HW News Marathi
राजकारण

“…राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण वाढले”, सामनातून टोला

मुंबई | “शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे”, असा टोला सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लगावला आहे. महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे व सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व इतर सरकारी कार्यालयांत होत असते, असे म्हणत सामनाच्या आजच्या (17 जानेवारी) अग्रलेखात विरोधकांसोबत झालेल्या अपघात आणि विचित्र घटनांचा उदाहरण देत शिंदेंवर निशाणा साधला आहे.

 

सामनाच्या अग्रलेखात म्हटले, “मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचे चाळीस आमदार हे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचे बोलले जाते. हे बळी म्हणे मुख्यमंत्रीपदाच्या स्थैर्यासाठी दिले. पुन्हा हे लोक त्याच मंदिरात नवस फेडण्यासाठी जाऊन आले”, असे म्हणत त्यांनी शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. “महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्यात जादूटोणा, सरकारी बंगल्यावरील मिरची यज्ञ वगैरे अघोरी प्रथांना स्थान नाही, पण शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही”, असे सामनामध्ये म्हटले.

 

सामनामध्ये नेमके काय म्हणाले

जादूटोणा, लिंबू-मिरची, टाचण्या, काळय़ा बाहुल्या, रेडा बळी ही काही महाराष्ट्र राज्याची ओळख असता कामा नये. तशी ती होताना दिसत आहे. मागे एकदा मुख्यमंत्री महोदय हे नागपुरातील रेशीम बागेतील संघ मुख्यालयात गेले.

त्यावेळी लोकांनी त्यांची गंमत केली. ”सरसंघचालकांनी सावधानता बाळगावी. मुख्यमंत्री येऊन गेलेत. संघ मुख्यालयातील कोपऱ्यात सुया, टाचण्या, लिंबू वगैरे पडले आहेत का तपासा!” असा सध्या चेष्टेचा विषय झाला आहे खरा. महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत. यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे.

महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध नेहमीच लढा दिला. जादूटोणा वगैरे अंधश्रद्धेस मूठमाती देण्यासाठी सरकारने कायदा केला, पण महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे व सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व इतर सरकारी कार्यालयांत होत असते. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचे चाळीस आमदार हे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचे बोलले जाते. हे बळी म्हणे मुख्यमंत्रीपदाच्या स्थैर्यासाठी दिले. पुन्हा हे लोक त्याच मंदिरात नवस फेडण्यासाठी जाऊन आले. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्यात जादूटोणा, सरकारी बंगल्यावरील मिरची यज्ञ वगैरे अघोरी प्रथांना स्थान नाही, पण शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही. काल पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. उपस्थितांच्या लक्षात हा प्रकार आल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचदरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका विचित्र लिफ्ट अपघातातून बालबाल बचावले. पवार हे तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जायला निघाले. मध्येच वीज गेली आणि चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या आधीच लिफ्ट धाडकन खाली कोसळली. पवार म्हणतात, ”मी मोठय़ा अपघातातून वाचलो, नाहीतर श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती.” अजितदादा हे

पुरोगामी विचारांचे

आहेत, पण त्यांचे लोक म्हणतात की, काहीतरी गडबड आहे! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे नागपूर अधिवेशनाच्या वेळी अपघातात जखमी झाले व त्यांचा उजवा खांदा निखळल्याने ते आजही सक्रिय नाहीत. विरोधकांचा बुलंद आवाज धनंजय मुंडे यांना त्यांच्याच बीड जिल्हय़ात मोठा अपघात झाला. त्यांची कार चक्काचूर झाली. मुंडे थोडक्यात बचावले, पण त्यांच्या छातीच्या बरगडय़ा तुटल्याने ते इस्पितळात खाटेला खिळून आहेत. शिवसेनेचे संजय राऊत यांनाही नाहक तुरुंगात जावे लागले ते याच राजकीय जादूटोण्यामुळे. विनायक मेटे यांनाही अपघाती मरण आले. ते गेल्या काही काळापासून भाजपच्या विरोधात बोलू लागले होते. विरोधकांना अशा प्रकारे इस्पितळांच्या खाटांवर खिळवून ठेवणारी ही मालिका काय सांगते? यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’वरील अखेरच्या काळात भयंकर आजारास सामोरे जावे लागले. त्यांच्यावर अचानक अवघड व जीवघेण्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यामुळे काही काळ ते अत्यवस्थ झाले होते आणि त्याच वेळी महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे प्रयोग सुरू झाले. म्हणजे महाराष्ट्रातील ‘करणी टोळी’चे अघोरी प्रयोग हे आधीपासूनच सुरू होते. या अघोरी प्रयोगांचे फटके महाराष्ट्राच्या जनमानसाला बसत आहेत. ही एक प्रकारे अंधश्रद्धा असली तरी लोकांच्या मनात या अंधश्रद्धा घट्ट रुजत आहेत हे काही बरे नाही. महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख लोकांवर अपघात, घातपात, चौकश्यांची संकटे एकापाठोपाठ कोसळत आहेत. त्यामागे मुख्यमंत्र्यांचे ‘जादूटोणा’ प्रेम आहे असे

लोकांना वाटत असेल तर

संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे अशा अंधश्रद्धांविरुद्ध लढणाऱ्या समाजधुरिणांचा तो पराभव ठरेल. नरेंद्र दाभोलकर हे हयातभर या अंधश्रद्धेविरुद्ध लढले व शेवटी त्यांचाही निर्घृण पद्धतीने बळी घेतला गेला. आज महाराष्ट्रात कुठे काही घडले की लोकांच्या मनात येते की, ”अरे बापरे, हा तर जादूटोण्याचाच प्रकार!” लोकांचा आत्मविश्वास डळमळीत होत असल्याचे हे लक्षण मानायचे काय? राज्याचे मुख्यमंत्री कुठे दौऱ्यावर गेले की, ते एखादा ज्योतिषी अथवा तंत्रविद्येच्या अभ्यासकाच्या खास भेटीगाठी घेतात हे काही लपून राहिलेले नाही. ही महाराष्ट्राची प्रगती नसून अधोगती आहे. कामाख्या देवीला रेडय़ाचा बळी देऊन सरकार आणले ही धारणा फुटलेल्या चाळीस आमदारांची आहे. रेडय़ाचा बळी दिला नाही हे मुख्यमंत्री व त्यांच्या लोकांनी कामाख्या देवीच्या शपथेवर सांगावे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना अपघात व घातपाताची नाट लागली. त्याचा संबंध या रेडा बळीशी आहे काय, तेसुद्धा लोकांसमोर येऊ द्या. जादूटोणा, लिंबू-मिरची, टाचण्या, काळय़ा बाहुल्या, रेडा बळी ही काही महाराष्ट्र राज्याची ओळख असता कामा नये. तशी ती होताना दिसत आहे. मागे एकदा मुख्यमंत्री महोदय हे नागपुरातील रेशीम बागेतील संघ मुख्यालयात गेले. त्यावेळी लोकांनी त्यांची गंमत केली. ”सरसंघचालकांनी सावधानता बाळगावी. मुख्यमंत्री येऊन गेलेत. संघ मुख्यालयातील कोपऱ्यात सुया, टाचण्या, लिंबू वगैरे पडले आहेत का तपासा!” असा सध्या चेष्टेचा विषय झाला आहे खरा. महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे.

Related posts

“भारत जोडो यात्रेत ‘मविआ’च्या काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशांचा वापर”, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

Aprna

उद्धव ठाकरे आज नाशिक, औरंगाबादच्या दौऱ्यावर

News Desk

नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण, विरोधकांनी ‘डार्क डे’ म्हणून केला निषेध

News Desk