HW News Marathi
राजकारण

RamMandir : महाराष्ट्र ते अयोध्या रामसेतू | सामना

बाबरी मशीद पडून २५ वर्ष झाली आणि तेव्हा पासून आज पर्यंत राम भक्तांची फक्त फसवणूक होते आहे. अशा शब्दात सामन्याच्या अग्रलेखातून भाजपासंबंधित राम भक्तांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा आज पासून सुरु होत असून त्याच पार्श्वभूमीवर आजचा अग्रलेख लिहिला गेला आहे.

आजचे सामनाचे संपादकीय वाचा सविस्तर

अयोध्येतील राममंदिराचा लढा पुन्हा सुरू झाला की नाही हे आम्ही सांगू शकणार नाही, पण राममंदिराचे भिजत घोंगडे झटकण्याचे कार्य नक्कीच सुरू झाले आहे. राममंदिराची उशी करून जे झोपले होते त्यांचे डोळे उघडण्याचे काम शिवसेनेने नक्कीच केले आहे. आम्ही श्रीरामाच्या पवित्र भूमीस वंदन करण्यासाठी निघालो आहोत. रामायण हा हिंदुस्थानी संस्कृतीचा खजिना आहे. रामायण हिंदुस्थानी जीवनात मिसळून गेले आहे. ‘‘जीवनात ‘राम’ उरला नाही’’ असे जेव्हा म्हणतो तेव्हा हिंदू जनमानसातील ‘राम’ किती महत्त्वाचा हे समजून घेतले पाहिजे. रामायणातील प्रत्येक पात्र महत्त्वाचे. नायकाइतकाच खलनायक महत्त्वाचा. प्रचंड लढ्यानंतरही राममंदिर अद्याप उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे. कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ. तो पराक्रमी योद्धा होता. तो सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागा राहायचा. त्याला उठवण्यासाठी ढोल वाजवले जात, अंगावरून हत्ती चालवले जात, दांडके आपटले जात. राममंदिर उभारणीसाठी आम्हालाही झोपलेल्या कुंभकर्णांना जागे करायचे आहे. उठा, रामाच्या नावाने जी सत्ता मिळवलीत व उबवलीत त्याची चार वर्षे सरून गेली. तुम्ही राजवैभवात लोळत आहात, पण आमचा राम मात्र अयोध्येतच वनवासात आहे. निवडणुका आल्या आहेत म्हणून जागे होऊ नका. राममंदिर उभारणीसाठी जागे व्हा! प्रत्येक हिंदूची आता एकच गर्जना आहे,

‘‘आधी मंदिर, मग सरकार!’’

तेव्हा झोपलेल्या कुंभकर्णांनो उठा, आता उठला नाहीत तर कायमचे झोपून जाल. आम्ही अयोध्येकडे कूच करीत आहोत ते कुंभकर्णास जागे करण्यासाठी. शिवसैनिकांसह देशातील कोट्यवधी लोक श्रीरामाचा जयजयकार करीत आहेत. ‘‘राममंदिर आज नाही तर कधीच नाही!’’ अशा घोषणा देत आहेत. झोपलेल्या कुंभकर्णा आता तरी जागा हो!

