HW News Marathi
राजकारण

सर्जिकल स्ट्राईकचे चाललेले राजकारण थांबले तरी पुरे | ठाकरे

मुंबई | जम्मू-काश्मीरची सध्याची परिस्थिती पाहता दहशतवाद्यांविरूद्ध पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची करण्याची गरज असल्याचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी सांगितले. रावत यांच्या विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून खसपूस समाचार घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झाला. हा सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच झाला होता, पण सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडा मिळाला काय? या स्ट्राईकने पाकचे शेपूट सरळ झाले नसेल तर दुसऱया ‘स्ट्राईक’ची धमकी कसली देता? सर्जिकल स्ट्राईक हा शत्रूला अचानक धक्का देण्यासाठी केला जातो. पण अशा धक्क्याने डोके ताळय़ावर येईल ते पाकिस्तान कसले! आपल्या लष्करप्रमुखांचा आशावाद दुर्दम्य आहे, पण पाकिस्तानकडून आशा बाळगता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण चालले आहे. ते थांबले तरी पुरे.

सामनाचे आजचे संपादकीय

पाक सुधारला नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू, असे हिंदुस्थानच्या लष्करप्रमुखांनी सांगितले आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या अजूनही भाजप प्रवक्त्याच्या भूमिकेतून बाहेर पडलेल्या नाहीत. सध्या गाजत असलेल्या राफेल घोटाळाप्रकरणी वकिली करण्यात त्या अडकून पडल्याने लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिलेला दिसतो. पाकिस्तानी कुत्र्याचे शेपूट सत्तर वर्षांपासून वाकडे ते वाकडेच आहे. पाकिस्तान सुधारणार नाही. तरीही आमचे राज्यकर्ते पाकड्यांच्या बाबतीत इतके आशावादी कसे असू शकतात? दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झाला. हा सर्जिकल स्ट्राईकही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच झाला होता व त्याच सर्जिकल स्ट्राईकचा विजयोत्सव साजरा करून भाजपने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. भाजपने निवडणुका जिंकल्या, पण सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडा मिळाला काय? सर्जिकल स्ट्राईकनंतर कश्मीरात पाक पुरस्कृत हिंसाचार वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत पाकड्यांचे हल्ले व आमच्या सैनिकांची बलिदाने वाढत आहेत. गेल्या महिनाभरात सुरक्षा दलाच्या जवानांचे अपहरण करून त्यांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले आहे. जवानांची मुंडकी उडवून हिंदुस्थानला आव्हान दिले जात असताना आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देत बसलो आहोत. दोन वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये

शौर्य गाजविलेले

लान्स नायक संदीप सिंह हेदेखील सोमवारी एका चकमकीदरम्यान शहीद झाले. जम्मू-कश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये ही चकमक झाली. संदीप सिंह आणि त्यांच्या पथकाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, मात्र संदीप यांना हौतात्म्य पत्करावे लागले. सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱया वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यात सहभागी असलेला आमचा एक बहादूर जवान दहशतवाद्यांशी लढताना शहीद होत असेल तर कसे व्हायचे? आता या सर्जिकल स्ट्राईकचा दिवस शौर्य दिवस, विजय दिवस साजरा करा असे आदेश म्हणे विद्यापीठांना देण्यात आले. जवानांच्या शौर्याचा सन्मान करण्याची ही कसली पद्धत? जवानांचे प्राण जात आहेत. त्यांची कुटुंबे उघड्यावर पडत आहेत. जवानांना आदेश हवाय तो पाकड्यांच्या हद्दीत घुसून त्यांना थडग्यात गाडण्याचा, पण सर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केले जात आहे हा जवानांचा अपमानच आहे. दोन वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकने पाकचे शेपूट सरळ झाले नसेल तर दुसऱया ‘स्ट्राईक’ची धमकी कसली देता? लोकसभा निवडणुकांचा माहोल निर्माण करण्यासाठी असे पाच-पंचवीस स्ट्राईक उद्या केले जातील किंवा पाकिस्तानबरोबरच एखादे लुटूपुटूचे युद्धही खेळवले जाईल. पण त्यात शेवटी आमच्या

सैनिकांनाच बलिदान

द्यावे लागेल. अयोध्येच्या लढय़ात करसेवकांच्या हौतात्म्याने शरयू लाल झाली, पण मंदिर काही झाले नाही. तसे कश्मीर प्रश्नाचे, पाकिस्तान विषयाचे राजकारण केले जात आहे. सर्जिकल स्ट्राईकने प्रश्न संपला नाही. त्यामुळे पुढचे कठोर पाऊल उचलणे देशहिताचे आहे व त्यासाठी 56 इंचाच्या शूर छातीचे दर्शन जनतेला घडायला हवे. लष्करप्रमुखांनी सर्जिकल स्ट्राईकबाबत केलेले वक्तव्य हे हतबलतेतून आले आहे काय? दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक झाला, पण कश्मीरमधील स्थिती पाकिस्तानी नेतृत्वाला सुधारू द्यायची नाही. कश्मीरमध्ये आयएसआयच्या कारवाया वाढल्या आहेत असे लष्करप्रमुख सांगतात. ही त्यांची वेदना आहे. हिंदुस्थानला घायाळ करण्याचा चंगच पाकिस्तानने बांधला आहे. कश्मीरमध्ये अशांतता, रक्तपात घडवला जात असून तरुणांना ‘दहशतवादी’ बनवले जात आहे, असेही आमच्या लष्करप्रमुखांनी सांगितले. पाकिस्तानचे हे नापाक उद्योग एखाद्या सर्जिकल स्ट्राईकने थांबतील काय? सर्जिकल स्ट्राईक हा शत्रूला अचानक धक्का देण्यासाठी केला जातो. पण अशा धक्क्याने डोके ताळय़ावर येईल ते पाकिस्तान कसले! आपल्या लष्करप्रमुखांचा आशावाद दुर्दम्य आहे, पण पाकिस्तानकडून आशा बाळगता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण चालले आहे. ते थांबले तरी पुरे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा; अर्थसंकल्पात कृषीसाठी ‘या’ मोठ्या घोषणा

Aprna

भास्कर जाधवांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मोटारसायकलवरून दाखल

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर

Aprna