HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

६.८ टक्के विकासदराने १ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्नच! – नाना पटोले

मुंबई | अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ असून प्रत्यक्षात काहीही नाही केवळ मोठं मोठ्या आकड्यांची घोषणा आहे. शेतमालाच्या हमीभावाबद्दल अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) काहीच नाही, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल काहीच घोषणा केलेली नाही तसेच जुन्या पेन्शनबद्दलही अर्थसंकल्पात कोणतेही सुतोवाच केलेले नाही. हा अर्थसंकल्प अर्थहिन व जनतेची दिशाभूल करणारा असून अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प फसवा आहे, या अर्थसंकल्पातून समाजातील कोणत्याच घटकाला काहीच ठोस असे मिळालेले नाही. अर्थसंकल्पाची सुरुवात संत तुकाराम महाराज यांना वंदन करुन केली पण तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबावर कारवाई केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार उल्लेख केला पण आमच्या दैवतांचा अपमान करणाऱ्या तत्कालीन राज्यपाल कोश्यारींवर भाजपा मूग गिळून गप्प बसत असे. छत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले पण ते स्मारक कधी पूर्ण होणार याबाबत बोलले नाहीत. मुंबई परिसराच्या विकासासाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत, त्या केवळ आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबद्दल जाहीर केलेल्या घोषणा या केवळ घोषणाच आहेत त्या कागदावरच राहणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ किती मिळेल याबाबत शंकाच आहे. शेतमालाच्या हमी भावाबद्दल यात काहीच नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबद्ल एक शब्दही अर्थसंकल्पात नाही. पीकविमा हप्ता सरकारने भरला काय किंवा शेतकऱ्याने भरला काय, शेतकऱ्याच्या हातात नुकसान भरपाईपोटी काय मिळते हे दरवर्षी पाहतच आहोत. हा जनतेचा पैसा वीमा कंपन्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे. धानाला जाहीर केलेली हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत कमी आहे. मविआ सरकारने धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस दिला होता तो बंद करुन या सरकारने हेक्टरी १५ हजार रुपये जाहीर केल्याने शेतकऱ्याचे क्विंटलमागे ३५० रुपयांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन देण्याची घोषणा केली पण शेतकऱ्यांचे वीज बील माफ करण्याबाबत घोषणा केलेली नाही. फडणवीस यांच्या घोषणांवर विश्वास ठेवता येणार नाही. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी ६.५ हजार कोटी रुपये कल्याण डोंबिवललीला देण्याची घोषणा केली होती पण त्यातील एक दमडीही दिली नाही.

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबद्दल अर्थमंत्र्यांनी चकार शब्दही काढलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यास सरकारकडे पैसा नाही पण महिलांना ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी जोर धरत असताना त्याबद्दल या अर्थसंकल्पात काहीच भाष्य करण्यात आलेले नाही. महामंडळांसाठी मोठे आकडे जाहीर केले आहेत पण मागील वर्षाचा खर्च पाहता ५० टक्केही खर्च झालेला नाही. मागास जातींबाबत आर्थिक तरतूद केली जाते पण ती खर्चच केली जात नाही हे मागील वर्षीच्या आकडेवारीवरून दिसते, तब्बल ५० टक्के निधी खर्चच केलेला नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे, जनतेला महागाईतून दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरवरचा व्हॅट सरकारने कमी करायला हवा होता पण त्यावरही काहीच भाष्य केलेले नाही. अंगणवाडी सेविकांना दिलेली मानधनवाढ सुद्धा अत्यंत तुटपुंजी आहे. ‘अमृतकाळ’ सारखे गोंडस नाव दिले पण प्रत्यक्षात शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेला या अमृताचा अनुभव आलेला नाही व येणारही नाही. ६.८ टक्के विकासदराने १ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था हे शिदे फडणवीस सरकारचे दिवास्वप्नच ठरणार आहे. एकूणच हा अर्थसंकल्प केवळ घोषणांचा सुकाळ व अंमलबजावणीच्या नावाने दुष्काळ ठरणारा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारताविरोधात लेख लिहिण्याचा दावा, शोभा डे यांनी फेटाळला

News Desk

‘दोन महिन्यानंतर सर्वात कमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद,’कोल्हापूरकरांना दिलासा!

News Desk

छातीत खरेच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा, सामनातून टीका

swarit