HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पूनम महाजन यांनी थेट ‘मातोश्री’ गाठले, युवासेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील युतीच्या उमेदवार पूनम महाजन यांचा प्रचार न करण्याची भूमिका युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. उत्तर मध्य मुंबईतील प्रचारासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो न लावल्याने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या पूनम महाजन यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर व्हावी यासाठी थेट ‘मातोश्री’ गाठत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांनी लावलेल्या बॅनर्सवर आदित्य ठाकरे यांचा फोटो न लावल्याने त्यांचा अपमान झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. “आदित्य ठाकरे हे युथ आयकॉन आहेत. त्यांचा अपमान म्हणजे आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे. जोपर्यंत पूनम महाजन आपली चूक मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही”, अशी आक्रमक भूमिका युवासेना कार्यकर्त्यांनी घेतली आहे. शनिवारी (३० मार्च) वांद्र्यातील शिवसेनेच्या शाखेत युवासेनेच्या कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अशीच आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांदरम्यान किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्यानंतर, संतापलेल्या शिवसैनिकांनी या लोकसभा निवडणुकांमध्ये किरीट सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत युती झाली तरीही आम्ही सोमय्या यांचा प्रचार करणार नाही, असे शिवसेना-भाजपची युती होण्याच्या बऱ्याच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते.

Related posts

“अमित शाहांच्या पायगुणाचा आणि सोडून गेलेल्या ‘त्या’ नगरसेवकांचा काहीही संबंध नाही” – चंद्रकांत पाटील  

News Desk

शरद पवार ६ नोव्हेंबरपासून राज्याच्या पाहणी दौऱ्यावर

News Desk

तुम्ही मागच्या मागेच बहिर्गमन करायला हरकत नव्हती !

News Desk