HW Marathi
राजकारण

पाकिस्तानवरील हल्ला हे ‘काम’ नसून कर्तव्य आहे, हे आमच्या राजकारण्यांना कधी समजणार ?

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकीयातून आज (११ मार्च) एअर स्ट्राईकचे राजकारण करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. दिल्लीतील भाजपचे नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी ३ मार्च रोजी भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या बाईक रॅलीत घातलेल्या आर्मी टी-शर्ट घातले होते. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. “सैनिकांचा सन्मान त्यांच्या शौर्यात आणि वर्दीत आहे. या वर्दीचा वापर करून निवडणूक प्रचारात मते मागू नका असे निवडणूक आयोगाला सांगावे लागले हे लक्षण चांगले नाही. सैनिकी कारवाईचे पुरावे मागणारे दोषी आहेत, तितकेच सैनिकांचे गणवेश, छायाचित्र वापरून मतांचा जोगवा मागणारे दोषी आहेत. पाकिस्तानवर केलेला हल्ला हे ‘काम’ नसून कर्तव्य आहे, हे आमच्या राजकारण्यांना कधी समजणार ?”, असा सवालही ‘सामना’मधून करण्यात आला आहे.

काय आहे आजचे ‘सामना’चे संपादकीय ?

आमच्या जवानांची बलिदाने आम्ही थांबवू शकलो नाही, पण त्यांचे गणवेश घालून राजकीय प्रचार करीत आहोत. याच जवानांचे गणवेश रक्ताने माखलेले, अतिरेक्यांच्या बॉम्बहल्ल्यात छिन्नविच्छिन्न झालेले देशाने पाहिले आहेत. सैनिकांचा सन्मान त्यांच्या शौर्यात आणि वर्दीत आहे. या वर्दीचा वापर करून निवडणूक प्रचारात मते मागू नका असे निवडणूक आयोगाला सांगावे लागले हे लक्षण चांगले नाही. सैनिकी कारवाईचे पुरावे मागणारे दोषी आहेत, तितकेच सैनिकांचे गणवेश, छायाचित्र वापरून मतांचा जोगवा मागणारे दोषी आहेत.

राष्ट्रभक्ती ही काही एका व्यक्तीची किंवा राजकीय पक्षाची मक्तेदारी असू शकत नाही. तसे कुणाला वाटत असेल तर ते देशवासीयांचा अपमान करीत आहेत. एकमेकांच्या राजकीय भूमिका पटत नसतील; पण विरोध करणारे, प्रश्न विचारणारे देशद्रोही हा अपप्रचार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन आहे. पाकव्याप्त कश्मीरमधील हवाई हल्ल्यानंतर सैन्य, देशभक्ती व इतर राष्ट्रीय विचारांवर मालकीहक्क सांगण्याचे प्रकार वाढीस लागले. पुलवामाचा बदला सैनिकांनी नव्हे तर आम्हीच घेतला अशी पोस्टर्स राजकीय पक्षांनी लावली. अभिनंदनने आपल्या मिग विमानाने पाकड्यांचे ‘एफ-16’ पाडले ते भाजप सरकार सत्तेत असल्यामुळेच असले प्रसिद्धी प्रयोग सर्रास सुरू झाले. अभिनंदनचे सैनिकी गणवेशातील फोटो भाजप व इतर राजकीय पक्षांच्याच होर्डिंग्ज व जाहिरातीत झळकवून काही मंडळींनी स्वतःची छाती उगाच फुगवून घेतली. प्रकरण थेट निवडणूक आयोगाच्या दरबारात पोहोचले. आता निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष किंवा उमेदवारास ‘लष्करी अधिकारी किंवा जवानांचे फोटो वापरू नका,’ अशी तंबी आयोगाने दिली आहे. ही अशी वेळ का यावी? सैन्य कारवाईचे राजकारण व जाहिरातबाजी सुरू असल्याचा आरोप देशातील विरोधकांनी केला. सैन्य कारवाईचे पुरावे दाखवा इथपर्यंत विरोधकांची मजल गेली व पुरावे मागणे हा देशद्रोह असल्याचे भाजपतर्फे जाहीर करण्यात आले. ज्या विषयांवर लष्कराच्या प्रवक्त्याने बोलायचे त्या विषयावर राजकीय पक्षांचे प्रवक्ते, पुढारी तोंडाने हवाबाण सोडत आहेत. भारतीय जनता पक्षाचे काही खासदार लष्करी गणवेशात राजकीय सभांतून भाषणे करीत आहेत. दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांची लष्करी गणवेशातील छायाचित्रे प्रसिद्ध झाली व ते भाजपास विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. असे केल्याने विरोधकांच्या आरोपांना बळकटी येते व एअर स्ट्राइक किंवा पाकिस्तानवरील

