मुंबई | समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता स्वतः अबू आझमी यांनी याबाबत स्पष्टीकरण देत फरहान आझमी यांच्या वक्तव्याविषयी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “फरहान जरी माझा मुलगा असला तरीही त्याचा समाजवादी पक्षाशी काहीही संबंध नाही. फरहानचे ते वक्तव्य हे त्याचे वैयक्तिक मत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आम्ही सर्वजण पाठिंबा देतो.”, असे स्पष्टीकरण अबू आझमी यांनी दिले आहे.
“फरहान माझा मुलगा जरूर आहे. मात्र, समाजवादी पक्षाशी त्याचे काहीही देणे-घेणे नाही. तो त्याचा व्यवसाय सांभाळतो. बाबरी मशिदीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. मुस्लिम पर्सनल बोर्ड यासंबंधी जो काही निर्णय घेतात त्या निर्णयासोबत आम्ही कायम असतो. मात्र, फरहानने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत केलेले वक्तव्य हे त्याचे वैयक्तिक मत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आम्ही सर्वजण पाठिंबा देतो. भाजपला लाथ मारून काँग्रेस-राष्ट्रवादीसह आमच्या सर्वांसोबत सरकार स्थापन करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय अगदी योग्य. हे सरकार ५ नव्हे तर १० वर्षे टिकेल असाच आमचा प्रयत्न राहील”, असे अबू आझमी म्हणाले.
“जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील, तर आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत जाऊ. ते तिथे राम मंदिराची उभारणी करतील आणि आम्ही बाबरी मशिद बांधू”, असे वादग्रस्त विधान फरहान आझमी यांनी एक कार्यक्रमात बोलताना केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, फरहान आझमींनी हे विधान केले होते. मात्र, त्या वक्तव्यानंतर अबू आझमी यांनी स्पष्टीकरण देताना याबाबत नाराजी व्यक्त करत “ही आपल्या पक्षाची भूमिका नसून अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयालाचा निर्णय झालेला आहे”, असे म्हटले आहे.