त्यांचा कुंभकर्ण झाला

निवडणुका आल्या की, राम आठवतो. मग अयोध्येत राममंदिर का बांधत नाही? हा सरळ प्रश्न आहे. आम्हाला राममंदिराचे राजकारण करायचे नाही. ‘‘राम की रोटी?’’ असा प्रश्न विचारला जातो. रोटी महत्त्वाची आहेच, पण रामाच्या नावाने सत्ता मिळवली ती ‘रोटी’ देण्यासाठी. 1992 साली कारसेवकांनी बाबरी पाडली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव म्हणाले होते की, ‘‘भाजप नेत्यांनी व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला.’’ पण बाबरी पाडल्यावर गेल्या पंचवीस वर्षांत फक्त विश्वासघातच सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत राममंदिराचे वचन दिले गेले; पण राममंदिरवाल्यांची सत्ता केंद्रात आणि उत्तर प्रदेशात येऊनही राममंदिर काही निर्माण झाले नाही आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या अयोध्येतच वनवासी बनले. हाच सगळ्यात मोठा विश्वासघात आहे. रामभक्त म्हणून जे सत्तेवर आले त्यांचा कुंभकर्ण झाला. अयोध्येत कारसेवक एकदा नव्हे, दोनदा गेले. मुलायमसिंग यांच्या राजवटीत कारसेवक पहिल्यांदा आले तेव्हाच ते बाबरीच्या घुमटावर चढले होते, पण लष्कराने गोळ्या झाडून शेकडो कारसेवकांचे मुडदेच पाडले. दुसर्‍या वेळी कल्याणसिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना पुन्हा कारसेवक आले व त्यांनी अयोध्येतील बाबरीचा कलंक कायमचा संपवून टाकला. बाबरीचा घुमट पाडण्यासाठी जे वर चढले ते शिवसैनिक होते. असंख्य शिवसैनिक तेव्हा शिवसेनाप्रमुखांची प्रेरणा घेऊन अयोध्येत पोहोचले व त्यांनी काम फत्ते केले. बाबरी कोसळताच सगळ्यांनीच पलायन केले व जबाबदारी झटकून जाहीर केले, ‘‘हे काम भाजपचे नाही. हे काम शिवसेनाच करू शकते.’’ त्याच वेळी

हिंदुहृदयसम्राटांस साजेशी गर्जना

शिवसेनाप्रमुखांनी केली, ‘‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे!’’ बाबरी कोसळताच कारसेवक आनंदाने नाचू लागले व शिवसेनाप्रमुखांनी कोसळलेल्या बाबरीची जबाबदारी स्वीकारताच संपूर्ण हिंदू समाज आनंदाने व गर्वाने बेभान झाला. ‘‘शिवसेनेचा अयोध्येशी संबंध काय?’’ असे विचारणार्‍यांनी हा इतिहास समजून घ्यावा. पळून जाणार्‍यांना हिंदू समाज नेता मानत नाही, लढणार्‍यांचाच तो गौरव करतो. बाबरी पाडूनही राममंदिर उभे राहत नाही हा रामाचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे. बाबरी ऍक्शन कमिटी हा देशद्रोह आहे व न्यायालयाचे लचांड हे थोतांड आहे. राममंदिराची उभारणी न्यायालय नाही, तर आजचे सरकार करील. कारण रामाच्या नावावर तुम्ही मते मागितली. त्यामुळे 2019 पूर्वी एक अध्यादेश काढा व सरळ राममंदिर उभारणीस सुरुवात करा. अरे, तुमच्या राज्यात वाल्याचे वाल्मीकी होतात, पण राममंदिर होत नाही! सत्तेसाठी असंख्य वाल्यांना तुम्ही पवित्र केले, पण ज्या रामाने तुम्हाला राजकीय वैभव दिले तो राम वनवासातच आहे. महाभारत फक्त पाच गावांसाठी झाले, पण अयोध्येतील ‘महाभारत’ हे एका राममंदिरासाठी सुरू आहे. धर्मराजाने ज्याप्रमाणे सर्व धर्मचर्चा संपवून विजयासाठी युद्ध केले, त्याप्रमाणे रामभूमीवर राममंदिर या स्वाभाविक सत्यासाठी आपण सगळ्यांनीच विजयाच्या ईर्षेने झुंज देऊया. महाराष्ट्र हा जन्मतःच झुंजार आहे. महाराष्ट्राने अयोध्येपर्यंत रामसेतू उभारला आहे. त्या रामसेतूवरूनच आम्ही अयोध्येकडे निघालो आहोत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहा…मुलींनंतर आता डास पळविणार आमदार राम कदम

News Desk

शक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

News Desk

राहुल गांधींचा अर्ज दाखल, वायनाडमध्ये काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन

News Desk