HW News Marathi
राजकारण

तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही !

मुंबई । आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. भारतीय जनता पक्ष स्वबळावर बहुमताचा आकडा पार करणे आज तरी शक्य नाही याची जाणीव त्यांना दोन वर्षांपूर्वीच झाली आणि एनडीएच्या अडगळीतील भांड्यांना कल्हई करणे हाच मार्ग बरा असे त्यांना वाटले. पण शिवसेना हे अडगळीतले भांडे कधीच नसल्याने सत्य, देशहित व हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमचे भांडे भांड्यास लागून वाजत राहिले व खणखणीत नाणे गाजत राहिले. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजपच्या युतीनंतर उभे राहिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही.

महाराष्ट्रात ‘युती’च्या चर्चेला तसा पूर्णविराम मिळाला आहे. काही पोटावळ्यांना युती झाली तरी, ‘का झाली?’ असा मुरडा उठला होताच व होत नव्हती तेव्हा, “छे, छे, शिवसेना फारच ताणून धरते बुवा. हे काय सुरू आहे!’’ असले प्रश्न पडतच होते. असल्या पडेल प्रश्नांना उत्तरे देत बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हितासाठी जी नवी जुळवाजुळव केली आहे ती घेऊन पुढे जावे यातच सगळ्यांचे हित आहे. जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली आहे. अमित शहा हे स्वतः ‘मातोश्री’वर आले. आम्हाला जे सांगायचे, बोलायचे ते ‘ठाकरे’ पद्धतीने ठोकून सांगितले. ज्या चुका आधी झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत यावर किमान एकमत झाले. त्यातून ‘युती’ला आणखी एक संधी देण्याचा निर्णय झाला. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत तसे वैर नव्हते. मुळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे ‘एनडीए’ला ‘कल्हई’ करण्याचे प्रयत्न गेल्या महिनाभरापासून सुरू झाले. या एनडीएचे जनकत्व भाजपइतकेच शिवसेना, अकाली दलाकडे आहेच. नितीश कुमार यांच्यासारख्या सध्याच्या भरोसेमंद साथीनेही दोन वेळा ‘एनडीए’ त्याग केला आहे. अगदी राममंदिर, गोध्रा वगैरे प्रकारांवर शरसंधान करणार्‍या नितीश कुमारांना तर मोदी हे प्रकरण अजिबात चालणारे नव्हते. पण शेवटी विचार, भूमिका जुळत नसल्या, माणसांशी टोकाचे भांडण असले तरी राजकारणात पुन्हा एकत्र येण्यासाठी जे

परवलीचे शब्द

आहेत ते म्हणजे ‘राष्ट्रीय व्यापक हित’, ‘जनहित’ व ‘जनतेची इच्छा’. या इच्छेनुसार काँग्रेसची महाआघाडी बनू शकते, नितीश कुमार वगैरे पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत बसू शकतात, मग शिवसेना तर त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बरोबरीची हिस्सेदारच आहे. 2014 सालातली परिस्थिती वेगळी होती. लाटांचे उसळणे व कायमचे जिरणे देशात नवीन नाही. तसे नसते तर राजनारायणसारख्या विदूषकाने इंदिरा गांधींचा पराभव केला नसता. एका चिडीतून, संतापातून जनता भल्याभल्यांना पटकते व त्यांच्या विरोधात नव्यांना डोक्यावर घेते. 2014 या वर्षात काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष होताच. मोदी यांचा उदय व त्यांचे सादरीकरण लोकांना भिडले व एक लाट काँग्रेस, त्यांच्या बगलबच्च्यांविरोधात निर्माण झाली. मात्र आता त्या लाटेची उंची व तुफान कमी झाले आहे आणि 2019 ची स्थिती ही लाटेवर निवडणुका लढण्याची नसून विचार, काम व भविष्य यावर लढण्याची आहे. राहुल गांधी यांचे प्रगतिपुस्तक 2014 च्या तुलनेत नक्कीच सुधारले आहे. मदतीला प्रियंका आलीच आहे, पण मोदी यांच्या नेतृत्वाशी त्यांची तुलना करता येणार नाही. तथापि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर नवे आव्हान उभे आहे. भारतीय जनता पक्ष स्वबळावर बहुमताचा आकडा पार करणे आज तरी शक्य नाही याची जाणीव त्यांना दोन वर्षांपूर्वीच झाली आणि एनडीएच्या अडगळीतील भांड्यांना कल्हई करणे हाच मार्ग बरा असे त्यांना वाटले. पण शिवसेना हे अडगळीतले भांडे कधीच नसल्याने सत्य, देशहित व हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमचे भांडे भांड्यास लागून वाजत राहिले व

खणखणीत नाणे

गाजत राहिले. दबाव आणि मुस्कटदाबी ही भुते आम्ही शिवसेनेच्या मानगुटीवर कधीच बसू दिली नाहीत. आम्ही आमचा बाणा जपला, जपत राहू. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली नाही. 2014 मध्ये भाजपकडून रीतसर काडीमोड झाला असतानाही पुन्हा एकत्र कसे? नक्की कोणत्या मुद्द्यांवर एकत्र येत आहात? राममंदिर उभे राहील काय? शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल काय? असे अनेक प्रश्न आहेत व त्याची उत्तरे सकारात्मक आहेत. लोकशाहीत व खास करून तुमच्या संसदीय लोकशाहीत ‘आकड्या’ला महत्त्व नको तितके आलेच आहे. त्यामुळे हा आकडा जसा इतर लावतात तसा आम्हालाही लावावा लागतो. युतीच्या नव्या मांडणीत नवी आकडेमोड झाली आहे. त्या आकडेमोडीपेक्षा राज्याची नवी ‘मांडणी’ झाली तर ती आम्हाला हवी आहे. 2014 नंतर तलवारी उपसल्या व पुढील चार वर्षे प्रत्येकजण तलवारीस धार काढीत राहिला. पण शिवसेनेची तलवार दुधारी आहे. आई भवानी मातेची आहे. न्याय, सत्यासाठी तळपणारी आहे. आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत संजय राऊतांच्या घरी मेजवानी..भाजप खासदार जाणार ?

News Desk

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : देशभरासह महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे मतदान

News Desk

राममंदिर प्रकरणी शशी थरूर यांचे वादग्रस्त वक्तव्य

Gauri Tilekar