भगवान श्रीरामा प्रति निष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात. तेव्हा हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घाला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले की, ‘भाजपचे काही लोक अतिरेकी बोलतात. त्यांच्या तोंडात बांबूच घालायला हवा.’ तीन राज्यांतील जनतेने पराभव केला हा बांबू नाही काय? तरीही हनुमानाच्या जातीच्या दाखल्यांनी सुरू झालेले नवे रामायण पुढेही असेच चालू राहील. रामायणातील इतरही सर्व पात्रांनी आपापली जातीची प्रमाणपत्रे तयार ठेवावीत! असा खोचक सल्ला शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलाय.
सामनाचे आजचे संपादकीय
अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधायचे राहिले बाजूला, पण भारतीय जनता पक्षात रामभक्त हनुमानाच्या जातीवरून पंचायत सुरू झाली आहे. भक्ती आणि निष्ठsचा एक मार्ग हनुमानाने मानवजातीला घालून दिला. जिथे राम तिथे हनुमान हेच सत्य आहे. श्रद्धा आणि निष्ठेचे दुसरे नाव हनुमान. त्यामुळे त्याची जात कोणती व धर्म कोणता या फालतू चौकशा हव्यातच कशाला? नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाबली हनुमान दलित असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हनुमान हे आपल्याच जातीचे कसे यावर अनेकांनी दाखले दिले. आता भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार बुक्कल नवाब यांनी महाबली हनुमानास ‘मुसलमान’ असल्याचे प्रमाणपत्र दिले व संघ परिवाराची गोची केली. आता श्रीरामाचे मंदिर उभे राहील तेव्हा महाबली हनुमानाचे काय करायचे, असा प्रश्न संघ परिवाराच्या धर्मसभेस पडला असेल. मुळात हनुमानाची जात शोधण्याचा प्रकार नालायकीच आहे. योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचेच एक धर्मांध कार्यमंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी विधिमंडळात सांगितले, ‘छे, छे, महाबली हनुमान हे फक्त ‘जाट’ होते.’ या महाशयांनी पुढे सांगितले ते महत्त्वाचे, ‘जो दुसरों के फटे में अपना अपना पैर फंसा सकते है वह हनुमानजी हो सकते है। हनुमानजी मेरे जाती के थे।’ मंत्र्यांचे हे विधान उत्तर प्रदेश विधिमंडळाच्या ‘रेकॉर्ड’वर आहे. हा आता सरकारी दस्तऐवज झाला. हनुमानाची जातपंचायत एवढय़ावरच थांबलेली नाही. समाजवादी पार्टीचे आमदार शतरुद्र प्रकाश यांनी सांगितले, ‘हनुमान वनवासी, गिरीवासी होते.’ तिकडे बागपतच्या आमदारांनी
हनुमान हे ‘आर्य’ असल्याचा
शोध लावला, तर सभागृह नेते डॉ. दिनेश शर्मा यांनी तर सीतामाई म्हणजे ‘टेस्ट टय़ूब बेबी’ असल्याचा शोध लावला. भाजपचे एक खासदार हरी ओम पांडे यांनी ‘हनुमानजी ब्राह्मण, तर जटायू मुस्लिम होते’ असे म्हटले तर उदित राज या खासदारांनी हनुमान ‘आदिवासी’ असल्याचे सांगितले. जैन आचार्य निर्भय सागर हे हनुमानाला जैन ठरवून मोकळे झाले. आता हनुमानाच्या या ‘जात पंचायती’त माजी क्रिकेटपटू आणि भाजपचेच खासदार कीर्ती आझाद यांनीही ‘उडी’ घेतली आहे. त्यांना हनुमान हा चिनी असल्याचा साक्षात्कार झाला आहे. हनुमान चीनहून आला होता आणि तसा दावा चिनी लोकांकडूनच केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अशा तऱहेने उत्तर प्रदेशात नवे रामायण लिहिले जात असून रामायणातील प्रमुख पात्रांना जातीची लेबले चिकटवली गेली आहेत. अयोध्येत रामाचे मंदिर बांधायचे आहे, पण हे लोक रामभक्ताची जात शोधत आहेत. हनुमान गढी नावाचे स्थान अयोध्येत आहे. आता हनुमान मुसलमान असल्याचे भाजपचे आमदार सांगतात. म्हणजे हनुमान गढीसुद्धा कधीकाळी मशीदच होती व आता त्या गढीबाबतही वाद निर्माण करा अशी योजना आहे काय? महाबली हनुमानाची ही एकप्रकारे टिंगलटवाळीच सुरू आहे. मात्र तरीही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे गप्पच आहेत. हेच जर मुस्लिम किंवा ‘पुरोगामी’ मंडळींनी केले असते तर याच हिंदुत्ववाद्यांनी त्याविरुद्ध प्रचंड गदारोळ केला असता. मुळात हनुमानाचे सारे जीवन राममय होते. हनुमानाने रामासाठी त्याग, युद्ध केले. संकटाच्या वेळी हनुमान रामाच्या पुढेच उभे राहिले. हनुमान व त्यांची सेना नसती तर रामाचे वनवासी जीवन बेचव, अर्थशून्य झाले असते. असंग व अधर्माचा पराभव करण्यासाठी हनुमान प्रभू
श्रीरामांचे उजवे हात
झाले. हनुमानाशिवाय लंकादहन अशक्य होते. त्यामुळे रामायणात, हिंदू धर्मात मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या बरोबरीने स्वामिभक्त हनुमानाचे स्थान आहे. हनुमान बाहुबलीच होता व त्याने अनेकांच्या शक्तीचे गर्वहरण केले. रावणाचे चौदा चौकडय़ांचे राज्य रामाने धुळीस मिळवले ते हनुमानाच्या साथीने. हनुमानाची रामभक्ती अवर्णनीयच होती. लंकादहन करून राम-सीता अयोध्येत गेले. राम दरबारात मोठाच जल्लोष झाला. रामाच्या चरणाशी हनुमान बसले होते. सीतेने अयोध्येची राणी म्हणून अनेकांना ‘भेटवस्तू’ दिल्या. आपल्या गळय़ातील एक मोत्याचा हार तिने हनुमानास दिला. हनुमानाने तो हार घेतला आणि त्यातील एक एक मणी दाताने फोडू लागला. यावर सीता माई स्वतःशीच म्हणाल्या, ‘काय हे? मी इतक्या प्रेमाने मोतीहार दिला, पण त्यास या मोत्याची किंमत काय कळणार? शेवटी माकड ते माकडच!’ यावर अंतर्यामी हनुमान म्हणाले, ‘माई, मला तुमच्या मोत्याचे काय मोल? मी त्या मोत्यात राम आहेत काय? ते पाहत आहे!’ असा हा रामभक्त महाबली हनुमान. भगवान श्रीरामा प्रति निष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात. तेव्हा हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घाला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले की, ‘भाजपचे काही लोक अतिरेकी बोलतात. त्यांच्या तोंडात बांबूच घालायला हवा.’ तीन राज्यांतील जनतेने पराभव केला हा बांबू नाही काय? तरीही हनुमानाच्या जातीच्या दाखल्यांनी सुरू झालेले नवे रामायण पुढेही असेच चालू राहील. रामायणातील इतरही सर्व पात्रांनी आपापली जातीची प्रमाणपत्रे तयार ठेवावीत!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.