June 26, 2019
HW Marathi
राजकारण

राजकीय सुडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रारी !

मुंबई | जगमित्र शुगर मिल्ससाठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमिनी कुणाचीही फसवणुक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र शेतकर्‍यांना व बँकांना ५४०० कोटी रूपयांना बुडवणार्‍या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावून धरल्याने त्यांचे जावाई असलेल्या राजाभाऊ फड यांच्याकडून राजकीय सुडबुध्दीने न्यायालयाची दिशाभूल करून माझ्याविरूध्द खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

जगमित्र शुगर मिल्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी सांगितले. मी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतो म्हणूनच जाणीवपूर्वक प्रत्येक अधिवेशनाच्या तोंडावर माझ्याविरुद्ध असे खोटे कारस्थान रचण्यात येत आहे, असा आरोपही मुंडे यांनी केला आहे.

चुकीच्या माहितीवरून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे, कागदोपत्री पुरावे व महसूल कागदपत्रे आपल्या बाजुने आहेत. या प्रकरणी यापूर्वीच आपल्यावर अंबाजोगाई न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेले असताना राजकीय त्रास देण्याच्या हेतूने एकाच प्रकरणामध्ये वारंवार नाव बदलून न्यायालयाची दिशाभूल करून, खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

तक्रारदार राजाभाऊ फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावाई आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी ५४०० कोटी रूपयांची शेतकरी व बँकांची फसवणूक केली. या प्रकरणी आपण आवाज उठवल्यामुळेच राजकीय सुडबुध्दीतून त्यांचे जावाई आपल्या विरूध्द न्यायालयात वारंवार तक्रारी करत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयात आपल्याला नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Related posts

अजब जाहिरात…. प्रचाराला मुले भाड्याने मिळतील?

News Desk

अमेठीत भाजपच्या स्मृती इराणींची आघाडी, काँग्रेसच्या वर्चस्वाला धोका ?

News Desk

महाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार

News Desk