सैन्य कारवाई

ही राजकीय फायद्यासाठीच करण्यात आल्याच्या आरोपांना हवा मिळते. हवाई हल्ल्यापेक्षा पुलवामातील दहशतवादी हल्ला व 40 जवानांची हत्या भयंकर आहे. उद्या विरोधक पुलवामा हल्ल्यातील रक्तपाताची भयंकर चित्रे पोष्टरवर झळकवून राज्यकर्त्यांची कोंडी करू शकतात. कश्मीरात सैनिकांच्या रक्ताचे सडे पडले म्हणून पाकव्याप्त कश्मीरवर हल्ला करावा लागला. त्यामुळे सैनिकी गणवेशाचा राजकीय वापर करणे बरोबर नाही. सैन्य भरती ही एक अवघड प्रक्रिया आहे. अनेक कठोर परीक्षा देत जवान पास होतो व शेवटी देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली सैनिकी वर्दी त्यांच्या अंगावर चढते. मग ते लष्कर असेल, हवाई दल किंवा नौदल असेल. लष्करात ले. कर्नल, फ्लाईट लेफ्टनंट यांसारख्या हुद्यांवर येण्यासाठी जी निवड परीक्षा असते त्यासाठी जे श्रम, मानसिक, शारीरिक धैर्य लागते ते पाहायचे असेल तर खडकवासला, डेहराडूनच्या एनडीएमध्ये म्हणजे ‘राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी’मध्ये जाऊन पाहावे लागेल. कठोर परीक्षेनंतर त्या जवानास त्याची ती कॅप आणि वर्दी जेव्हा मिळते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही. देशासाठीच जगेन आणि मरेन असा जोश त्या जवानात निर्माण होतो. गणवेशात असताना युद्धभूमीवर वीरगती प्राप्त व्हावी असे त्या जवानांचे स्वप्न असते. बलिदानानंतरही जवानांच्या त्या हिरव्या, पांढऱ्या, निळ्या वर्दीचा सन्मान करून तो संपूर्ण गणवेश वीरपत्नीच्या हाती सुपूर्द केला जातो. अशा या लष्करी गणवेशाचा वापर राजकीय थिल्लरपणासाठी करणे यात कुठले आले आहे शौर्य? शौर्य खरोखर काय असते ते सीमेवर लढणारा, प्रसंगी हौतात्म्य पत्करणारा जवानच नव्हे तर त्यांच्या वीरपत्नीदेखील नंतर सैन्यदलात सहभागी होऊन दाखवून देतात. त्यासाठी सर्व दुःखे बाजूला ठेवून लष्कराचे खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करतात. महाराष्ट्र ही तर अशा वीरमाता आणि वीरपत्नींची

पवित्र भूमीच

आहे. मग त्या 2015 मध्ये कश्मीरमध्ये वीरमरण आलेल्या साताऱ्याच्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती असोत किंवा गेल्या वर्षी हिंदुस्थान-चीन सीमेवर शहीद झालेले विरारचे मेजर प्रसाद महाडिक यांची पत्नी गौरी असोत. स्वाती यांनी लष्कराचे खडतर प्रशिक्षण पार केले आणि चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमीतून ‘लेफ्टनंट’ बनल्या. आता त्या देशसेवेचा वारसा पुढे चालवीत आहेत. गौरी महाडिक यांनीही सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली आणि आता त्या 49 आठवड्यांचे लष्करी प्रशिक्षण घेऊन नंतर ‘लेफ्टनंट’ म्हणून सैन्यात रुजू होतील. खरे शौर्य आणि शौर्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी लागणारे धाडस म्हणजे स्वाती आणि गौरी महाडिक यांनी घालून दिलेला आदर्श म्हणावा लागेल. फक्त लष्करी गणवेश अंगावर चढवायचा आणि राजकीय भाषणे ठोकायची हा जवानांचा आणि त्यांच्या वीर कुटुंबीयांचा उपमर्दच ठरेल. मुळात आमच्या जवानांची बलिदाने आम्ही थांबवू शकलो नाही, पण त्यांचे गणवेश घालून राजकीय प्रचार करीत आहोत. याच जवानांचे गणवेश रक्ताने माखलेले, अतिरेक्यांच्या बॉम्बहल्ल्यात छिन्नविच्छिन्न झालेले देशाने पाहिले आहेत. सैनिक हासुद्धा तुमच्या आमच्याप्रमाणेच माणूस आहे. तो देशासाठी बलिदान देतो तेव्हा एक माता पुत्र गमावते. पत्नी पती गमावते. मुले पिता गमावतात. सैनिकांचा सन्मान त्यांच्या शौर्यात आणि वर्दीत आहे. या वर्दीचा वापर करून निवडणूक प्रचारात मते मागू नका असे निवडणूक आयोगाला सांगावे लागले हे लक्षण चांगले नाही. सैनिकी कारवाईचे पुरावे मागणारे दोषी आहेत, तितकेच सैनिकांचे गणवेश, छायाचित्र वापरून मतांचा जोगवा मागणारे दोषी आहेत. पाकिस्तानवर केलेला हल्ला हे ‘काम’ नसून कर्तव्य आहे, हे आमच्या राजकारण्यांना कधी समजणार?

Related posts

संख्याबळाची चिंता नको, विरोधकांचा शब्द आमच्यासाठी महत्वाचा !

News Desk

मागासवर्ग आयोगाच्या अहवालातल्या शिफारशी अजूनही अस्पष्ट !

News Desk

एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी संपात सहभागी झाल्यामुळे जाणार नाही !

News Desk