HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करणार !

मुंबई | महाविकासआघाडीकडून शनिवारी (३० नोव्हेंबर) विधानभवनात बहुमत सिद्ध करण्यात आल्यानंतर आज (१ डिसेंबर) विधानसभा स्थायी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले आणि विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, आज विधानसभेच्या या विशेष अधिवेशनात विधानसभेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिभाषण झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले आहे. यावेळी, राज्यपालांनी मराठीतून अभिभाषण करत राज्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधले.

राज्यपालांच्या अभिभाषणात महत्त्वाचे मुद्दे
  • “पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे राज्याला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्याचप्रमाणे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सहाय्य देण्यासाठी माझे सरकार वचनबद्ध आहे. माझ्या सरकारला या अवकाळी संकटाची व शेतकऱ्यावर ओढवलेल्या आपत्तीची जाणीव आहे. माझे सरकार शेतकऱ्याला कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करेल”, असे आश्वासन यावेळी राज्यपालांनी दिले आहे.

 

  • “माझ्या सरकारला ग्रामीण क्षेत्रातील दुरावस्था दूर करण्याची गरज असल्याची जाणीव असून माझे सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल. शेतमालाच्या भावांमधील चढ-उतारांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. ते टाळण्यासाठी शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने माझे सरकार यथोचित उपाययोजना करेल. मराठवाड्यातील व विशेषतः विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये शाश्वत पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी उपाययोजना हाती घेईल”, असेही राज्यपाल आपल्या अभिभाषणात म्हणाले.

 

  • “माझ्या सरकारला राज्यातील वाढत्या बेरोजगारीबाबत आणि परिणामी युवकांमध्ये निर्माण झालेल्या भावनांची, अवस्थेची चिंता आहे. माझे सरकार राज्यातील रोजगार निर्मितीसाठी तसेच सार्वजनिक सेवा जलद गतीने पुरविण्यासाठी, राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करेल. वाढती बेरोजगारी ही या सरकारची प्रमुख चिंता असून खाजगी क्षेत्रातील रोजगारांमध्ये भूमीपुत्रांसाठी आरक्षण ठेवण्यासाठी आम्ही कायदा करणार आहोत”, असेही राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केले.

 

  • “प्रगतिशील समाज हा महिलांना संधी देतो. महिलांच्या सुरक्षेस माझ्या सरकारमध्ये सर्वोच्च प्राधान्य असेल. त्यासाठी, माझ्या सरकारकडून महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. शिक्षण महागडे झाल्यामुळे सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. माझे सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींसाठी महाविद्यालयीन उच्च शिक्षण मोफत देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेल. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सुरक्षित राहण्याची सोय पुरविण्यासाठी, त्याचप्रमाणे स्त्रियांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल”, असेही यावेळी राज्यपालांनी म्हटले आहे.

 

  • “माझे सरकार राज्यातील ८ लाख बचत गटांच्या कौशल्यविकासासाठी प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे, शिक्षण आरोग्य विकासावर लक्ष केंद्रीत केले जाईल. माझे सरकार नगरपरिषद, नगरपालिका यांच्यासाठी मुख्यमंत्री रस्ते निर्माण योजना, झोपडपट्टी पुनर्वसन इत्यादी योजना राबवेल. माझे सरकार सर्वसामान्यांना परवडतील असे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करेल”, असेही आश्वासन यावेळी राज्यपालांनी दिले आहे.

Related posts

गिरीश बापट यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली | उच्च न्यायालय

News Desk

उद्धव ठाकरेंच्या विमानासमोर नीलगाय, थोडक्यात टळला अनर्थ

News Desk

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Prathmesh Gogari