HW News Marathi
राजकारण

चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत ?

मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठीचे प्रचार संपल्यानंतरपासूनच देशातील राजकीय पक्षांकडून निवडणुकांच्या निकालानंतरची रणनीती आखण्यासाठी अत्यंत वेगाने पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी शनिवारी (१८ मे) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बसप अध्यक्षा मायावती आणि सप अध्यक्ष अखिलेश यादव या सर्व नेत्यांची भेट घेतली होती. दरम्यान, यानंतर २४ तासांच्या आतच नायडू यांनी रविवारी दुसऱ्यांदा (१९ मे) शरद पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, आता शिवसेनेकडून या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत ? चंद्राबाबूंचा सध्याचा उत्साह गुरुवार संध्याकाळपर्यंत टिकून राहो! अशा शुभेच्छा आम्ही त्यांना देत आहोत”, असा टोला देखील शिवसेेनेकडून लगावण्यात आला आहे.

काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?

अनेक कुबड्यांच्या आधारे सरपटणारे पंगू सरकार देशाला परवडणार नाही. महाआघाडीत पंतप्रधानपदाचे किमान पाच उमेदवार आहेत. या पाचांचा पचका होण्याचीच चिन्हे जास्त दिसत आहेत. सरकार कोणाचे? हा प्रश्न निकाली निघाला आहे. अमित शहा यांचा आत्मविश्वास सांगतोय की, भाजप स्वबळावर 300 जागा जिंकेल व तो टप्पा त्यांनी निवडणुकीच्या पाचव्या चरणातच पार केला. आता योगी आदित्यनाथ यांनी ‘अब की बार 400 पार’ची खात्री दिली. त्यामुळे चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत? चंद्राबाबूंचा सध्याचा उत्साह गुरुवार संध्याकाळपर्यंत टिकून राहो! अशा शुभेच्छा आम्ही त्यांना देत आहोत.

मान्सून अंदमानात दाखल झाल्याची बातमी आनंददायक आहे आणि त्याचवेळी चंद्राबाबू नायडू हे सरकार स्थापनेसाठी जुळवाजुळव करण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मनोरंजक आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश दुष्काळाशी झुंजतो आहे व मान्सूनची प्रतीक्षा करतो आहे हे खरे, पण 23 तारखेला दिल्लीचे वारे बदलणार काय यावर पैजा लागल्या आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथमधील एका गुहेत भगव्या वस्त्रात तपस्येला बसल्याची छायाचित्रे विरोधकांची मने विचलित करीत आहेत. ‘विरोधकांचा फाजील सेक्युलरवाद विरुद्ध मोदी यांचा हिंदुत्ववाद’ असा हा सामना आहे. शेवटी भाजपास व मित्रपक्षांना विजयप्राप्तीसाठी हिंदुत्वाचाच आधार घ्यावा लागला हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय आहे. 23 तारखेचे निकाल आपल्या मुठीत राहावेत यासाठी चढाओढ सुरू आहे. शेवटचे तीन-चार दिवस मोदी यांनी मौन स्वीकारले व ते भगव्या वस्त्रात वावरले. त्याच रूपात त्यांनी देशाला दर्शन दिले. देवदर्शन केल्याने मनाला शांती मिळते. मोदी यांनी तेच केले. आपण ध्यान केले, पण देवाकडे काहीच मागितले नसल्याचा खुलासा त्यांनी केला. मागितले नाही तरीही देव त्यांच्या हाती पुन्हा दिल्लीच्या किल्ल्या ठेवणार असल्याचे एकंदरीत वातावरण दिसते, पण ‘डुप्लिकेट चाव्या’ बनवून दिल्लीचा दरवाजा उघडता येईल काय यावर विरोधी पक्षही कामास लागला व त्या मोहिमेचे नेतृत्व चंद्राबाबू नायडू करीत आहेत असे दिसते. रविवारी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. गुरुवारी मतमोजणी होईल. त्याआधीच सर्व

