HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय?

मुंबई | बेळगावातील मराठी भाषिक तरुणांवर कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी जो अमानुष लाठीहल्ला चढवला त्याची दृश्ये बघून महाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय? कर्नाटक सरकार राज्यभरात राज्यनिर्मितीचे सोहळे साजरे करत असताना बेळगावातील मराठी भाषिक तरुणांनी सीमाबांधवांची गळचेपी करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून काळा दिवस पाळण्याचे ठरवले त्यात गैर ते काय? सीमाभागात दरवर्षीच कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरुद्ध असा काळा दिन पाळण्यात येतो.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचे समन्वयक असलेले मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मागे बेळगावातील एका कार्यक्रमात ‘हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकू’ हे कानडी गीत गायिले होते. ‘जन्म घ्यावा तर कर्नाटकमध्येच’ असा या गीताचा अर्थ. ज्या पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकातच जन्म घेण्यात धन्यता वाटते त्यांच्याकडून सीमा बांधव आणि महाराष्ट्राने अपेक्षा तरी काय करावी!, शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेळगावात काळा दिवस पाळण्यात आल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी जो अमानुष असा लाठीहल्ल त्यावर भाष्य करताना समस्त महाराष्ट्रातील जनमाणसाला महाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय? असा सवाल विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरेंनी महाराष्ट्राने अपेक्षा तरी काय करावी असा उपरोधात्मक टोला भाजला हाणला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

बेळगावातील मराठी तरुणांवर कानडी पोलिसांनी केलेल्या निर्दयी लाठीहल्ल्याची दृश्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बघितली आहेत काय? आणि बघितली असतील तर मराठी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचे रक्त उसळणार आहे काय? कर्नाटकात भाजपचे सरकार असतानाही मराठी भाषिकांची अशीच डोकी फोडली जात होती तेव्हा महाराष्ट्रातील भाजपच्या तमाम नेतेमंडळींनी तोंडाला कुलूप लावले होते. कर्नाटकातील सत्ता गेल्यानंतर तरी हे कुलूप उघडायला हरकत नाही.

बेळगावातील मराठी भाषिक तरुणांवर कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी जो अमानुष लाठीहल्ला चढवला त्याची दृश्ये बघून महाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय? कर्नाटक सरकार राज्यभरात राज्यनिर्मितीचे सोहळे साजरे करत असताना बेळगावातील मराठी भाषिक तरुणांनी सीमाबांधवांची गळचेपी करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून काळा दिवस पाळण्याचे ठरवले त्यात गैर ते काय? सीमाभागात दरवर्षीच कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरुद्ध असा काळा दिन पाळण्यात येतो. बेळगावातील मराठी तरुणांनी या काळ्य़ा दिनी सायकल रॅली काढून कर्नाटकचा निषेध नोंदवला आणि लोकशाही मार्गाने महाराष्ट्रात जाण्याची मागणी केली तर कानडी सरकार आणि पोलिसांचे एवढे पित्त खवळण्याचे कारणच काय? रॅली काढली म्हणून कानडी पोलिसांनी अक्षरशः कडे करून रॅलीतील मराठी तरुणांवर हल्ला चढवला. अमानुष मारहाण केली. कर्नाटक सरकारची ही ठोकशाही लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसते? एरव्ही कश्मीरात जवानांनी अतिरेक्यांना गोळ्या घातल्या तर लगेच गळे काढणारे ‘मानवी हक्क’वाले अशा वेळी कुठे दडी मारून बसतात? मराठी भाषिकांना तोंडच उघडू द्यायचे नाही असा निर्णय कर्नाटकने घेतला आहे काय? कर्नाटकने तसे ठरवलेच असेल तर महाराष्ट्रालाही ठोस भूमिका घ्यावीच लागेल. सीमाभागातील

मराठी तरुणांवर बरसणाऱ्या

कानडी काठय़ा आणि रक्तबंबाळ होणाऱ्या मराठी भाषिकांना बघून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचे रक्त उसळायला हवे. महाराष्ट्रातील कानडी, बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह बहुसंख्य मराठी भाषिक असलेला मोठा भूप्रदेश गिळंकृत करणाऱ्या कर्नाटकचा स्थापना दिवस दरवर्षीच 1 नोव्हेंबरला साजरा होत असतो. तो त्यांनी जरूर साजरा करावा. त्यांच्या त्या कानडी भाषेत आपल्या राज्याच्या ज्या काही आरत्या ओवाळायच्या असतील त्या ओवाळायला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. मात्र दरवर्षी ‘कर्नाटक दिन’ साजरा करत असताना सीमाभागातील मराठी भाषिकांची टाळकी फोडायचीच असा काही धोरणात्मक निर्णय कर्नाटकने घेतला असेल तर कानडी सरकारचे डोके ठिकाणावर आणणारा जालीम उपाय शोधावाच लागेल. खरे तर महाराष्ट्राने कधीच कर्नाटकचा हेतूतः द्वेष केला नाही. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात कानडी भाषिक लोक उद्योगधंदे, व्यापार आणि कामधंद्यानिमित्ताने स्थिरावले आहेत. महाराष्ट्राने त्यांचा कधी दुस्वास केला नाही. उलटपक्षी इडली सांबार, डोसा वगैरे विकणाऱ्या उडपी हॉटेलांना डोक्यावर घेऊन त्यांची रोजीरोटी चालवण्याचे काम मराठी जनतेने केले. त्याचे पांग कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची डोकी फोडून फेडणार असेल तर महाराष्ट्रालाही स्वस्थ बसून चालणार नाही. गेली 60-65 वर्षे कर्नाटकातील मराठी बांधव

कानडी सरकारची जुलूमशाही

सहन करीत आहे. बेळगावातील मराठी तरुणांवर कानडी पोलिसांनी केलेल्या निर्दयी लाठीहल्ल्याची दृश्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बघितली आहेत काय? बघितली असतील तर मराठी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचे रक्त उसळणार आहे काय? कर्नाटकात भाजपचे सरकार असतानाही मराठी भाषिकांची अशीच डोकी फोडली जात होती तेव्हा महाराष्ट्रातील भाजपच्या तमाम नेतेमंडळींनी तोंडाला कुलूप लावले होते. कर्नाटकातील सत्ता गेल्यानंतर तरी हे कुलूप उघडायला हरकत नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर निवाडा होत नाही तोपर्यंत संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्याची शिफारस महाराष्ट्र भाजपने करायला हवी आणि केंद्रातील आपल्याच सरकारकडून हा निर्णय संमतही करून घ्यायला हवा. कानडी अत्याचाराचे आणि दडपशाहीचे निषेध आणि धिक्कार आजवर खूप झाले, पण त्याच्यापलीकडे जाऊन कर्नाटक सरकारला समजेल अशा भाषेत धडा शिकवण्याचा विचार महाराष्ट्राला करावाच लागेल. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचे समन्वयक असलेले मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मागे बेळगावातील एका कार्यक्रमात ‘हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकू’ हे कानडी गीत गायिले होते. ‘जन्म घ्यावा तर कर्नाटकमध्येच’ असा या गीताचा अर्थ. ज्या पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकातच जन्म घेण्यात धन्यता वाटते त्यांच्याकडून सीमा बांधव आणि महाराष्ट्राने अपेक्षा तरी काय करावी!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार आंदोलन ?

News Desk

“…इतके दुटप्पी माणसाने वागू नये”, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

कॉंग्रेसचे माजी मंत्री सीपी जोशींनी केली पंतप्रधान मोदींवर जातीय टिका

News Desk