HW Marathi
राजकारण

काही शरम असेल तर महापौर, मनपा आयुक्तांची हकालपट्टी करा !

मुंबई | “मुंबई हे शासन आणि महापालिका पुरस्कृत अपघातांचे शहर झाले आहे. भाजप, शिवसेनेच्या भ्रष्ट आणि दळभद्री कारभारामुळे मुंबईकरांचे जगणे कठीण आणि मरण सोपे झाले आहे. सातत्याने पूल कोसळण्याच्या आणि आगींच्या घटनांमध्ये मुंबईकर मारले जात आहेत ? या निर्लज्ज आणि बेजबाबदार कारभाराची जबाबदारी देखील घेतली जात नाही. हे अत्यंत संतापजनक असून भाजप शिवसेनेला जराही शरम असेल तर महापौर आणि मनपा आयुक्तांची तात्काळ हकालपट्टी करावी”, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

भाजप शिवसेनेच्या दृष्टीने मुंबईकरांचे जीवन एवढे स्वस्त झाले आहे का ? असा संतप्त सवाल देखील यावेळी अशोक चव्हाण यांनी केला आहे. “मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. ६ महिन्यांपूर्वी ज्या पुलाचे सुरक्षा ऑडिट करून पुलाला सुरक्षित घोषित केले होते, तोच पूल काल पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सहा लोकांचा मृत्यू झाला व तीस पेक्षा जास्त मुंबईकर गंभीर जखमी झाले आहेत. या पुलाचे ऑडिट कोणी केले ? या ऑडिटमध्येही कमिशन घेतले का ?”, असे सवाल चव्हाण यांनी केले आहेत.

“मुंबईकरांच्या जन्म दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी बकासुराप्रमाणे पैसे खाल्ले जातात. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्ट नेत्यांना कामाचा दर्जा चांगला राखण्याऐवजी कमीशन खाण्यातच जास्त रस आहे, हे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे यांना जराही शरम असेल तर तात्काळ महापौर व आयुक्तांची हकालपट्टी करून सर्व पादचारी पुलांचे पुन्हा ऑडिट करावे. तसेच या घटनेला जबाबदार असणा-या दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी”, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Related posts

पालकमंत्री राम शिंदे यांचा शेतक-यांना अजब सल्ला !

News Desk

राहुल बाबा तुम्हाला आकडेवारी येत नाही ?

News Desk

उद्याच सादर होणार मराठा आरक्षणाचा एटीआर

News Desk