HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#Elections2019 : जाणून घ्या…ठाणे मतदारसंघाबाबत

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. महाराष्ट्रातील मतदानाचे ३ टप्पे पार पडले आहेत. आता केवळ १ टप्पाच शिल्लक आहे. २९ एप्रिलला हा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडेल. आज आपण याच चौथ्या टप्यातील ठाणे मतदार संघाबाबत जाणून घेणार आहोत. ठाणे लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यामध्ये मीरा-भाईंदर, ओवळा-माजिवाडा, कोपरी, पाचपखाडी, ठाणे आणि ऐरोली या मतदार संघांचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

यंदा ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंद परांजपे आणि वंचित बहुजन आघाडीचे मलिक्कार्जुन पुजारी हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि आपक्ष मिळून एकूण २३ उमेदवार ठाण्यातून लोकसभेच्या मैदानात आहे.

ठाण्यामध्ये २०१४ ची स्थिती

ठाण्यामध्ये २०१४ साली शिवसेनेचे राजन विचारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजीव नाईक, मनसेचे अभिजीत पानसे लोकसभेसाठी उभे होते. त्यापैकी शिवसेनेच्या राजन विचारे यांना ५,९५,३६४ इतकी मतं मिळून त्यांचा विजय झाला होता. तर राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांना ३,१४,०६५ इतकी मतं मिळाली होती. यांच्या मतांचा फरक पहिला तर २,८१,२९९ इतक्या मतांनी शिवसेनेच्या राजन विचारे यांचा विजय झाला होता. तर मनसेच्या अभिजीत पानसे यांना ४८,९६३ इतकी मतं मिळाली होती. यांच्या मतांची टक्केवारी पहिली तर शिवसेनेला २८%, राष्ट्रावादी काँग्रेसला १५ % तर मनसेला केवळ २ टक्के मतं मिळाली होती.

ठाणे मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या

ठाण्यामध्ये एकूण १९,२७,६०८ इतके मतदार आहेत. येथील महिला मतदारांची संख्या ८,८६,६३१ इतकी आहे. तर १०,४०,७९३ इतकी पुरुष मतदारांची संख्या आहे.

ठाणे मतदारसंघाचा इतिहास

ठाण्याचा इतिहास पहिला तर याआधी सलग १३ वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ मध्यंतरी काँग्रेस-राष्टवादी आघाडीकडे गेला होता. मात्र, आता पुन्हा येथे शिवसेनेची सत्ता आहे. येथील विधानसभेची स्थिती पाहता ६ पैकी ३ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची सत्ता आहे. गेल्या ५ वर्षात येथील चित्र फरसे सकारात्मक नसल्याचे बोलले जाते.

येथील वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक सुविधांचा अभाव ,शासकीय रुग्णालय व्यवस्था, मेट्रो, खाडी पर्यायी मार्ग अशी कामे अजूनही प्रलंबितच आहेत. ही सर्व पार्श्वभूमी पाहता आता यावेळी ठाण्यातून उभे असलेले राजन विचारे आणि आनंद परांजपे या दोघांपैकी येथील मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

Related posts

मला जिवे मारण्याचा कट । तेज प्रताप यादव

News Desk

पंतप्रधान मोदींविरोधात वाराणसीमधून काँग्रेसने अजय राय यांना पुन्हा दिली उमेदवारी

News Desk

“या प्रकरणात केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार की गृहमंत्र्यांचीही होणार?”, फडणवीसांचा पवारांना सवाल

News Desk