विरोधी पक्षांची एक मोट

बांधण्याचा प्रयत्न चंद्राबाबू नायडू करीत आहेत. चंद्राबाबू दिल्लीत आले. त्यांनी शरद पवार, राहुल गांधी यांच्या भेटी घेतल्या. तिथून ते लखनौला गेले. मायावती, अखिलेश यादवना भेटले. द्रमुकच्या स्टॅलिन महाशयांनाही ते भेटले. देवेगौडा यांच्या जनता दलाचा एक तुकडा काँग्रेसबरोबर आहे, पण कर्नाटकात स्वतः देवेगौडा हे पराभवाच्या छायेत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ला दिल्ली, पंजाब किंवा हरयाणात एकही खासदार निवडून आणता येणार नाही. प. बंगालात डाव्यांना खातेही खोलता येणे शक्य नाही. केरळात त्यांच्या जागा घसरत आहेत. त्यामुळे चंद्राबाबू सत्तास्थापनेसाठी मोट बांधत नसून राजकीय स्मशानातली ‘राख’ गोळा करीत आहेत. आंध्रात चंद्राबाबू यांचा तेलुगू देसम पक्ष चांगली लढत देत असला तरी यावेळी आंध्रात वायएसआर काँग्रेसच्या जगनभाईंचा जोर आहे व चंद्राबाबू-जगन यांच्यातून विस्तव जात नाही. बाजूच्या तेलंगणातही काँग्रेस, तेलुगू देसमच्या तुलनेत के. सी. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला मोठी आघाडी मिळत आहे आणि तिथेही चंद्रशेखर व चंद्राबाबू यांच्या नात्याला तडे गेले आहेत. दिल्लीत येण्याआधी चंद्राबाबूंनी जगन व चंद्रशेखर यांच्याबरोबर स्नेहभोजन केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली असती तर त्यांच्या दिल्लीतील हालचालींना बळ मिळाले असते, पण चंद्राबाबू यांनी दिल्लीत जाऊन शरद पवारांची दोनवेळा भेट घेतली व त्यांना आंब्याची पेटी भेट दिली. चर्चा करायला हरकत नाही, पण ही ‘मोट’ 23 तारखेच्या संध्याकाळपर्यंत

कोणत्या खडकावर आपटून फुटेल

याची खात्री नाही. दिल्लीचे राजकारण गुरुवारनंतर अस्थिर राहील, असे काहींना वाटते. त्या अस्थिरतेच्या गंगा-यमुनेत हात धुऊन घ्यावेत असे मनसुबे अनेकांनी रचले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीस बहुमत मिळाले नाही तर काय यावर ही धावाधाव सुरू आहे. मोदी यांना बहुमत मिळणारच नाही असे गृहीत धरून सर्व चालले आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अंदमानात मान्सून दाखल झाला हे खरे, पण दिल्लीत 23 तारखेस सत्तेचा हवापालट होईल काय यावर आताच चर्चा करण्यात अर्थ नाही. विरोधकांना काहीही करून मोदी यांना सत्ता मिळू द्यायची नाही, पण त्यासाठी ते एकापेक्षा जास्त कुबड्या शोधू लागले आहेत. एखादे सरकार ‘टेकू’वर टिकेल, पण अनेक कुबड्यांच्या आधारे सरपटणारे पंगू सरकार देशाला परवडणार नाही. महाआघाडीत पंतप्रधानपदाचे किमान पाच उमेदवार आहेत. या पाचांचा पचका होण्याचीच चिन्हे जास्त दिसत आहेत. सरकार कोणाचे? हा प्रश्न निकाली निघाला आहे. अमित शहा यांचा आत्मविश्वास सांगतोय की, भाजप स्वबळावर 300 जागा जिंकेल व तो टप्पा त्यांनी निवडणुकीच्या पाचव्या चरणातच पार केला. आता योगी आदित्यनाथ यांनी ‘अब की बार 400 पार’ची खात्री दिली. त्यामुळे चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत? चंद्राबाबूंचा सध्याचा उत्साह गुरुवार संध्याकाळपर्यंत टिकून राहो! अशा शुभेच्छा आम्ही त्यांना देत आहोत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारजी हे बदललेल्या वाऱ्याची दिशा आधीच ओळखतात !

News Desk

आपण संघाच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात !

News Desk

आमचं घोडं कुठेही अडलेलं नाही, उलट उधळलंय !

News Desk