HW News Marathi
राजकारण

शेवटी शिवसेनेलाच हिंदुत्वाची वज्रमूठ आवळावी लागली!

मुंबई । शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यांवर भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. यात ठाकरे यांनी म्हटले आहे की, 25 वर्षांपूर्वी बाबरीचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी शेवटी शिवसेनेलाच हिंदुत्वाची वज्रमूठ आवळावी लागली याचे विस्मरण ज्यांना झाले. तेच आज 25 च्या मुहूर्तासाठी आटापिटा करीत आहेत. सभा, संमेलने भरवून राजकीय हुंकार भरवण्यात आम्हाला रस नाही. हुंकार भरणाऱ्यां नाही आमच्या शुभेच्छाच आहेत. 25 नोव्हेंबरचा मुहूर्त देणारे पंचांग मात्र लोकांसमोर आणा!

सामनाचे आजचे संपादकीय

25 वर्षांपूर्वी बाबरीचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी शेवटी शिवसेनेलाच हिंदुत्वाची वज्रमूठ आवळावी लागली याचे विस्मरण ज्यांना झाले तेच आज 25 च्या मुहूर्तासाठी आटापिटा करीत आहेत. आम्ही शक्ती प्रदर्शनाच्या भानगडीत न पडता रामास सरकारी तुरुंगवासातून मुक्त करण्यासाठी हिंदू जागरण सुरू केले आहे. सभा, संमेलने भरवून राजकीय हुंकार भरवण्यात आम्हाला रस नाही. हिंदुत्वाचा एल्गार शिवसेनाप्रमुखांनी पेटवलाच आहे. हुंकार हा त्या एल्गाराचाच भाग आहे. हुंकार भरणाऱ्यांनाही आमच्या शुभेच्छाच आहेत. 25 नोव्हेंबरचा मुहूर्त देणारे पंचांग मात्र लोकांसमोर आणा!

राममंदिर उभारण्यासाठी संघाची 25 नोव्हेंबरला ‘हुंकार रॅली’ होणार आहे. असे कोरडे हुंकार भरून राममंदिराची निर्मिती होणार असेल तर 25 वर्षांपूर्वी आम्ही शेकडो करसेवकांचे बळी का दिले? याचे उत्तर देशाला मिळायला हवे. 25 तारखेचा जो काही हुंकार मुहूर्त या मंडळींनी काढला आहे, त्यासाठी नक्की कोणत्या पंचांगाचा आधार घेतला? कारण 25 तारखेस राममंदिराच्या प्रश्नी लढा उभारण्याचे किंवा हुंकार वगैरे भरण्याचे संघाच्या मनात आधी नव्हते. राममंदिर हा एक राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे याचा विसरच पडला होता, पण दसऱ्याच्या शिवसेना मेळाव्यात आम्ही 25 तारखेस अयोध्येस जात असल्याची घोषणा करताच अनेकांची पंचांगे व दिनदर्शिका भिंतीवरच फडफडू लागल्या. शिवसेनेने 25 तारखेस अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेण्याचे ठरवले ही आमच्यासह कोट्यवधी हिंदूंची ‘मन की बात’च म्हणावी लागेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘बेडर’ विचारांचे हिंदुहृदयसम्राट होते व आम्ही भिंतीवरील दिनदर्शिकांची फडफड न पाहता 25 तारखेस अयोध्येस जाण्याचे ठरवले त्यामागे शिवसेनाप्रमुखांचीच प्रेरणा आहे. तोपर्यंत याप्रश्नी सगळ्यांचीच ‘सामसूम’ व तोंड बंद आंदोलन सुरू होते. आता 25 तारखेस भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद वगैरे लोक राममंदिरासाठी जो काही ‘हुंकार’ उत्सव साजरा करीत आहेत त्याबद्दल आमच्या मनात कटुता अथवा द्वेष नसून

