखी तीव्र स्वरूप निर्माण झाले असते. परंतु, संवाद झाला त्यामुळे अनेक गोष्टी निवळल्या”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Related posts

विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा ढोल फुटणार | गिरीश महाजन

News Desk

फडणवीस पवारांची राजकीय जुगलबंदी

News Desk

एसटी बसेस, बस स्टॉपसह सार्वजनिक ठिकाणच्या सरकारी जाहिराती तात्काळ काढा !

News Desk