मुंबई | कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या सर्वांना पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (१९ ऑगस्ट) मुंबईत बैठक घेतली होती. यात मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे एक हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांनी जे पीक घेतले असेल त्या पिकासाठी घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही, परंतु त्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना सरकारी नुकसान भरपाईच्या तीनपट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.”
Interacting with media on decisions for flood affected persons after chairing Cabinet Sub-Committee Meeting today in Mumbai. https://t.co/pjFRp3k4VE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2019
“प्रधानमंत्री आवास योजनेच्या वतीने ज्या घरांना पूराचा फटका बसला आहे, त्यांना नवीन घर आणि अतिरिक्त एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाड्याने राहण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना २४ हजार रुपये आणि शहरी भागातील लोकांना ३६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरे बांधण्यासाठी ५ ब्रास वाळू आणि ५ ब्रास मुरुम मोफत दिला जाणार आहे”
पूरग्रस्तांना पुढील तीन महिने मोफत धान्य दिले जाणार असून जनावरे आणि गोठ्यांसाठी मदत करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे आयकर आणि जीएसटी भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.