त्यांच्या हुंकाराचे

आम्ही स्वागत करीत आहोत. त्यांच्या हुंकारातून क्रांतीच्या ज्वाला पेटणार असतील व चेतना निर्माण होणार असेल तर आम्हीही कोणताही मुहूर्त न पाहता त्यात आमच्या समिधा टाकायला तयार आहोत. आम्हाला मंदिरप्रश्नी हिंदुत्ववाद्यांत फुटीचे प्रदर्शन नको. ‘हुंकार’ मंडळींनी त्यांचा वेगळा मंच 25 च्या मुहूर्तावर अयोध्येतच उभारला व त्यासाठी साधू, संत, महंतांना आमंत्रित केले. त्या मंचास आमचा सादर प्रणामच आहे. राममंदिरप्रश्नी असे वेगवेगळे ‘मंच’ प्रदर्शन करणाऱ्यांनीच रामास वनवासात पाठवले आहे काय? असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. शिवसेनेने 25 च्या मुहूर्तावर अयोध्येत पाऊल ठेवण्याचे ठरवले म्हणून त्यात हा खोडा घालण्याचा प्रयत्न आहे असे कुणी म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न. आम्ही यास षड्यंत्र, टांग मारणे, खोडा घालणे वगैरे मानत नाही. किंबहुना शिवसेनेने राममंदिरासाठी अयोध्येत जाऊन धक्का देण्याचा मुहूर्त जाहीर करताच अनेकांचे कोमेजलेले मेंदू हालचाल करू लागले आहेत. कालपर्यंत झोपलेल्यांनी आता ‘हुंकार’ वगैरे भरून सांगितले की, राममंदिर व्हायलाच हवे व आम्ही त्यासाठी आंदोलन करू. हा शिवसेनेच्याच भूमिकेचा विजय आहे. मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेताच पहिल्या सहा-एक महिन्यांत राममंदिरासाठी हुंकार भरले असते तर एव्हाना रामाला हक्काचे मंदिर अयोध्येत मिळाले असते. आता दिल्लीत व अयोध्येत आमचे संतमहात्मे

राममंदिरप्रश्नी बैठका

घेत आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेने राममंदिरासाठी अयोध्येतच साधू-संतसंमेलन घेण्याची घोषणा व्हावी व त्याचीही तारीख 25 नोव्हेंबर ठरावी, या मुहूर्त शोधनाबद्दल संबंधित यजमानांना ‘धर्मभास्कर’ किंवा ‘मुहूर्तभास्कर’ अशी पदवी देऊन त्यांचा गौरव करायला हरकत नाही. त्यांच्या अशा ‘आडव्या’ जाण्याने शिवसेनेच्या अयोध्या वारीत अजिबात बदल होणार नाही. आम्ही प्रभू श्रीरामाचे दर्शन अयोध्येत जाऊन घेत आहोत. आम्हाला श्रीरामाच्या अयोध्या नगरीचा हुंकार आहे, हे प्रभू श्रीरामाचे शिवसेनेस निमंत्रण आहे व आम्ही ते नम्रपूर्वक स्वीकारले आहे. 25 वर्षांपूर्वी बाबरीचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी शेवटी शिवसेनेलाच हिंदुत्वाची वज्रमूठ आवळावी लागली याचे विस्मरण ज्यांना झाले तेच आज 25 च्या मुहूर्तासाठी आटापिटा करीत आहेत. ते काहीही असो, असल्या बालिश खेळ्या करून ना हिंदुत्व मजबूत होते ना राममंदिराचा प्रश्न धसास लागतो. आम्ही शक्ती प्रदर्शनाच्या भानगडीत न पडता रामास सरकारी तुरुंगवासातून मुक्त करण्यासाठी हिंदू जागरण सुरू केले आहे. सभा, संमेलने भरवून राजकीय हुंकार भरवण्यात आम्हाला रस नाही. हिंदुत्वाचा एल्गार शिवसेनाप्रमुखांनी पेटवलाच आहे. हुंकार हा त्या एल्गाराचाच भाग आहे. सगळ्यांनी मिळून राममंदिर उभे करूया. हुंकार भरणाऱ्यांनाही आमच्या शुभेच्छाच आहेत. 25 नोव्हेंबरचा मुहूर्त देणारे पंचांग मात्र लोकांसमोर आणा!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आईचे दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नकोय”, मुख्यमंत्र्यांचा राज्यसभेत दगा देणाऱ्यांना सूचक इशारा

Aprna

राजस्थानमध्ये जागावाटपावरून गेहलोत-पायलट समोरासमोर

News Desk

शिवसेनेचा 56 वर्धापन दिन हॉटेल वेस्ट इनमध्ये होणार साजरा; उद्धव ठाकरे काय बोलणार?

Aprna