नवी दिल्ली | “ममता बॅनर्जी या हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील आहेत. म्हणूनच ‘जय श्री राम’चा नारा दिल्यावर त्या तुरूंगात पाठवायची भाषा करतात”, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे उन्नावमधील खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. “हिरण्यकश्यपूने ‘जय श्री राम’ म्हटले म्हणून आपल्या मुलाला तुरुंगात टाकले, यातना दिल्या. ममता बॅनर्जी देखील बंगालमध्ये असेच करत आहेत”, असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. दरम्यान, वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या साक्षी महाराज यांच्या या आणखी एका वक्तव्यामुळे ते पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
“पश्चिम बंगालचे नाव एकताच मला त्रेता युगाची आठवण होते. जेव्हा राक्षस हिरण्यकश्यपूने ‘जय श्री राम’ म्हणण्यावरुन आपल्याच मुलाला तुरुंगात टाकले, त्याचा छळ केला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या देखील हेच करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ‘जय श्री राम’ म्हणणा-यांना तुरुंगात टाकत आहेत. यावरून त्या हिरण्यकश्यपूच्याच कुटुंबातील तर नाही ना ? असा सवाल उपस्थित होत आहे”, असे साक्षी महाराज यांनी म्हटले.
‘जय श्री राम’च्या घोषणांमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे संतप्त होऊ ममतांनी गाडी थांबविण्यास सांगितली आणि गाडीतून बाहेर येत भाजप कार्यकर्त्यावर त्या चिडल्या. त्यानंतर पोलिसांनी भाजपच्या १० कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतले.