HW News Marathi
राजकारण

रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते!

मुंबई । नरभक्षक म्हणून बदनाम झालेल्या ‘अवनी’ वाघिणीस अखेर गोळ्या घालून ठार करण्यात आले. अवनीस का मारले यावर आता प्राणिमित्रांमध्ये वाद सुरू झाला आहे. यवतमाळ जिह्यातील पांढरकवडा जंगलातील या वाघिणीने हैदोस घातला होता हे खरे. दोन वर्षांत तिने 13 जणांचा जीव घेतला. ही वाघीण पाच वर्षांची होती व तिने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला होता.

माणसाने वाघांच्या प्रदेशात घुसखोरी केली. जंगले तोडली, जाळली. डोंगर फोडले. त्यामुळे वाघांचे जगणे हराम झाले. एवढे सगळे झाल्यावर तुम्ही त्यांच्याकडून कोणत्या माणुसकीची अपेक्षा करता? बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात व आसपास बिबटे मनुष्यवस्तीत शिरतात व अनेकदा बळी घेतात. कारण राष्ट्रीय उद्यानात मनुष्यवस्ती वाढली. तुम्ही वाघांच्या जागेवर अतिक्रमण केल्यावर वाघ तुमच्यावर आक्रमण करणारच.ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारले. रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांन सामनाच्या संपादकीयमधून भाजप सरकारवर टीका केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

नरभक्षक म्हणून बदनाम झालेल्या ‘अवनी’ वाघिणीस अखेर गोळ्या घालून ठार करण्यात आले. अवनीस का मारले यावर आता प्राणिमित्रांमध्ये वाद सुरू झाला आहे. यवतमाळ जिह्यातील पांढरकवडा जंगलातील या वाघिणीने हैदोस घातला होता हे खरे. दोन वर्षांत तिने 13 जणांचा जीव घेतला. ही वाघीण पाच वर्षांची होती व तिने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला होता. हे दोन्ही बछडे आता निराधार झाल्याचे दुःख वन्य जीवप्रेमींनी व्यक्त केले आहे. अवनी वाघीण नरभक्षक झाली. पण वाघ, सिंह हे नरभक्षक झाले व त्यांनी मनुष्यप्राण्यांवर झडप घातली यात आश्चर्य वाटावे असे काय आहे? सापाच्या बिळात हात घातल्यावर तो डंख मारणारच. सापाच्या शेपटीवर पाय ठेवताच तो काय तुम्हाला गुदगुल्या करणार आहे? वन्य प्राण्यांचेही तेच आहे. माणसाने वाघांच्या प्रदेशात घुसखोरी केली. जंगले तोडली, जाळली. डोंगर फोडले. त्यामुळे वाघांचे जगणे हराम झाले. एवढे सगळे झाल्यावर तुम्ही त्यांच्याकडून कोणत्या माणुसकीची अपेक्षा करता? बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात व आसपास बिबटे मनुष्यवस्तीत शिरतात व अनेकदा बळी घेतात. कारण राष्ट्रीय उद्यानात मनुष्यवस्ती वाढली. तुम्ही वाघांच्या जागेवर अतिक्रमण केल्यावर वाघ तुमच्यावर आक्रमण करणारच. त्यामुळे वाघांना ‘नरभक्षक’ म्हणून गोळ्या घालण्यापेक्षा मनुष्याने स्वतःस शिस्त लावणे गरजेचे आहे. निदान आता ‘अवनी’च्या निमित्ताने तरी या प्रश्नाचा सरकारी पातळीवर एकत्रितपणे आणि साकल्याने विचार व्हायला हवा. हे काम वन खात्याचे जसे आहे तसे इतर सरकारी खात्यांचेही आहे. एरवी राज्यकर्ती मंडळी सर्वांना घर, ‘घर घर शौचालय’ वगैरे घोषणांचे ढोल पिटत असतात, पण वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या सावटाखाली एकेक क्षण जगणाऱ्या जनतेला द्या ना त्यांचे हक्काचे सुरक्षित घर. करा त्यांच्या शौचालयाची व्यवस्था. मात्र फक्त

