HW News Marathi
राजकारण

राजीव गांधी यांच्यामुळेच मी आज जिवंत | अटलबिहारी वाजपेयी

जवळपास अडीच दशकांपूर्वी, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि तत्कालीन आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार आत्मघातकी बॉम्बस्फोटात ठार झाले होते. ही घटना केवळ गांधी कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवणारी होती. त्यावेळी भाजपचे अटल बिहारी वाजपेयी हे विरोधी नेते होते. त्यावेळी एका मुलाखतीत वाजपेयी यांनी राजीव गांधी यांच्याविषयी बोलताना “राजीव गांधी यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे” असे उद्गार काढले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-भाजपचे विशेषतः राजीव गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे संबंध लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

काँग्रेस नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी अत्यंत सौदार्हपूर्ण संबंध होते, हे पुढील काही बाबी सिद्ध करतात. असे मानले जाते कि राजीव गांधी हे भाजपच्या नेत्यांना संसदेत घेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. भिन्न राजकीय विचारधारांच्या पलीकडे जाणारे राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे संबंध समजून घेणे हे सध्याची राजकीय स्थिती पाहता अत्यंत गरजेचे आहे. आजच्या राजकारण्यांसाठी त्यांचे हे संबंध अनुकरणीय आहेत.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वतः त्यांच्या आणि राजीव गांधी यांच्यातील या संबंधांबद्दल भाष्य केले आहे. राजीव गांधी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असताना त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या किडनी उपचारासाठी अमेरिकेत जाण्यास मदत केली होती. उल्लेख एनपी यांच्या ‘दि अनटोल्ड वाजपेयी : पॉलिटिशिअन अँड पॅराडॉक्क्स’ या पुस्तकात ही बाब नमूद करण्यात आली आहे. राजीव गांधी यांना वाजपेयी यांच्या आजारपणाविषयी समजताच त्यांनी वाजपेयी यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले होते.

राजीव गांधी यांच्यामुळेच मी आज जिवंत !

‘दि अनटोल्ड वाजपेयी : पॉलिटिशिअन अँड पॅराडॉक्क्स’ या पुस्तकात अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढील वक्तव्याचा समावेश आहे. “जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळी कुठून तरी त्यांना माझ्या किडनीच्या आजाराविषयी समजले. त्या आजारासाठी मला परदेशात जाऊन उपचार घेण्याची गरज आहे, हे देखील त्यांना कळले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि ते मला म्हणाले कि, “मी तुमचे नाव संयुक्त राष्ट्रांचे भारताचे प्रतिनिधी म्हणून सुचवत आहे. मला आशा आहे कि तुम्ही या संधीचा उपयोग करून घेत तुमचे उपचार पूर्ण करून याल.” त्यानंतर मी अमेरिकेत जाऊन माझे उपचार पूर्ण केले. त्यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे.” याबाबत राजीव गांधी यांनी आपल्या अधिकाऱ्यांना “भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी हे त्यांचे उपचार पूर्ण झाल्यानंतरच भारतात परत येतील”, असे स्पष्टपणे सांगितले होते.

राजकारणाची खालावलेली पातळी

१९८४ ते १९८९ या काळात राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते. तर अटलबिहारी वाजपेयी हे विरोधी पक्षनेते होते. आजच्या राजकारणात असे संबंध पाहायला मिळणे अत्यंत दुर्मिळ झाले आहे. दोघांच्याही राजकीय विचारधारेत मोठे मतभेद होते. राजीव गांधी यांनी त्यावेळी वाजपेयी यांना केलेली ही निःस्वार्थ मदत आणि वाजपेयी यांनी ही घटना सांगत त्यांचे आभार मानत दाखवलेला मनाचा मोठेपणा आजच्या राजकारण्यांमध्ये दिसणे अत्यंत दुर्मिळ झाले आहे. एकीकडे या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचे हे जिव्हाळ्याचे संबंध आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आज होणाऱ्या वैयक्तिक आणि अत्यंत बोचऱ्या टीका आजची राजकारणाची खालावलेली पातळी दाखवतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनतेच्या मनातील आग व्यक्त करण्यासाठी निवडणूक लढवतोय !

News Desk

राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का? अजित पवारांचा ‘ईडी’ सरकारला संतप्त सवाल…

Aprna

दीपक केसरकरांचे मुख्य प्रवक्ते पद ‘या’ कारणामुळे जाण्याची शक्यता

Aprna