HW News Marathi
राजकारण

प्रियंका ही इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल !

मुंबई | आम्ही त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ का करावी? प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब रूप आहेत व त्यांच्या वागण्या-बोलण्यात ती झलक दिसते. त्यामुळे हिंदी भाषिक पट्टय़ात काँगेसला नक्कीच उभारी येईल. प्रियंका गांधी राजकारणात आल्याने रॉबर्ट वढेरांची दडपलेली प्रकरणे वेगात बाहेर येतील ही भीती असतानाही प्रियंकाने मैदानात उडी मारली. आम्ही बचावात्मक नव्हे तर आक्रमक राजकारणावर भर देणार आहोत. त्यासाठीच प्रियंकावर जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे राहुल गांधी यांनी लपवाछपवी न करता सांगितले. राहुल गांधींनी उत्तम डाव टाकला आहे. प्रियंकाची तोफ धडाडली व तिच्या सभांना गर्दी झाली तर ही बाई इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून अशा शब्दात काँग्रेसच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब रूप आहेत व त्यांच्या वागण्या–बोलण्यात ती झलक दिसते. त्यामुळे हिंदी भाषिक पट्टय़ात काँगेसला नक्कीच उभारी येईल. प्रियंका गांधी राजकारणात आल्याने रॉबर्ट वढेरांची दडपलेली प्रकरणे वेगात बाहेर येतील ही भीती असतानाही प्रियंकाने मैदानात उडी मारली. आम्ही बचावात्मक नव्हे तर आक्रमक राजकारणावर भर देणार आहोत. त्यासाठीच प्रियंकावर जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे राहुल गांधी यांनी लपवाछपवी न करता सांगितले. राहुल गांधींनी उत्तम डाव टाकला आहे. प्रियंकाची तोफ धडाडली व तिच्या सभांना गर्दी झाली तर ही बाई इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल.

प्रियंका गांधी अखेर सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत. काँग्रेसने सरचिटणीस पदावर त्यांची नियुक्ती केली. आगामी लोकसभा निवडणुकांत यश मिळविण्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी आहे असे श्री. राहुल गांधी यांनी या निमित्ताने दाखवून दिले. राहुल गांधी अपयशी ठरले म्हणून प्रियंकाला आणावे लागले अशा वावडय़ा उठवल्या जात आहेत. त्यात दम नाही. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ‘राफेल’सारख्या विषयावर त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. हे एकवेळ सोडा, पण तीन महत्त्वाच्या राज्यांत काँग्रेसने भाजपकडून सत्ता खेचून घेतली व त्यामुळे मृतवत काँग्रेसला संजीवनी मिळाली. त्याचे श्रेय त्यांना न देणे हे कोत्या वृत्तीचे लक्षण आहे. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश युती झाली. काँग्रेसला त्यात महत्त्वाचे स्थान नाही, पण राहुल गांधी यांनी अत्यंत संयमाने, कोणतीही आदळआपट न करता सांगितले की, ‘‘काही हरकत नाही. आम्ही उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवू व जमेल तिकडे सपा-बसपाला मदत करू.’’ ही भूमिका घेणे व त्यापाठोपाठ प्रियंकास सक्रिय राजकारणात आणून उत्तर प्रदेशची जबाबदारी देणे यात

एक प्रकारची योजना

आहे व त्याचा फायदा होईल असे दिसते. ‘प्रियंका गांधी या राजकारणात कधीच उतरणार नाहीत. त्यांचे पती रॉबर्ट वढेरा हे उपद्व्यापी आहेत. गांधी परिवाराचा उपयोग करून त्यांनी अनेक आर्थिक व जमिनीचे घोटाळे केले. त्यामुळे प्रियंका यांच्यावर दबाव आणला जाईल,’ अशी चर्चा होती. पण वढेरा यांची असली-नसलेली लफडी तशीच लटकवत ठेवत प्रियंका मैदानात उतरल्या आहेत व स्वतः पंतप्रधान मोदी यांना त्यावर भाष्य करावे लागले. ‘‘काही लोकांसाठी कुटुंब हाच पक्ष आहे,’’ असे श्री. मोदी यांनी म्हटले आहे. काही ठिकाणी गटाचे किंवा स्वतःच्या टोळीचे राजकारण केले जाते व त्यांचा परिवार असतो तर काही ठिकाणी ‘घराणी’ राजकारण करतात. या घराण्यांचा वारसा लोकांनी स्वीकारला असेल तर त्यात इतरांच्या पोटात दुखायचे कारण काय? राजकारणात व सत्तेत असेही अनेकजण वर्षानुवर्षे गुळास मुंगळा चिकटावा तसे चिकटून बसलेच आहेत व हेसुद्धा घराणेशाहीपेक्षा वेगळे नाही. तीन राज्यांत भाजपचा पराभव झाला. त्यामागचे कारण हेच आहे. नेहरू-इंदिरा गांधी यांच्याविषयी भाजप नेतृत्वाने

मनात अढी

बाळगली, कारण हेच कुटुंब भाजपास आव्हान देऊ शकते व 2019 ला निदान बहुमताचा आकडा गाठण्यात अडथळा ठरू शकते ही भीती आहेच. हे सत्य आहे. काँग्रेस पक्षाविषयी, गांधी कुटुंबाविषयी आमच्या मनात ममत्व असण्याचे कारण नाही. काँगेस पक्ष कसा चालवायचा, मायावती, अखिलेश यादव किंवा शिवसेनेने कोणत्या भूमिका कधी घ्याव्यात हे ठरविण्याचा अधिकार इतरांना नाही. प्रियंका गांधी यांना सक्रिय करावे असे काँगेसला वाटत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ का करावी? प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब रूप आहेत व त्यांच्या वागण्या-बोलण्यात ती झलक दिसते. त्यामुळे हिंदी भाषिक पट्टय़ात काँगेसला नक्कीच उभारी येईल. प्रियंका गांधी राजकारणात आल्याने रॉबर्ट वढेरांची दडपलेली प्रकरणे वेगात बाहेर येतील ही भीती असतानाही प्रियंकाने मैदानात उडी मारली. आम्ही बचावात्मक नव्हे तर आक्रमक राजकारणावर भर देणार आहोत. त्यासाठीच प्रियंकावर जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे राहुल गांधी यांनी लपवाछपवी न करता सांगितले. राहुल गांधींनी उत्तम डाव टाकला आहे. प्रियंकाची तोफ धडाडली व तिच्या सभांना गर्दी झाली तर ही बाई इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळेल असे वाटत नाही !

News Desk

RamMandir : न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेत कायदा करा, उद्धव ठाकरेंचे मोदींना अल्टीमेटम

News Desk

भाजपकडून ‘देशभक्ती’ हा निवडणुकीचा मुद्दा बनविला जात आहे !

News Desk