HW News Marathi
राजकारण

राज्य छत्रपती, आंबेडकरांचे, गहाण कोण ठेवतंय | ठाकरे

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ‘वेळ पडली तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तरी आम्ही ते करू’, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जाहीर सभेत केले होते. या विधानानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून समाचार घेतला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

पुढच्या पिढीस प्रेरणा देणारी छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभारायलाच हवीत. त्यांच्या स्मारकांसाठी पैसे नाहीत व त्यासाठी राज्य गहाण ठेवू, असे मुख्यमंत्री जाहीर सभांतून बोलतात, हे बरे नाही. मुळात राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? राज्याचा सातबारा छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकरांच्या नावावर आहे. त्यांचे राज्य तुम्ही गहाण कसे टाकणार? मुख्यमंत्री येतात व जातात. सरकारे बदलत असतात, पण राज्य कायम राहते. त्यामुळे राज्य गहाण टाकण्याची भाषा कुणी करीत असेल तर ते योग्य नाही.

हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच आहे. आजच्या महाराष्ट्राला प्रतिष्ठा या चार स्तंभांमुळेच मिळाली आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. रामदास आठवले यांच्या ठाण्यातील सभेत मुख्यमंत्री जोरात, पण अतिउत्साहाने बोलले. ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे राज्य पुरोगामी विचारांवर पुढे चालले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तर त्यासाठी माझी तयारी असेल,’’ असे एक टाळीचे वाक्य मुख्यमंत्र्यांनी या सभेत केले. डॉ. आंबेडकर आज हयात असते तर राज्य गहाण ठेवण्याची भाषा करणाऱ्या राज्यकर्त्यांवर काठीच उगारली असती. या निमित्ताने राज्यकर्त्यांनी कबुली दिली आहे की, राज्य आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आले आहे व कर्ज काढून सण-उत्सव साजरे केले जात आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी परिस्थिती आहे. मध्यंतरी वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करताच राज्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. अर्थात सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असला तरी ज्याप्रकारे घोषणांचा पाऊस पडतो आहे तो थक्क करणारा आहे. या परिस्थितीतून मार्ग काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रातील स्मारक व इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे करायचे आहे. पैशांअभावी ही स्मारके रखडणार असतील तर ते राज्याला शोभादायक नाही. इतक्या उंचीची खर्चिक स्मारके कशाला, हा प्रश्न विचारला जात आहे. मुळात या उंचीची माणसे पुन्हा निर्माण होणार नाहीत. म्हणून पुढच्या पिढीस प्रेरणा देणारी छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभारायलाच हवीत. त्यांच्या स्मारकांसाठी पैसे नाहीत व त्यासाठी

राज्य गहाण ठेवू

असे मुख्यमंत्री जाहीर सभांतून बोलतात, हे बरे नाही. मुळात राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? राज्याचा सातबारा छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकरांच्या नावावर आहे. त्यांचे राज्य तुम्ही गहाण कसे टाकणार? मुख्यमंत्री येतात व जातात. सरकारे बदलत असतात, पण राज्य कायम राहते. त्यामुळे राज्य गहाण टाकण्याची भाषा कुणी करीत असेल तर ते योग्य नाही. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी वाटल्यास बुलेट ट्रेनचे महागडे प्रकल्प रद्द करू, समृद्धी महामार्गावरील उधळपट्टी थांबवू, असे सांगितले असते तर ते व्यवहारी ठरले असते, पण बुलेट ट्रेन हे मोदींचे स्वप्न आहे. समृद्धी महामार्ग हे फडणवीसांचे स्वप्न आहे. या स्वप्नांना मूर्तस्वरूप देण्यासाठी पैसे आहेत, पण डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी हे लोक राज्य गहाण ठेवायला निघाले आहेत. तुम्ही गहाण ठेवलेले राज्य सोडवायचे कोणी? डॉ. आंबेडकर स्मारकासाठी पैसा कमी पडू देणार नाही ही आधी भाषा होती. पंतप्रधान मोदी इंदू मिलमध्ये मुहूर्ताची कुदळ मारायला आले तेव्हाची फडणवीस – मोदींची भाषणे तपासून पाहा. या स्मारकासाठी पैसा कमी पडणार नाही असे मोदी-फडणवीस म्हणाले होते. म्हणजे महाराष्ट्र राज्य गहाण ठेवून तुम्ही हा पैसा कमी पडू देणार नव्हता, असा याचा अर्थ आता जनतेने घ्यायचा का? पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरीस पोहोचले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेल लिटरमागे पाच रुपयांनी स्वस्त केले असले तरी या निर्णयाला तसा उशीरच केला आहे. या मधल्या काळात इंधनाच्या रोजच्या दरवाढीमुळे एक लाख कोटींचा रोजचा नफा सरकारी तिजोरीत गेलाच आहे. त्यातले पाच-दहा हजार कोटी रुपये केंद्राने छत्रपती शिवराय व डॉ. आंबेडकरांच्या स्मारकांसाठी दिले तर राज्य गहाण टाकण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येणार नाही.

सरकारी जाहिरातींवर हजारो कोटी

फेकले जात आहेत. तेथे कात्री लावा. प्रत्येक निवडणुकीत भाजप विजांचा कडकडाट व्हावा तसा पैशांचा पाऊस पाडत असतो. म्हणजे सत्ता मिळवायला पैसे आहेत, पण आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा होते. बाबासाहेबांचे स्मारक मतांसाठी नाही, तर मानवंदनेसाठी उभारले जात आहे, असे मुख्यमंत्री सांगतात. पण राज्य गहाण ठेवून दिलेली मानवंदना डॉ. आंबेडकर व त्यांचे लाखो अनुयायी स्वीकारणार नाहीत. मायावती मुख्यमंत्री असताना लखनौला त्यांनी आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारले ते जगातले आठवे आश्चर्यच ठरावे. त्यासाठी मायावतींनी त्यांचे राज्य गहाण ठेवले नव्हते. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा नर्मदा नदीच्या पात्रात उभारण्याचे काम बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. आता तो पूर्णत्वाला आला आहे आणि लवकरच त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पुतळय़ाची उंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित पुतळय़ापेक्षाही जास्त आहे. मात्र सरदार पटेल यांच्या या पुतळय़ासाठी तेथील भाजप सरकारने गुजरात राज्य गहाण ठेवलेले नाही. किंबहुना तेथील मुख्यमंत्र्यांनी तशी भाषादेखील कधी केली नाही. अमेरिकेनेही समुद्रात ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ म्हणजे स्वातंत्र्यदेवतेचा अतिभव्य पुतळा उभारला आहे. मात्र त्यासाठी ना अमेरिकेला गहाण ठेवले गेले ना तेथील राज्यकर्ते तसे काही म्हणाले. मग महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा करण्याची वेळ का आली? मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही जाहीर सभांमधून अशी अनेक वाक्ये फेकली आहेत. त्यामुळे त्या क्षणापुरत्या त्यांना टाळय़ा मिळतही असतील, पण अशा ‘अतिउत्साही’ वक्तव्यांमुळे सरकारची, राज्याची ‘इभ्रत गहाण’ ठेवण्याची वेळ येऊ शकते. मुख्यमंत्री महोदय, टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका!

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांना स्वाईन फ्लू, उपचार सुरू

swarit

दोन नेते, दोन मेळावे, कोण गाजवणार मैदान?

Manasi Devkar

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप 40 स्टार प्रचाराकांची यादी जाहीर

Aprna