HW Marathi
राजकारण

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतला अखेरचा श्वास

मुंबई | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज (१७ मार्च) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिली होती. मात्र, आता मनोहर पर्रीकर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त देत शोक व्यक्त केला आहे. मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीविषयी शनिवारपासूनच (१६ मार्च) अनेक उलट-सुलट अफवा पसरविल्या जात होत्या.

मनोहर पर्रीकर यांचा अल्प परिचय

मनोहर पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ साली म्हापसा येथे झाला. मडगावच्या लॉयल हायस्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर इ.स. १९७८ साली त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथून धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आय.आय.टी. ची पदवी घेतलेले पर्रीकर हे पहिले मुख्यमंत्री आहेत. पर्रीकर आणि नंदन निलेकणी हे आय.आय.टी तील वर्गमित्र आहेत. पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. १४ मार्च २०१७ रोजी मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नोव्हेंबर २०१४ साली, पर्रिकर यांना अरुण जेटलींऐवजी प्रतिरक्षा मंत्री म्हणून निवडण्यात आले.

मनोहर पर्रीकर हे शेवटपर्यंत आपले काम निष्ठेने करीत राहिले 

मनोहर पर्रीकर गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. विदेशात त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. भारतात परतल्यानंतर मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती. गंभीर आजाराने ग्रस्त असून मनोहर पर्रीकर हे शेवटपर्यंत आपले काम निष्ठेने करीत होते. पर्रीकर यांची प्रकृती नाजूक असतानाही त्यांनी निर्माणाधीन पुलाची पाहणी केली, विधानसभेतही काम केले. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांना पूर्णवेळ झोपून राहावे लागत होते. त्यांचे बीपी लो होत होते. त्यामुळे काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.

 

Related posts

आता अण्णा हजारे उपोषण मागे घेणार ?

News Desk

राम मंदिरासाठी कायदा करा, सरसंघचालक भागवतांचे वक्तव्य

News Desk

मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल करते !

News Desk