HW News Marathi
राजकारण

इसिसने जाळे विणले कसे?

तूर्त इसिसचे आपल्या देशातील एक नेटवर्क उद्ध्वस्त झाले आहे, पण या कारवाईने धोक्याची घंटाच वाजवली आहे. इसिसचे एक जाळेउद्ध्वस्त झाले ते चांगलेच असले तरी मुळात इसिसने ते विणले कसे? ते एवढे मोठे कसे आणि कधी झाले? इसिसची दुसरी दहशतवादी संघटना हिंदुस्थानातील आणखीही इतर राज्यांमध्ये जमीन उकरण्याचा प्रयत्न करीत आहे का? असे प्रश्न तूर्त तरी अनुत्तरितच आहेत. त्याची उत्तरे कशी आणि कधी मिळतात यावर इसिसचे हातपाय आपल्या देशात खरेच किती पसरले आहेत, किती पसरू शकतात याचा उलगडा होऊ शकेल असे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीय मधून म्हटले आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

प्रजासत्ताक दिन अथवा स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधी आपल्याकडे मोठा दहशतवादी कट उधळल्याच्या बातम्या हमखास झळकतात. आताही ‘एनआयए’ म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशाच्या विविध भागांत छापे टाकून ‘इसिस’सारख्या भयंकर संघटनेच्या दहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे मोठय़ा आत्मघातकी हल्ल्याचा डाव उधळला गेला, असेही एनआयएने म्हटले आहे. या स्वरूपाच्या बातम्या आणि सुरक्षा यंत्रणांचे दावे गेल्या काही वर्षांत जनतेसाठी सवयीचे झाले आहेत. ‘एनआयए’च्या या धडक कारवाईकडेही त्याच दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते, पण जो काही तपशील बाहेर येत आहे त्यावरून ही कारवाई म्हणजे ‘वाचली आणि सोडून दिली’ अशा स्वरूपाची दिसत नाही. अर्थात या वेळेत दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या, ‘इसिस’चे एक नेटवर्क मोडीत निघाले हे सगळे ठीकच झाले, पण इसिससारख्या भयंकर दहशतवादी संघटनेला आपल्या देशात ‘मऊ जमीन’ मिळाली हेदेखील या कारवाईमुळे उघड झाले आहे. हा धोका दुर्लक्षित करता येणार नाही. कालपर्यंत

जम्मूकश्मीरपुरताच मर्यादित

असलेली ‘इसिस’ देशभरात तब्बल 17 ठिकाणी छापे मारण्याइतपत मोठी कशी झाली? स्फोटके, हत्यारे, दारूगोळा वगैरेंचा एवढा मोठा साठा त्यांना कसा करता आला? देशी बनावटीचे रॉकेट लाँचर या छाप्यात सुरक्षा यंत्रणांना सापडते याचा अर्थ काय घ्यायचा? जप्त केलेले रॉकेट लाँचर उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे तयार करण्यात आल्याचा एनआयएचा संशय आहे. तो जर खरा असेल तर इसिस आपल्या देशात कशी पाळेमुळे रोवते आहे याचा तो पुरावाच म्हणावा लागेल. ‘इसिस’च्या या नव्या मोडय़ुलचा म्होरक्या मुफ्ती सोहेल हा असल्याचे सांगण्यात येते. तो मूळचा अमरोहा येथील रहिवासी आहे. बहुधा त्यामुळेच इसिसच्या या कारवायांचे केंद्र अमरोहा राहिले असावे. तूर्त इसिसचे आपल्या देशातील एक नेटवर्क उद्ध्वस्त झाले आहे, पण एनआयएच्या कारवाईने भविष्यातील धोक्याची घंटाच वाजवली आहे. सीरियामधून इसिसचे उच्चाटन वगैरे झाले असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सीरियातून आपली सैन्यमाघारी जाहीर करताना याच गोष्टीचा आधार घेतला होता. मग इसिसने

हिंदुस्थानच्या भुसभुशीतभूमीत

दहशतवादाची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे असा एनआयएच्या कारवाईचा अर्थ आता घ्यायचा का? ‘हरकत-उल-हर्ब-इस्लाम’ या दुसऱ्या संघटनेच्या झेंडय़ाखाली हिंदुस्थानात आपले बस्तान बसविण्याचा इसिसचा प्रयत्न आहे, असे सांगितले जाते. एनआयएने तो मोडून काढला. मात्र तेवढय़ावर समाधान मानणे आत्मवंचना आणि आत्मघात ठरेल. इसिसचे एक ‘जाळे’ उद्ध्वस्त झाले ते चांगलेच असले तरी मुळात इसिसने ते विणले कसे? ते एवढे मोठे कसे आणि कधी झाले? इसिसची दुसरी दहशतवादी संघटना हिंदुस्थानातील आणखीही इतर राज्यांमध्ये जमीन उकरण्याचा प्रयत्न करीत आहे का? कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात हिंदुस्थानी लष्कराची मोठी मोहीम सुरू असल्याने देशातील अन्य भागांमध्ये आपले जाळे विणण्याचा प्रयत्न इसिस करीत आहे का? असे प्रश्न तूर्त तरी अनुत्तरितच आहेत. त्याची उत्तरे कशी आणि कधी मिळतात यावर इसिसचे हातपाय आपल्या देशात खरेच किती पसरले आहेत, किती पसरू शकतात याचा उलगडा होऊ शकेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषद निवडणुकीत अशी आहे मतसंख्या….

News Desk

सेना-भाजप युती, नाणार प्रकल्प प्रश्नांपासून किरीट सोमय्यांचा पळ

News Desk

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना BMC निवडणूक एकत्र लढविणार; प्रकाश आंबेडकरांची माहिती

Aprna