HW News Marathi
राजकारण

Nitin Nandgaonkar Exclusive | आता मला सत्तेत राहून गोरगरिबांची सेवा करायची आहे !

मुंबई | आगामी विधानसभेच्या तोंडावर अन्य पक्षांतून शिवसेना-भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगचे प्रमाण अधिक आहे. अद्याप ते सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या खळखट्याकसाठी प्रकाशझोतात आलेले मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, नितीन नांदगावकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मात्र त्यांना मनसे सैनिकांचा प्रचंड मोठा रोष पत्करावा लागला होता. त्याचप्रमाणे, अनेक चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. याच संपूर्ण पार्श्वभूमीवर, एच.डब्ल्यू.मराठीने शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांच्याशी खास बातचीत केली आहे.

मनसे सोडून शिवसेनाप्रवेश कशासाठी ?

मी कोणत्याही पक्षाचा नेता नाही. मी सर्वसामान्य, गोरगरिबांचा आवाज आहे. मी याआधी महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत होतो. त्यामुळे साहेबांनी जे शिकवलं तेच मी केलं. मला फक्त कामं करायची आहेत. कामे करण्यापलीकडे मला काही सुचत नाही. मला आता सत्तेत राहून गोरगरीब जनतेची सेवा करायची आहे. म्हणूनच मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटलो. त्यांच्यापुढे माझी व्यथा मांडली. मी आता खांद्याला खांदा लावून प्रत्येक शिवसैनिकांबरोबर महाराष्ट्राला भगवामय करण्याचा संकल्प केला आहे.

उमेदवारीसाठी पक्ष सोडला अशी चर्चा आहे, नेमके कारण काय ?

मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे किंवा अन्य कोणत्याही नेत्याकडे उमेदवारीची मागणी केलीच नाही. त्यामुळे त्यांनी माझा विचार करावा अशी मला अपेक्षाही नाही. मी जर त्यांच्याकडे उमेदवारीची मागणीच केलेली नाही तर माझे नाव पहिल्या आणि दुसऱ्या यादीत आले नाही याचा दोष मी कोणाला देऊच शकत नाही. त्यामुळे मला मनसेने उमेदवारी दिली नाही म्हणून मी शिवसेनेत गेलो, हे चुकीचे आहे. मला जर उमेदवारी मागून ती नाकारली असती तर मी व्यक्त झालो असतो, राज ठाकरेंकडे गेलो असतो. मी त्यांना गळ घातली असती, हट्ट केला असता आणि त्यांनी माझा हट्ट पुरवला देखील असता. पण मी ते केले नाही.

तुम्ही मनसे अध्यक्षांना सांगून पक्ष सोडला होता का ?

नाही. मी त्यांना सांगून पक्ष सोडला नाही. माझा शिवसेना प्रवेश जरी रात्री झाला तरीही दिवसभर मी तेथे होते. पण त्यांच्याकडे आधीच बरीच लोकं येत होती. मला त्यांच्याशी सविस्तर बोलायचं सुद्धा होतं. म्हणून माझा प्रवेश रात्री झाला. दुसऱ्या दिवशी मनसे सैनिकांनी हे सर्व पहिले आणि ते त्यांना सहन झाले नाही. त्यांनी आपला राग व्यक्त केला. त्यांचा हा सर्व राग मी स्वीकारतो. पण याला गद्दारी म्हणत नाहीत. मी आमदार, किंवा खासदार नव्हतो कि मी इथे कमावले आणि तिथे घेऊन गेलो. मुद्दा इतकाच आहे कि मला जनतेची जी कामे करायची आहे ती मला इथे सत्तेत राहून व्यवस्थितपणे करता येतील.

मनसेच्या माध्यमातून असे १००० नितीन नांदगावकर होऊ देत. मी त्यांच्यासाठी सामान्य कोळसा होता. तिथे चांगली चांगली आणखी मनसे तयार झाली पाहिजे. त्यांच्याकडे तशी फळी देखील आहे. माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा !

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात कशा पद्धतीने सहभागी होणार ?

शिवसेना एक परंपरा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचे आहे. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवायचा आहे. उद्याच्या दसरा मेळाव्याला गुलाल उधळत, वाजत-गाजत आम्ही सर्वच जण तिथे जाणार आहोत आणि संकल्प करणार आहोत कि येत्या विधानसभेत मी माझा खारीचा वाट उचलणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणारच – नारायण राणे

News Desk

दीड महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा सर्वात मोठी हंडी फोडली! – मुख्यमंत्री

Aprna

‘या’ कारणामुळे जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन

Aprna