HW News Marathi
राजकारण

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘या’ काही ठरल्या लक्षवेधी

मुंबई | राज्यात आज (२१ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्याच्या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात ही मतदान प्रक्रिया पार पडेल. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीकरिता काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील राजकारण, दिग्गज राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे टोकाचे आरोप-प्रत्यारोप, टोकाची टीका, भाजप-शिवसेनेची वाढलेली ताकद, भाजपच्या दिग्गज नेत्यांचे राज्यावर असलेले लक्ष, आणि अन्य पक्षांची सुरु असलेली आपल्या अस्तित्त्वाची लढाई असे बरंच काही या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळाले. विधानसभेकरिता महत्त्वाच्या ठरलेल्या अशाच काही या मुद्दयांवर आपण एक नजर टाकूया

धनंजय मुंडेंच्या व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे ढवळून निघालं परळीचं राजकारण 

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात केलेल्या अत्यंत वादग्रस्त वक्तव्याला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि परळीतील राजकारण ढवळून निघाले. यंदाच्या विधानसभेत राज्यात ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या लढती मानल्या जातात त्यांपैकी एक लढत परळीतील धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे या भावा-बहिणीमधील आहे. असे असताना निवडणुकीच्या केवळ १  दिवसपूर्वी धनंजय मुंडेंच्या व्हायरल व्हिडीओ आणि त्यामध्ये पंकजा मुंडेंबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर एकीकडे “आपण असे वक्तव्य केलेच नसून ती व्हिडीओ क्लिप एडिट करून व्हायरल केल्याचा” आरोप धनंजय मुंडेंनी केला. तर, ” स्वतःचा रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल ?”, असा सवाल उपस्थित करत खासदार प्रीतम मुंडे यांनी सडकून टीका केली.

मला एक सक्षम  विरोधी पक्ष व्हायचंय ! 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (१० ऑक्टोबर) मुंबईत सांताक्रूझमध्ये घेतलेल्या आपल्या पहिल्या प्रचारसभेत राज्यातील जनतेकडे एक वेगळेच आवाहन केले. “मी तुमच्यासमोर एक मागणी करायला आलो या राज्याला सर्वार्थाने आज एका सक्षम, प्रबळ, कोणाकडेही घरंगळत न जाणाऱ्या विरोधी पक्षाची गरज आहे. सत्तेतील आमदार जाब विचारू शकत नाही, विरोधातला आमदार तो जाब विचारू शकतो. सत्ता जेव्हा माझ्या आवाक्यात असेल तेव्हा सत्तेसाठी येईन. पण आज मला सत्ता नको. मात्र, मला एक सक्षम  विरोधी पक्ष व्हायचंय”, असे राज ठाकरे म्हणाले.

ईडीची कारवाई अन् राष्ट्रवादीला फटका 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह अन्य ७० नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल करण्यात आला. एकीकडे विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले अन् दुसरीकडे ईडीकडून राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. या बँकेतील संचालक मंडळाने आणि कर्जमंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांचे संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यरित्या कर्जवाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला. राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात राजकारणात २५ हजार कोटी रुपयांचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार घोटाळा झाला होता.

अजित पवारांचे राजीनामा नाट्य

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २७ सप्टेंबर रोजी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांच्या पक्षासह संपूर्ण राजकारणात मोठी खळबळ उडाली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे कार्यालयात नसल्याने त्यांच्या पीएकडे राजीनामा सोपवण्यात आला. त्यानंतर बागडेंना फोन करून याबाबतची माहिती देण्यात आली आणि बागडेंनी हा राजीनामा मंजूर केला. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने पत्रकार परिषद देखील घेतली. त्यानंतर, अजित पवार यांनी २८ सप्टेंबर रोजी दुपारी शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर, पवार कुटुंबियांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. “पवार साहेबांवर झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे व्यथित होऊन मी हा निर्णय घेतला. शरद पवारांची बदनामी नको म्हणून राजीनामा दिला”, असे स्पष्टीकरण देताना आपल्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबद्दल बोलताना अजित पवार यांना आपले अश्रू अनावर झाले.

एमआयएम स्वबळावर लढणार, ‘वंचित’मध्ये उभी फूट

भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडली. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वबळावर लढणार असल्याची घोषणा औरंगाबादमध्ये एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी ६ सप्टेंबर केली. प्रकाश आंबेकर यांनी एमआयएमला ८ हुन अधिक जागा देण्यास नकार दिल्याने अखेर एमआयएमने स्वबळाची घोषणा केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकर आणि जलील यांच्यात मोठे शाब्दिक युद्ध  पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर १० सप्टेंबर रोजी एमआयएमची देखील हीच अधिकृत भूमिका असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी स्पष्ट केले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच ‘डबल ए’ तर सीतारामन यांचे ‘आरव्ही’

News Desk

शशी थरूर यांचे हे विधान हिंदू धर्माचा जाणूनबुजून केलेला अपमानच !

News Desk

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची बैठक संपली; बंडखोराबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Aprna