HW News Marathi
राजकारण

“…सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील”, सामनातून बंड पुकारलेल्या आमदारांना इशारा

मुंबई | ‘शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा,’ अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र सामानातून बंड पुकारलेल्या आमदारांवर इशारा दिला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेता एकनाथ शिंदे आणि 35 आमदारांनी बंड पुकारल्याने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळू निघाले आहे. या पार्श्वभूमी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (23 जून) फेसबुक लाईव्हद्वारे बंड पुकारलेले नेते आणि राज्यातील जनतेशी संवाद शाधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब वर्षा शासकीय निवासस्थान सोडून मातोश्रीमध्ये राहण्यास गेले आहे.

सामानत नेमके काय म्हणाले

राज्यसभा , विधान परिषद निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात आपले महामहिम राज्यपाल श्रीमान कोश्यारी यांना कोरोनाने ग्रासले. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांची राजभवनातील लगबगही थोडी थांबली. राज्य सरकारचे नक्की काय होणार? यावर पैजा लागल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली, सरकार संकटात आले, आता काय होणार? यावर चर्चा झडत आहेत. राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला व नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये. सुरतमध्ये ज्या हॉटेलात हे ‘महामंडळ’ होते, तेथे महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. पुन्हा सुरतवरून हे लोक आसामला जाताच गुवाहाटी विमानतळावर आसामचे मंत्री स्वागतास हजर होते. यामागचे पेच-डावपेच न समजण्याइतकी राज्याची जनता खुळी नाही. हॉटेल्स, विमान, गाडय़ा, घोडे, विशेष सुरक्षा व्यवस्था ही भाजप सरकारचीच कृपा नाही काय? आम्हाला तर भारतीय जनता पक्षाच्या नैतिक अधिष्ठानाचे कौतुकच वाटते. कालपर्यंत भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या शिवसेना आमदारांवर हल्ले करणारे, त्यांना

ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा

धाक दाखवून, ”आता तुमची जागा तुरुंगात” असे बोलणाऱ्या किरीट सोमय्यांचे यापुढे कसे होणार? हे सर्व आमदार कालपासून भाजपच्या गोटात शिरले आहेत व दिल्लीतील राजकीय गागाभट्टांनी त्यांना पवित्र, शुद्ध करून घेतले आहे. आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल असे दिसते. नितीन देशमुख हे अकोल्याचे आमदार सुरतवरून मुंबईस परतले व त्यांनी जे घडले, त्याबाबत धक्कादायक असे सत्यकथन केले. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गुप्त बैठका सुरू केल्या आहेत. मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर उत्साहाच्या लाटा उसळल्या असून लाटेचा फेस अनेकांच्या नाकातोंडात गेला आहे, पण भाजप कोणाच्या बळावर सरकार स्थापन करू इच्छिते? नगरविकास मंत्री शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आधी मुंबईत यावे लागेल. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाराष्ट्रीय जनतेच्या नजरेस नजर भिडवून विधान भवनाची पायरी चढावी लागेल. शिवसेनेने उमेदवारी देऊन मेहनतीने निवडून आणले व आता शिवसेनेशी बेइमानी का करीत आहात? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. विधिमंडळात काय व्हायचे ते होईल, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिखरावर आहे. लोकमानसात उद्धव ठाकरे प्रिय आहेत. शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. त्याचमुळे ‘वेगळा गट’ करून

आसामात गेलेल्या

लोकांना आमदार-नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार व नामदार पुन्हा स्वगृही परत येतील. प्रवाहात सामील होतील. आज जे भाजपवाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा कचऱ्यातच फेकून देतील. भाजपची परंपरा तर हीच आहे. त्यामुळे कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न कुणाला पडलेच असेल तर तो त्यांचा स्वप्नदोष. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले. शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!

संबंधित बातम्या
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिंदेंच्या मनात बंडाचे बीज मी पेरले”, विजय शिवतारेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Aprna

शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका !

News Desk

संघासाठी भारतातील १३० कोटी जनता हिंदूच !

News Desk