घोषणांचीच जुमलाबाजी

सुरू असल्याने ‘अवनी’सारख्या घटना घडतात आणि मग वन्य प्राण्यांना ‘नरभक्षक’ ठरवून त्यांचा बळी घेतला जातो. अवनी वाघिणीची हत्या देशभरात गाजते आहे. वाघिणीने गावात घुसून हल्ला केला. त्यात 13 जण मेले. या 13 जणांपैकी फक्त तिघांचे ‘पोस्टमॉर्टम’ झाले आणि त्यातील एकाचीच वाघिणीने हत्या केल्याचे पुरावे अवनीभक्तांनी दिले. शिवाय वाघिणीस ठार करण्याआधी ‘भूल’ द्यायला हवी होती. म्हणजे बेशुद्ध करून मारायला हवे होते, पण वाघीण अंगावर आल्यामुळे तिला थेट गोळ्याच घालण्यात आल्या असा दावा वन खाते करीत आहे. वन खात्याच्या या दाव्यालाही प्राणिमित्र संघटनांनी आता आव्हान दिले आहे. अवनी वाघिणीला गोळ्या घालण्यासाठी हैदराबादहून खास एका एन्काऊंटर स्पेशालिस्टला पांढरकवड्यास बोलावण्यात आले होते. म्हणजे मुंबईतील गुंडांचे जसे एन्काऊंटर मधल्या काळात होत असे व अनेक ‘चकमक’फेम अधिकारी नंतर वादाच्या भोवऱ्यात सापडत तसे आता अवनीच्या चकमकीचे झाले आहे. पुन्हा एवढ्या काळोखात, धावपळीत त्या ‘शूटर’ने बरोबर अवनीच्या वर्मी गोळी कशी मारली हा प्रश्नही उरतोच. आता तर खुद्द केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीच ‘अवनी’ची निर्घृण हत्या झाल्याचे आणि हा एक मोठा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर ज्या शूटरने अवनीला गोळ्या घातल्या त्याचे वडील शाफत अली खान यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांनी आतापर्यंत तीन वाघ, दहा बिबटे आणि काही हत्ती मारले आहेत. तरीही महाराष्ट्र सरकारने अवनीच्या एन्काऊंटरची सुपारी अशा माणसाला का दिली असा सवाल करत मनेका यांनी शाफत हे अवैध शस्त्रे पुरविणारे राष्ट्रविरोधी आहेत असाही गंभीर आरोप केला आहे. मनेका यांचा हा संताप महाराष्ट्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा आहे. या आरोपांचा पटेल असा खुलासा राज्यकर्त्यांनीच करायचा आहे. कारण

आरोप करणारे आणि ‘आरोपी’

एकाच पक्षाचे आहेत. एका बाजूला वाघाचे काळीज असलेले मनुष्यप्राणी महाराष्ट्रातून अस्तंगत होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष वाघांनाही खतम केले जात आहे. हिंदुस्थानच्या जंगलातून वाघ कमी होत आहेत व ‘वाघ बचाव’ आंदोलन सर्वच पातळय़ांवर सुरू असताना अवनीस ठार केले गेले. कश्मीरात पाक घुसखोरांना मोकाट सोडणाऱ्यांनी काळोखात दबा धरून अवनीस गोळ्या घातल्या. म्हणजे खरे वाघ मारायचे आणि नंतर खोटे वाघ घेऊन फिरायचे. अवनीने म्हणे 13 माणसे खाल्ली म्हणून तिला जिवंतपणी गोळ्या घातल्या, पण महाराष्ट्रात विविध स्तरांवर नरभक्षण सुरूच आहे. ज्या पांढरकवड्यात अवनीस मारले, म्हणजे 13 जणांच्या मृत्यूचा ठपका ठेवून मृत्युदंड दिला त्याच यवतमाळ-पांढरकवडा परिसरात सरकारी नादानीमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या. कीटकनाशकांमुळे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचे बळी यवतमाळमध्ये गेले. त्यातील गुन्हेगारांना कोणी अवनीप्रमाणे कठोर शिक्षा दिल्याचे दिसले नाही. दुष्काळ, उपासमार, कुपोषण, सरकारी अनास्था, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण यामुळेही या राज्यात माणसे मरत आहेत, स्वतःचे जीवन संपवून घेत आहेत. मात्र त्यासाठी कोणी सरकारी व्यवस्थेला ‘नर’भक्षक ठरवत नाही. सगळेच मूग गिळून गप्प बसतात, वन्य प्राण्यांना मात्र ‘नरभक्षक’ ठरवून त्यांना शिक्षा दिली जाते. वाघ, सिंह, बिबटे वगैरेंना जंगलांमधून विस्थापित करणाराही माणूसच आहे आणि नंतर माणसावर हल्ले केले म्हणून त्यांना ‘नरभक्षक’ ठरवून गोळ्या घालणाराही माणूसच आहे. त्यानेच आता अवनीला रात्रीच्या अंधारात ठार मारले. अवनी, तू याच मानवी स्वार्थाची बळी ठरलीस. ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारले. रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली; सर्व प्रशासकीय बैठका रद्द

Aprna

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने भोसरी MIDC मधील धक्कादायक प्रकार आणला उघडकीस

News Desk

अशोक चव्हाण २ मे रोजी नाणारच्या दौ-यावर

News Desk