HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

उन्हाचा ‘ताप’ आणि निवडणुकीचा ‘ज्वर’ एकदमच वाढू लागला आहे !

मुंबई । देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यात आता चांद्यापासून बांद्यापर्यंत ऊन वाढतच चालल्याने घामाघूम होण्याची वेळ नेते-कार्यकर्ते आणि सामान्य जनतेवर आली आहे. तापमान आणि प्रचार या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर राज्याच्या बऱ्याच भागात तापमापकातील पाऱ्याने आताच 40 अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश या भागांत नेहमीप्रमाणे पारा 42-43 अंशांपर्यंत भडकला आहे. विद्यमान सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, असे आरोप करीत पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत 22 लाख रिक्त सरकारी पदे भरण्याचे गाजरही दाखविले जात आहे. गरीबांना वर्षाला 72 हजार रुपये ‘किमान हमी उत्पन्ना’च्या स्वरूपात देण्याचा फुगा तर आधीच हवेत सोडण्यात आला आहे. उन्हाचा ‘ताप’ आणि निवडणुकीचा ‘ज्वर’ एकदमच वाढू लागला आहे. तापमानाचा ‘पारा’ चढतो आहे आणि प्रचाराचा ‘वारा’ जोर पकडतो आहे, अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या काळातील परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

पारा चढला की ‘ताप’ वाढतो, ताप वाढला की मन अधीर आणि मेंदू बधिर व्हायला सुरुवात होते. मग तो माणूस असो की निवडणूक. महाराष्ट्रासह देशात सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाचा ‘ताप’ आणि निवडणुकीचा ‘ज्वर’ एकदमच वाढू लागला आहे. तापमानाचा ‘पारा’ चढतो आहे आणि प्रचाराचा ‘वारा’ जोर पकडतो आहे. तापमानाचा पारा एका मर्यादेपर्यंत जाऊन थांबेल, पण निवडणुकीच्या वाऱ्याचे काय होणार, याची दिशा काय असणार, या वाऱ्याची वावटळ होणार का, त्यात कोण सरस ठरणार आणि कोणाचा विरस होणार या प्रश्नांची उत्तरे मे महिन्याच्या 23 तारखेसच मिळू शकतील. तूर्त मात्र देशात ‘पारा’ चढू लागला आणि (निवडणुकीचा) ‘वारा’ घुमू लागला आहे एवढेच म्हणता येईल.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यात आता चांद्यापासून बांद्यापर्यंत ऊन वाढतच चालल्याने घामाघूम होण्याची वेळ नेते-कार्यकर्ते आणि सामान्य जनतेवर आली आहे. तापमान आणि प्रचार या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर राज्याच्या बऱ्याच भागात तापमापकातील पाऱ्याने आताच 40 अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश या भागांत नेहमीप्रमाणे पारा 42-43 अंशांपर्यंत भडकला आहे. अर्थात राज्याच्या काही भागांत अवकाळी पाऊसही हजेरी लावत आहे. कुठे उन्हाचा तर कुठे गारांचा तडाखा, कुठे प्रचाराची राळ तर कुठे सभांचा धुरळा, कुठे भाषणबाजी तर कुठे जाहिरातबाजी, कुठे आश्वासनांची पतंगबाजी तर कुठे या पतंगांची काटाकाटी असेच एकंदर चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. निवडणुकीचा ‘ज्वर’ अद्याप टोकाला गेलेला नसला तरी त्याचाही ‘पारा’ हळूहळू वर चढू लागला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांचे दौरे, प्रचारसभा वाढू लागल्या आहेत. परस्परांवर टीकाटिप्पणी, एकमेकांची उणीदुणी सर्रास काढली जात आहेत. प्रचाराची ‘पातळी’ खाली घसरली किंवा कसे हा चर्चेचा मुद्दा असला तरी निवडणूक आश्वासने मात्र सेन्सेक्सप्रमाणे

रोज नवीन उसळी

घेत आहेत. सत्ताधारी पक्ष केलेले काम आणि भविष्यातील त्याच्या सुपरिणामांचे दाखले देत आहे. तर विरोधी पक्ष रोज नवनव्या आश्वासनांचे फुगे हवेत सोडत आहेत. देशाच्या संरक्षण धोरणाची ‘ब्लू प्रिंट’ तयार असल्याचे एकीकडे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे पुलवामा आणि हवाई हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे उद्योगही सुरूच आहेत. विद्यमान सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, असे आरोप करीत पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत 22 लाख रिक्त सरकारी पदे भरण्याचे गाजरही दाखविले जात आहे. गरीबांना वर्षाला 72 हजार रुपये ‘किमान हमी उत्पन्ना’च्या स्वरूपात देण्याचा फुगा तर आधीच हवेत सोडण्यात आला आहे. त्याला टाचणी लावण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. निवडणूक प्रचार संपेपर्यंत, म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास आधीपर्यंत राजकीय पक्षांच्या आश्वासनांचा ‘पारा’ हा असा उसळीच मारीत राहील. कारण तोपर्यंत निवडणुकीचा ‘ताप’ही ‘थर्मामीटर’ फोडून ‘पारा’ बाहेर येण्याइतपत वाढला असेल. एकीकडे उन्हाचा ताप आणि दुसरीकडे निवडणुकीचा पारा हे दोन्ही पुढील काळात वाढतच जाणार आहेत. निवडणूक, त्यातही लोकसभा म्हणजे

देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक

असल्याने हे सर्व होणारच. त्यात याही वेळी विद्यमान सत्ताधाऱ्यांचेच पारडे जड म्हटल्यावर सत्तेच्या लोण्याकडे गेली पाच वर्षं डोळे लावून बसलेल्यांचा धीर आणि तोल सुटण्याचीच शक्यता जास्त. पुण्यासारख्या ठिकाणी ‘उमेदवार ठरवता येईना, निवडणूक वाकडी’ अशी ज्या पक्षाची अवस्था आहे त्या पक्षाने विनाउमेदवार प्रचार सुरू केला. हे धीर सुटल्याचेच लक्षण म्हणावे लागेल. पारा चढला की ‘ताप’ वाढतो, ताप वाढला की मन अधीर आणि मेंदू बधिर व्हायला सुरुवात होते. मग तो माणूस असो की निवडणूक. महाराष्ट्रासह देशात सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाचा ‘ताप’ आणि निवडणुकीचा ‘ज्वर’ एकदमच वाढू लागला आहे. तापमानाचा ‘पारा’ चढतो आहे आणि प्रचाराचा ‘वारा’ जोर पकडतो आहे. तापमानाचा पारा एका मर्यादेपर्यंत जाऊन थांबेल, पण निवडणुकीच्या वाऱ्याचे काय होणार, याची दिशा काय असणार, या वाऱ्याची वावटळ होणार का, त्यात कोण सरस ठरणार आणि कोणाचा विरस होणार या प्रश्नांची उत्तरे मे महिन्याच्या 23 तारखेसच मिळू शकतील. तूर्त मात्र देशात ‘पारा’ चढू लागला आणि (निवडणुकीचा) ‘वारा’ घुमू लागला आहे एवढेच म्हणता येईल.

 

Related posts

माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे | राम कदम

News Desk

राज ठाकरे साधणार उत्तर भारतीयांशी संवाद

News Desk

एअर स्ट्राईकमध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा, शहाचा दावा

News Desk